PUNE

एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यास आता स्वयंपूर्ण झाला आहे. संस्थेचे देशभरात विस्तारीकरण करण्यात येत आहे. पुण्यासह विविध शहरांत कार्यालये सुरू होणार आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल आता ५०० कोटी रुपयांवर गेली आहे. त्यातील सुमारे ५० टक्के वाटा बालसाहित्याचा असल्याची माहिती न्यासाचे संचालक कर्नल (नि.) युवराज मलिक यांनी दिली. पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद आणि महोत्सवातील पुस्तक विक्रीची उलाढाल याबाबतीत पुणे पुस्तक महोत्सव दिल्लीत होणाऱ्या जागतिक पुस्तक महोत्सवाखालोखाल दुसऱ्या स्थानी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने देशभरातील प्रकाशन उद्योग, मराठी प्रकाशन, एनबीटीचे काम, डिजिटल काळात वाचन संस्कृती, वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे अशा अनुषंगाने ‘लोकसत्ता’ने मलिक यांच्याशी संवाद साधला. हेही वाचा… मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांनी पादचारी तरुणाला फरफटत नेले, विरोध करणाऱ्या तरुणाचा हाताचा चावा मलिक म्हणाले, ‘भारतातील प्रकाशन उद्योग हा जगातील सर्वांत मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे एक लाख कोटी रुपयांची आहे. विशेष म्हणजे हा सर्वांत वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. शिक्षण क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणांमध्ये मातृभाषांना महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे देशातील सर्व अनुसूचित भाषांना महत्त्व मिळणार आहे. या भाषांमध्ये नवीन आशयाची निर्मिती केली जाणार आहे. परिणामी, संपूर्ण प्रकाशन व्यवसायाला आणखी प्रोत्साहन मिळणार आहे.’ करोना काळानंतर पुस्तकांच्या मागणीत वाढ झाल्याचेही मलिक यांनी सांगितले. ‘एनबीटीतर्फे शाळा स्तरापासून तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. त्यात २० ते २५ राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शने, २०० पेक्षा जास्त जिल्हास्तरीय प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. त्याला मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे. करोना काळानंतर अचानक पुस्तकांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे एनबीटीच्या पुस्तकांनाही मागणी वाढली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये एनबीटीच्या पुस्तकांच्या विक्रीत, उलाढालीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुलांसाठी नव्या आशयाची मागणी वाढली आहे. बालसाहित्य हे नेहमीच प्रकाशन उद्योगाचा कणा राहिले आहे. मुलांची वाचनाची आवड निर्माण होण्यासाठीचा तो पायाभूत स्तर आहे. नवे वाचक घडण्याची शक्यता तिथूनच निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मुलांसाठी द्विभाषिक पुस्तके, लोककथा अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांची निर्मिती करण्यात येत आहे. वाचकांना पुस्तकांशी जोडणे, पुस्तक वाचनाची संस्कृती वृद्धिंगत करणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे,’ असे मलिक यांनी नमूद केले. हेही वाचा… मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार राष्ट्रीय पुस्तक न्यास ही देशातील प्रकाशन उद्योगाची समन्वयक संस्था आहे. त्यामुळे संपूर्ण परिसंस्था विकसित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. पुस्तके, प्रकाशन उद्योगासाठी पुस्तक प्रचार धोरण तयार करून त्याचा मसुदा जाहीर करण्यात आला. त्यावर लेखक, प्रकाशक, अनुवादक अशा विविध घटकांनी प्रतिसाद नोंदवला आहे. तो विचारात घेऊन अंतिम धोरण केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे, असेही मलिक यांनी सांगितले. मराठी ही उत्तम भाषा आहे. या भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेत लोकप्रिय असलेले साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये नेणे शक्य होणार आहे. तसेच अन्य भाषांतील साहित्य मराठीत आणता येणार आहे. अशा प्रकारे देवाणघेवाण होणे, अनुवाद होणे ही काळाची गरज आहे. पुणे पुस्तक महोत्सव, देशभरात होणारे अन्य पुस्तक महोत्सव यातून प्रकाशन उद्योगाच्या परिसंस्थेला बळ मिळाले आहे. अशाच प्रकारचे प्रयोग आता केवळ राज्याच्या राजधानीच्या शहरातच नाही, तर जिल्हा आणि तालुका स्तरावर करण्याचा प्रयत्न आहे. त्याद्वारे चांगले साहित्य किफायतशीर किमतीत अन्य मराठी वाचकांपर्यंत उपलब्ध होऊ शकेल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.