PUNE

आता ‘प्रकाशझोत’ कारवाईवर; दहीहंडी उत्सवानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त

पुणे : दहीहंडी उत्सवातही लेझर बीममधून निघणाऱ्या घातक प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश असला, तरी शहरातील अनेक मंडळांनी केलेली एकूण तयारी पाहता, या आदेशाची आज, मंगळवारी प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार, की तो फक्त कागदावर राहणार, याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. अशा झोतांवर पोलीस काय कारवाई करणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे. डोळ्यांना इजा पोहोचविणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी नुकताच दिला आहे. मात्र, मध्य भागासह उपनगरातील मंडळांनी दहीहंडीनिमित्त ‘लेझर शो’ची तयारी सोमवारी सकाळपासूनच केल्याचे दिसत आहे. अशा घातक ‘लेझर शो’वर, तसेच दणदणाट करणाऱ्या ध्वनिवर्धक यंत्रणेवर पोलीस काय कारवाई करणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे. दहीहंडीनिमित्त शहर, तसेच उपनगरात मंगळवारी (२७ ऑगस्ट) मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याने नियमभंगावर कारवाई करण्यात येईल, अशी शक्यता आहे. मध्य भागासह उपनगरांत गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या उत्सवातही प्रखर लेझर दिव्यांचा वापर, तसेच उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यंदाही दहीहंडीनिमित्त शहरातील अनेक मंडळांनी खास लेझर शो आयोजित केला असून, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्लीतील ध्वनिवर्धक यंत्रणा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना पाचारण केले आहे. लेझर शो आणि ध्वनिवर्धक यंत्रणेसाठी रविवारी रात्रीपासूनच मध्य भागासह उपनगरातील मंडळांच्या परिसरात लोखंडी सांगाडे उभे करून त्यावर लेझर दिवे लावण्यास सुरुवात झाली होती. हेही वाचा >>> पिंपरी : पवना धरण काठोकाठ भरुनही पाणीपुरवठा दिवसाआडच; काय आहे नेमके कारण? गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्याचा अनेकांना त्रास झाला होता. काहींच्या डोळ्यांना इजा झाली होती. ध्वनिवर्धकाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तालयात मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. तीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचा आदेश दिला. हेही वाचा >>> शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचा आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी नुकताच जारी केला. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. ध्वनिवर्धक, तसेच लेझर दिव्यांबाबत नियमांचे पालन मंडळांनी करणे गरजेचे आहे. दहीहंडीनिमित्त मध्य भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. गैरप्रकार, तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.- संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.