MUMBAI

अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड

लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : अंधेरी लोखंडवाला परिसरातील अच्युतराव पटवर्धन रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे हा रस्ता पुन्हा खोदून नव्याने करावा लागला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने दीड लाख रुपये दंड केला आहे. तसेच या रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या संस्थेलाही दीड लाख रुपये दंड करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने हजारो कोटींची रस्ते कामे दोन टप्प्यात हाती घेतली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे सुरू असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्या आहेत. रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी गुणवत्ता संस्थांची नेमणूक केलेली असतानाही अनेक ठिकाणी रस्त्यांवर तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांचा पृष्ठभाग उखडला आहे. सांताक्रूझ येथील भार्गव मार्गावरही रस्त्यावर तडे गेले आहेत. त्यातच आता अंधेरी लोखंडवाला परिसरातील अच्युतराव पटवर्धन मार्गावरही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे अंधेरीतील या मार्गावरील रस्त्याचा काही भाग उखडून तो पुन्हा नव्याने करण्याची वेळ आली आहे. याबाबतचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये सोमवारी २३ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. आणखी वाचा- पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन अच्युतराव पटवर्धन मार्ग रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याची एकूण लांबी १ हजार १५० मीटर आहे. त्यापैकी ८०० मीटरचे काँक्रिटीकरण कामे मागील टप्प्यात पूर्ण झाली आहेत. उर्वरित ३५० मीटरचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मागील टप्प्यात रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतर १५ मीटर लांबीच्या भागामध्ये पृष्ठभागावर तडे गेल्याने आढळून आले होते. त्यामुळे पृष्ठभागाचा एक थर काढून त्याचे पुन्हा काँक्रिटीकरण करण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले होते. पावसाळ्यानंतर हे काम प्रस्तावित होते. विविध सण व निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा येऊ नये म्हणून काँक्रिटीकरणाचे काम १९ डिसेंबर २०२४ पासून सुरू करून २२ डिसेंबर २०२४ रोजी पूर्ण करण्यात आले, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. सदोष कामासाठी कंत्राटदाराला १ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गुणवत्ता देखरेख संस्थेलासुद्धा १ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गुणवत्ता देखरेख संस्था व कंत्राटदार यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांना काम करताना कामाच्या गुणवत्तेबाबत योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेच्या अभियंत्याना अधिक दक्ष राहून काम काळजीपूर्वक करून घेण्याबाबत, तसेच कंत्राटातील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी वाचा- मुंबईत क्षयरोग प्रतिबंधात्मक प्रौढ बीसीजी लसीकरण, पहिल्याच दिवशी १ हजार ९९० नागरिकांचे लसीकरण पूर्ण रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी काही दिवसांपूर्वी उपायुक्तांना रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यात ज्या रस्त्यांवर त्रुटी आढळल्या आहेत त्या सर्व रस्त्यांची कंत्राटदाराच्या खर्चाने पुन्हा दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.