DESH-VIDESH

“राहुल व प्रियांका गांधींच्या विजयामागे कट्टरपंथी मुस्लीम आघाडीचा हात”, माकपाचा आरोप; नेमकं काय म्हणाले?

CPIM leader Vijayaraghavan Attacks on Congress: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी संसदेत गेल्या आहेत. संसदेत त्या आपल्या भाषणांनी व प्रत्येक कृतीने लोकांचं व माध्यमांचं लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी सलग दोन वेळा वायनाडमधून लोकसभेवर गेले होते. प्रियांका गांधी असो वा राहुल गांधी दोघांनीही वायनाडमध्ये प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने या भाऊ-बहिणीवर गंभीर आरोप केला आहे. माकपाने म्हटलं आहे की “राहुल व प्रियंका गांधी यांच्या वायनाडमधील विजयामागे कट्टरपंथी मुस्लीम आघाडीचा हात होता”. सुलतान बाथरी येथे वायनाडमधील माकपाच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. माकपा नेते विजयराघन यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “वायनाडमधून लोकसभेवर दोन जण निवडून गेले आहेत, पहिले राहुल गांधी आणि आता प्रियांका गांधी. ते कोणामुळे निवडून आले? कट्टरपंथी मुस्लीम आघाडीच्या पाठिंब्यामुळेच ते वायनाडमध्ये जिंकले. कट्टरपंथी मुस्लीम आघाडीच्या पाठिंब्याशिवाय राहुल गांधी दिल्लीला पोहोचू शकले नसते. ते आता विरोधी पक्ष नेते आहेत. प्रियांका गांधींच्या वायनाडमध्ये अनेक प्रचारफेऱ्या झाल्या. त्यांच्या त्या प्रचारफेऱ्यांमध्ये सर्वात पुढच्या व मागच्या रांगेत कोण होते माहितीय ना? अल्पसंख्याकांमधील सर्वात वाईट अतिरेकी विचारांचे लोक त्यांच्यातच होते. हे अतिरेकी विचारांचे लोक काँग्रेस नेतृत्वाबरोबर आहेत”. हे ही वाचा >> PM Modi Kuwait Visit : पंतप्रधान मोदी यांनी कुवेतमध्ये घेतली महाभारत आणि रामायणाचे अरबीमध्ये भाषांतर करणाऱ्यांची भेट विजयराघवन यांनी यापूर्वी देखील काँग्रेसवर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. तसेच माकपाने २०१४ मध्ये अशीच भूमिका घेतली होती. माकपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस व कट्टरपंथी मुस्लीम संघटनांचा संबंध जोडला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात देखील माकपाने असेच आरोप केले होते. दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेही माकपाच्या आरोपांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसने म्हटलं आहे की “नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माकपाने केवळ मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठीच पॅलेस्टाईनचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यामुळे हिंदू मतदार त्यांच्यावर नाराज झाले. त्यामुळेच माकपा आता हिंदू मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे”. हे ही वाचा >> Pushpa 2 Stampede : “चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, अभिनेता म्हणाला चित्रपट हिट होईल”, नाव न घेता ओवैसींचा अल्लू अर्जुनवर आरोप महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबर केरळमधील वायनाडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली होती. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या पहिल्या निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत बंधू राहुल गांधींचा मताधिक्याचा विक्रम मोडला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी ३.६५ लाख मतांनी विजयी झाले होते. तर, प्रियांका गांधी यांनी या आघाडीला मागे टाकत मोठी आघाडी मिळवली. वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यातील मतांचा फरक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राहुल गांधी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त होता. प्रियांका गांधी यांना ६.२२ लाख मतं मिळाली. तर, माकपा नेते सत्यन मोकेरी यांना २.११ लाख मतं मिळाली. या मतदारसंघात भाजपा उमेदवार नाव्या हरिदास यांना केवळ १.०९ लाख मतं मिळाली. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.