PUNE

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांची भेट, तपासणी की छापा?

मुंबई / पुणे : राज्यातील वातावरण उद्योगस्नेही राहिलेले नसल्याची टीका विरोधक करीत असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पुण्याजवळील चाकणचा ‘मर्सिडीज बेन्झ’ कंपनीला अचानक भेट दिली. या भेटीबाबत मंडळाने ‘एक्स’ समाजमाध्यमावर माहिती दिली आणि नंतर ही हटविली. त्यामुळे या भेटीमागे नेमका काय उद्देश होता, असा सवाल आता केला जात आहे. माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली निवड वादग्रस्त ठरली होती. त्यातच पुण्यात खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या सिद्धेश कदम यांनी शुक्रवारी चाकणच्या मर्सिडीज प्रकल्पाचा दौरा केला. वास्तविक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बरोबर असणे आवश्यक असताना ३०-३५ खासगी व्यक्तींना घेऊन कदम तेथे गेले. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नियमांचे पालन होत नसल्याने पाहणी करण्यासाठी हा दौरा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शविवारी देण्यात आली. मात्र यावरून टीका होताच ‘एक्स’ समाज माध्यमावरून या पाहणीचा तपशील हटविण्यात आला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणतीही नोटीस बजाविण्यात आलेली नसल्याचे कंपनीनेही स्पष्ट केले. मात्र सोमवारी पुणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण विभाग कारखान्याला नोटीस देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील औद्याोगिक वातावरण गुंतवणुकीला पोषक असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत करीत असतात. मात्र त्यांच्याच पक्षाच्या सिद्धेश कदम यांच्या वर्तनामुळे या दाव्याला छेद दिल्याची चर्चा आहे. विरोधकांनीही या भेटीवरून सरकारला लक्ष्य केले. राज्यात मोठे प्रकल्प येत नसताना जे उद्योग सुरू आहेत, त्यांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सिद्धेश कदम यांची नियुक्ती आयोग्य असल्याचे त्यावेळीच निदर्शनास अणून दिले होते. त्यांनी ‘नको ते उद्योग’ केल्यास राज्यावर नामुष्की ओढवू शकते, असा हल्लाबोल त्यांनी केला. हेही वाचा >>> रमाबाई आंबेडकर नगर पुनर्वसन प्रकल्प : घरभाडे धनादेशाचे वाटप रखडले, धनादेश वाटपाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा दरम्यान, मंडळाचे अध्यक्ष एखाद्या प्रकल्पाची तपासणी करणार असतील तर मंडळाचे सदस्य सचिव बरोबर असतात. पुण्यातील भेटीवेळी सदस्य सचिव उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे, या भेटीआधी त्याची माहिती मंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही नव्हती. त्यामुळे भेट पूर्वनियोजित नसून अचानक झाल्याचे मंडळातील सूत्रांचे म्हणणे आहे. सिद्धेश कदम यांनी शुक्रवारीच ‘कोरस इंडिया कंपनी’च्या प्रकल्पाची पाहणी केल्याची माहितीही समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मौन धारण केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मर्सिडीजच्या भेटीबाबत आणि नियमांच्या उल्लंघनाबद्दल समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आली. मात्र, कोरस इंडियाच्या भेटीबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. त्यामुळे, या भेटीचे नेमके प्रयोजन काय होते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची एकही नोटीस मिळालेली नाही. आम्ही यंत्रणांशी सहकार्य करण्यास तयार आहोत. सर्व कागदपत्रे सादर करू व योग्य कार्यवाही करू . – मर्सिडीज बेन्झ इंडिया सिद्धेश कदम एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्यांना मर्सिडीज बेंझचा प्रकल्प कसा चालतो, हे पाहण्याची उत्सुकता होती. प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी गेले नव्हते. – बाबासाहेब कुकडे, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.