MUMBAI

बीकेसी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला, पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास वेगवान

लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसी कनेक्टरद्वारे बीकेसीत अतिवेगाने पोहचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १८० मीटर लांबीचा नवीन रस्ता अर्थात मिसिंग लिंक बांधण्यात आला आहे. या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने सोमवारी दुपारी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सह महानगर आयुक्त राधाबिनोद ए. शर्मा यांच्या हस्ते लोकार्पण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या रस्ता सेवेत दाखल झाल्याने बीकेसीमध्ये येण्या – जाण्यासाठी एक नवीन पर्यायी रस्ता उपलब्ध झाला असून आता पूर्वमुक्त मार्ग ते बीकेसी प्रवास अतिवेगवान होणार आहे. तर बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. एमएमआरडीए आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून बीकेसीचा विकास करीत आहे. त्यानुसार बीकेसीतील कार्यालयांची, कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायाने येथे कामासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. बीकेसीतील अंतर्गत रस्ते वाढत्या वाहनांना सामावून घेण्यासाठी अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे बीकेसीतील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्याचे आव्हान सध्या एमएमआरडीएसमोर आहे. दरम्यान, पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसीत जलद गतीने येण्या – जाण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता आणि चुनाभट्टी बीकेसी कनेक्टर असे पर्याय दिले आहेत. मात्र यानंतरही बीकेसी येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. ही बाब लक्षात घेता एमएमआरडीएने बीकेसी कनेक्टरच्या खालून जागा असल्याने येथे मिसिंग लिंक अर्थात पर्यायी नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आणि नुकताच हा रस्ता बांधून पूर्ण केला आहे. आणखी वाचा- लाचखोरीप्रकरणात प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल, सीबीआयची कारवाई बीकेसीतील ‘जी ब्लॉक’मधील भूखंड क्रमांक सी ८० आणि भूखंड क्रमांक सी ७९ ला जोडणारा, ‘बीकेसी कनेक्टर’च्या खालून जाणारा असा हा नवा रस्ता आहे. सेबी इमारत एवेन्यू ५ (बीकेसी कनेक्टर रोड) आणि एवेन्यू ३ दरम्यानचा हा १८० मीटर लांबीचा रस्ता आहे. सुमारे ३.९८ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा पर्यायी रस्ता सोमवारी सायंकाळी ५ वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू झाल्याने आता पूर्व मुक्त मार्ग ते बीकेसी प्रवास सुकर झाला आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.