MAHARASHTRA

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Sindhudurg Eknath Shinde Reacts : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना काही तासांपूर्वी समोर आली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट, शिवसेनेचा ठाकरे गट व काँग्रेस यावरून आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हा पुतळा कशामुळे पडला याचं कारण सांगितलं. तसेच हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता असं सांगितलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचं डिझाईन देखील नौदलानेच तयार केलं होतं. हा पुतळा कोसळल्याचं वृत्त समजल्यावर मी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितलं की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं”. मुख्यमंत्री म्हणाले, “मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की उद्या तिथे (घटनास्थळी) नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले आहेत. तिकडे जाण्यापूर्वी मी त्यांना काही सूचना केल्या आहेत. उद्या नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील. उद्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल”. हे ही वाचा >> Badlapur Case : “…तर ही घटना घडलीच नसती”, बदलापूरमधील घटनेप्रकरणी शिक्षणमंत्री केसरकरांचा ‘त्या’ दोघींवर आरोप दरम्यान, हा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “शेवटी ही महाराष्ट्रातील लोकांची प्रतिक्रिया आहे. महाराज हे सर्वांसाठी आराध्य दैवत आहेत. मी सर्वांना एवढेच सांगेन की आम्ही तात्काळ हा पुतळा पुन्हा उभारू. मात्र, कोणीही कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखायला हवी. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. मी सर्वांना एवढंच आवाहन करेन की राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा”. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.