POLITICS

पदावर असताना मृत्यू पावलेले नांदेडमधील सातवे लोकप्रतिनिधी !

नांदेड : मुखेडचे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे, भोकरचे माजी आमदार बाबासाहेब गोरठेकर, किनवटचे सुभाष जाधव, नांदेडचे प्रकाश खेडकर, २०१४ साली मुखेडहून विधानसभेवर निवडून गेलेले गोविंद राठोड आणि देगलूरचे रावसाहेब अंतापूरकर यांच्यानंतर वसंत बळवंतराव चव्हाण हे पदावर असताना मृत्यू पावलेले जिल्ह्यातील सातवे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात नजीकच्या काळात लोकसभेची पोटनिवडणूक अपरिहार्य झाली आहे. नांदेडच्या राजकीय इतिहासात चांगल्या घटनांसोबत वेगवेगळ्या कालखंडात काही वाईट आणि दुर्दैवी प्रसंगांचीही नोंद झाली आहे. १९५१-५२च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून १९८४-८५ पर्यंत जिल्ह्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेची पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग अथवा कारण घडले नव्हते. पण १९८६ साली शंकरराव चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदासह खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर १९८७ साली जिल्ह्यात पहिल्या पोटनिवडणुकीसह अशोक चव्हाण यांच्या राजकीय पदार्पणाची नोंद झाली होती. हेही वाचा – वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत पुढच्या म्हणजे १९९०च्या दशकात जिल्ह्यात विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका झाल्या. १९९२ साली किनवटचे तत्कालीन आमदार सुभाष जाधव यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याच वर्षात तेथे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भीमराव केराम यांच्या अनपेक्षित विजयाची नोंद झाली. त्यानंतर १९९०-९५ या विधानसभेतील मुखेडचे आमदार मधुकरराव घाटे यांचे १९९४च्या अखेरीस निधन झाले. पण त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग आला नाही. याच दशकाच्या अखेरीस बिलोलीचे तत्कालीन आमदार भास्करराव पाटील खतगावकर हे १९९८ साली लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे बळवंतराव चव्हाण निवडून आले होते. पुढील काही वर्षांनी सन २००३ सालच्या गणेशोत्सवाच्या समारोपदिनी नांदेडचे तत्कालीन आमदार प्रकाश खेडकर यांचे श्री विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अचानक निधन झाले. त्यानंतर वर्षभराचा कालावधी असतानाही या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नाही. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत खेडकरांच्या पत्नी अनसूयाताई शिवसेनेतर्फे उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. याच काळात भोकरचे तत्कालीन आमदार बाबासाहेब गोरठेकर हेही विधिमंडळाचे सदस्य असताना दीर्घ आजाराने निधन झाले. पण त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग आला नाही. सन २०१४ साली मुखेड विधानसभा मतदारसंघात माजी नगराध्यक्ष गोविंद राठोड हे भाजपातर्फे निवडून आले होते, पण आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी नांदेड-मुंबई रेल्वे प्रवासातच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळे या मतदारसंघात २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राठोड यांचे पुत्र डॉ. तुषार निवडून आले. हेही वाचा – ‘झोपु’ प्रकल्पांना लवकरच वेग; रखडलेले २२८ प्रकल्प पूर्ण करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; दोन लाख सदनिकांची बांधणी २०१९ साली देगलूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांचे करोना काळात २०२१ साली निधन झाले. त्यानंतर काही महिन्यांनी या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने अंतापूरकरांचे पुत्र जीतेश यांना उमेदवारी देऊन आपली जागा राखली होती. आमदारांच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे चार विधानसभा मतदारसंघांनी पोटनिवडणुकांचा अनुभव घेतल्यावर अलीकडेच लोकसभेवर निवडून गेलेल्या काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचे दोन आठवड्यांच्या आजारपणानंतर २६ ऑगस्ट रोजी निधन झाल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात आणखी एका पोटनिवडणुकीची नोंद होईल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.