THANE

संपूर्ण राज्यच माझे कुटुंब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ठाणे : माझे कुटुंब माझी जबादारी नाही तर संपूर्ण राज्य माझे कुटुंब आणि परिवार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावत या परिवारासाठी जे जे करायचे ते आम्ही करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना सांगितले. एकीकडे राज्यातील विकासकामे आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशाप्रकारे सरकारचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे येथील लोकमान्य नगर पाडा नं. ४ भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राखीव वन येथे ‘एक पेड मां के नाम’ आणि ‘ मुख्यमंत्री हरित अभियान ‘ या अंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याचदरम्यान वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह आणि डायलिसिस सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. माझे कुटुंब माझी जबादारी नाही तर संपूर्ण राज्य माझे कुटुंब आणि परिवार आहे, असा टोला त्यांनी लगावला. या परिवारासाठी जे जे करायचे ते आम्ही करत आहोत. त्यांच्यासाठी दोन वर्षात अनेक योजना आणल्या आहेत, असेही ते म्हणाले. हेही वाचा – Ajit Pawar : ठाण्यात अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाडांना पुन्हा धक्का सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ, वयोश्री, तीर्थक्षेत्र योजना आदीसह इतर योजना आणल्या आहेत. परंतु लाडकी बहीण योजनेपुढे इतर योजना दबल्या गेल्या आहेत. लाडक्या बहिणींनी आता अर्ज भरले तरीसुद्धा त्यांना पहिल्या हप्त्यापासूनचे पैसे दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये यासाठी सावत्र भाऊ कोर्टातसुद्धा गेले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे या सावत्र भावांवर लक्ष ठेवा, असेही ते म्हणाले. लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी एक झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात एक लाख झाडे लावा, अशा पालिकांना सूचना केल्या. त्याची अमलबजावणी करत ५० हजार झाडे लावली. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आईच्या नावाने एक झाड लावायचे आहे आणि त्या झाडाशेजारी आईसोबत उभे राहून छायाचित्र काढायचे आहे, अशी सूचनाही त्यांनी केली. हेही वाचा – “विधानसभेला किसन कथोरेंचे काम करणार”, माजी मंत्री कपिल पाटलांचा नरमाईचा सूर; “मागे कुणी काय केले ते गौण…” राज्यात १० लाख हेक्टर जमिनीवर बांबू लागवड केली जात आहे. पर्यावरण रक्षणासाठी लागवड केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंग, अवकाळी पाऊस, ढगफुटी, दुष्काळ असा पर्यावरणाचा असमतोल झाला आहे, त्याला संतुलित करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबवित आहोत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री हरित ठाणे उपक्रम ठाणे पालिकेने सुरू केला आहे, असेही ते म्हणाले. झाडे लावणे महत्वाचे नाही तर त्याचे संगोपन महत्वाचे आहे. ते जगविण्याचे प्रमाण चांगले ठेवा, अशी सूचनाही त्यांनी केली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.