PUNE

वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी एक वेळची विशेष बाब म्हणून शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. या अनुषंगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षांसाठी वयाधिक झालेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली असून, उमेदवारांना ६ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियमाअंतर्गत राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे एमपीएससीला देण्यात आली होती. त्यानुसार एमपीएससीने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, एक वेळची विशेष बाब म्हणून वयाधिक उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय २० डिसेंबर रोजी घेण्यात आला. या निर्णयाच्या अनुषंगाने एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ या संवर्गाच्या जाहिरातींस अनुसरुन निश्चित केलेल्या कमाल वयोमर्यादेमध्ये एक वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हेही वाचा… एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण उमेदवारांना २६ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी ६ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्यासाठी ७ जानेवारीची मुदत आहे, तर चलनाद्वारे ९ जानेवारीपर्यंत परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांसाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल. दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा मोजण्याच्या निश्चित दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मूळ जाहिरातींमधील मूळ अटी-शर्तींमध्ये कोणताही बदल नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. हेही वाचा… मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करुन द्यावा लागणारा कालावधी, नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित इतर परीक्षांचा कार्यक्रम, इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्व परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ फेब्रुवारी रोजी, तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ४ मे रोजी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.