POLITICS

वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत

यवतमाळ : बदलापूरच्या घटनेसह राज्यात सध्या सुरू असलेल्या बाललैंगिक, स्त्री अत्याचारांच्या घटनांमुळे जनमानस ढवळून निघाले आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहे. अशा घटनांमधील आरोपींना थेट फासावर लटकविण्याची मागणी जनतेतून होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतमाळात केलेल्या वक्तव्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यवतमाळ येथे आयोजित महिला सक्षमीकरण अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार शनिवारी यवतमाळात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी, ‘शक्ती’ कायद्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा तत्काळ लागू केला जाईल, असे सांगितले. सरकार महिला सुरक्षिततेच्या बाबतीत डोळ्यात तेल घालून काम करत आहे. बदलापूरात चिमुरडीवर झालेला अत्याचार चीड आणणारा आहे. या घटनेत किंवा अशा कोणत्याही घटनेतील आरोपी कोणत्याही राजकीय नेत्याशी, पक्षाशी संबधित असतील तरी गय केली जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी बदलापूरसारख्या घटनांतील नराधमांना थेट फासावरच लटकवले पाहिजे. मात्र अशा नराधमांसाठी आपल्या भाषेत शिक्षा सुनवायची झाल्यास तीव्र भावना व्यक्त केली. लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्यानंतर सर्वसामान्यांची सामान्यपणे पहिली प्रतिक्रिया अशीच असते. तोच धागा पकडून अजित पवार यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे थेट वक्तव्य केले. मात्र या वक्तव्यावरून आता विरोधकांनी अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. आणखी वाचा- National Conference : काश्मीरमध्ये काँग्रेस अन् ‘एनसी’ची युती, मात्र दोन्ही पक्षांतील संबंधांमध्ये इतिहासात अनेक चढ-उतार; जाणून घ्या… यवतमाळातील ज्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते त्या कार्यक्रमास जिल्ह्यातील ५० हजार महिलांची उपस्थिती होती. अशा वेळी रोखठोक बोलताना पवार यांनी भाषेवर नियंत्रण ठेवायला हवे होते, अशी चर्चा कार्यक्रमानंतर रंगली. पवार जे बोलले ती सर्वसामान्यांच्या मनातील भावना असली तरीसुद्धा भावना व्यक्त करताना समोर हजारो महिला बसल्या आहेत, याचे भान पवार यांना राहिले नाही. एकीकडे सरकार अशा घटनांतील आरोपींवर कायद्याने कठोर कारवाई करण्याची भाषा बोलत असताना सरकारचेच घटक असलेले उपमुख्यमंत्री या घटनातील आरोपीबाबत असंवैधानिक भाषा वापरत असल्याने अजित पवारांना कायदा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का, अशी चर्चा आता होत आहे. हजारो महिलांसमोर असे वक्तव्य करण्याची खरंच गरज होती काय किंवा सवंग प्रसिद्धीसाठी केलेले तर हे वक्तव्य नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळातच रंगली आहे. अजित पवारांनी महिलांसमोर जी भाषा वापरली त्यापेक्षा अधिक संवैधानिक भाषेतही ते आपल्या भावना व्यक्त करू शकले असते, अशी प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर अनेक महिलांनी दिली. आणखी वाचा- Dera chief Ram Rahim: बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार राम रहीम पुन्हा एकदा तुरूंगातून बाहेर; हरियाणा विधानसभा निवडणुकीशी संबंध? काही वर्षांपूर्वी धरणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांवर सर्वस्तरातून टीका झाली होती. त्यांनतर त्यांनी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून प्रायश्चित्तही घेतले होते. मात्र त्यांनतरही अजित पवार आपल्याला रोखठोक बोलायला जमतं. ताकाला जावून भांडं लपवायला आवडत नाही, असे स्वसमर्थन करीत जाहिरपणे असंवैधानिक भाषेचा वापर करतात. ते स्वत: सरकारमध्ये असताना आरोपीच्या शिक्षेसंदर्भात त्यांना अशी असंवैधानिक भाषा वापरण्याची वेळ का आली, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रा. वर्षा निकम यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री असुनही अजित पवार अशी भाषा बोलतात याचाच अर्थ महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नसून महिला असुरक्षित आहेत, हेच दिसते अशी टीका प्रा. वर्षा निकम यांनी केली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.