PUNE

इंदापूरनंतर महायुतीला दौंडमध्ये धक्का, माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांच्या भेटीला

लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बुधवारी भेट घेतली. त्यामुळे इंदापूरनंतर महायुतीला दौंड विधानसभा मतदारसंघात धक्का बसण्याची शक्यता आहे. दौंड मतदारसंघात महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा असेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राहुल कुल हे विद्यमान आमदारच पुन्हा उमेदवार असतील, असे म्हटले जाते. मात्र, या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे रमेश थोरातही इच्छुक होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर थोरात यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, दौंड मतदारसंघ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून थोरात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. थोरात यांनी स्वत:ही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शरद पवार बुधवारी बारामतीच्या दौऱ्यावर असताना थोरात-पवार भेट झाली. आणखी वाचा- बारामतीच्या उमेदवाराची आठवडाभरात घोषणा; युगेंद्र पवार यांची माहिती थोरात हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे दौंडमध्ये सक्षम उमेदवार नसल्याने थोरात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात गेल्यास त्या पक्षाकडून यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनीही बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. बबन शिंदे हेही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून, येत्या काही दिवसांत त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालात वरचष्मा राहिल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील अनेक नेत्यांची चढाओढ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील नेत्यांसह भाजपच्या काही नेत्यांनाही पक्षात प्रवेश दिला आहे. तर, अजित पवार यांच्या काही समर्थक आमदारांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.