MUMBAI

संजय राऊतांच्या घराची रेकी; दोन अज्ञात बाईकस्वार CCTV मध्ये कैद, दिल्लीतील घराचीही रेकी केल्याचा दावा!

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या घराची रेकी झाल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. खुद्द संजय राऊत व त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी हा दावा केला असून त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे. सुनील राऊत यांनी घरातल्या सीसीटीव्हीचं फूटेज पोलिसांना सोपल्याचं सांगितलं असून त्यात दोन बाईकस्वार स्पष्टपणे दिसत असल्याचं सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात या ‘रेकी’ची चर्चा सुरू झाली असून ते दोन बाईकस्वार नेमके कोण होते? याचा तपास पोलीस घेत आहेत. पत्रकारांनी संजय राऊतांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी त्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. “सामना कार्यालयाची रेकी होत आहे. माझ्या घराचीही होतेय. दिल्लीतल्या घराचीही रेकी झाल्याचं आता समजलंय. हे सगळं रेकॉर्डवर आहे. पोलीस अधिकारी तपास करत आहेत. उद्धव ठाकरेही पोलिसांशी बोलत आहेत. संतोष देशमुखांसारखे काही प्रकार आणखी काही लोकांना करायचे असू शकतात. बघू. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अजिबात राहिलेली नाही”, असं संजय राऊत म्हणाले. आज सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दोन इसम दुचाकीवर येऊन गेटजवळ थांबल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. घराजवळ येऊन थोड्या वेळाने पुन्हा यू टर्न घेऊन ते माघारी गेले. यात बाईक चालवणाऱ्यानं हेलमेट घातलं असून मागे बसलेल्या व्यक्तीनं हुडीचं जॅकेट घातल्याचं दिसत आहे. सुनील राऊत यावेळी घरातच होते असं सांगितलं जात आहे. त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. “मोबाईलनं ते शूटिंग करत होते. त्यांना हटकल्यानंतर ते दोघं माघारी फिरून पळून गेले. माझ्या घरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहेत. हे वातावरण अत्यंत संशयित आहे. माझ्या घराला दोन गेट आहेत. पुढच्या गेटनंतर ते लोक मागच्या गेटवरही गेले. त्यांच्या मनात काहीतरी वाईट हेतू असावा. मुंबईत बाबा सिद्दिकींची ज्याप्रकारे निर्घृण हत्या केली, तसं इथे काही होऊ नये म्हणून मी पोलिसांना कळवलं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. शोध घेत आहेत. गेली अनेक वर्षं आम्ही संरक्षण मागतोय. पण दिलं जात नाही. इथे काही वाईट घडलं तर त्याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल”, असा इशाराच सुनील राऊत यांनी दिला आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.