MUMBAI

राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार

लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : ऐन हिवाळ्यात राज्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आठवड्याच्या अखेरीस राज्यभरात थंडीमध्ये वाढ होणार आहे. याच काळात दक्षिणेकडून बाष्पीयुक्त वारे राज्यात येणार आहे. बाष्पयुक्त हवा आणि थंड वाऱ्याच्या घुसळणीमुळे विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे गुरुवारपासून रविवारपर्यंत पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आणखी वाचा- मंडाळा परिसरात भंगाराच्या गोदामांना भीषण आग, आगीत ६ ते ७ गोदाम जळून खाक उत्तर महाराष्ट्रात केळी, द्राक्ष, पपईसह भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, त्यामुळे गारपीट झाल्यास उत्तर महाराष्ट्रमध्ये मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्याच्या अन्य भागांत ही पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. मात्र, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या राजस्थानच्या आग्नेय भागातून देशात अति थंड वारे किंवा पश्चिमी थंड वारे देशात प्रवेश करीत आहेत. साधारण समुद्रसपाटीपासून दीड ते दोन किलोमीटर उंचीवरून हे थंड आणि कोरडे वारे भारतात प्रवेश करत आहेत. तर दक्षिणेकडून सरासरी ८०० मीटर उंचीवरून बाष्पयुक्त आणि उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. या वाऱ्यांची घुसळण उत्तर महाराष्ट्रावर होत आहे. थंड वारे आणि बाष्पीयुक्त वाऱ्याच्या घुसळणीने साद्रीभवन होऊन गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. राज्याच्या अन्य भागात गारपीटीची शक्यता कमी असली तरी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. आणखी वाचा- करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. आठवड्याच्या अखेरीपासून थंडीत वाढ होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात थंडीची वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. पाऊस, गारपिटीचा अंदाज : धुळे नंदुरबार, जळगाव, नाशिक. हलका ते मध्यम पावसाचा अंदाज : नगर, पुणे, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.