PUNE

“महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय, विधानसभेला बारा जागा हव्या”, कोणी केली मागणी?

पुणे : महायुतीमध्ये आमच्या पक्षावर अन्याय होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला दोन जागा मिळायला हव्या होत्या. त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे आमच्या पक्षावर अन्याय होत असल्याची, काणाडोळा केला जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. आता विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला बारा जागा मिळाल्या पाहिजेत. तसेच सत्ता मिळाल्यावर मंत्रीपद मिळाले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) केंद्रात तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाल्याबद्दल आठवले यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात आमच्या पक्षाची ताकद आहे. विदर्भ-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सगळीकडे आमचा पक्ष मजबूत आहे. लोकसभा निवडणुकीत न्याय न मिळूनही आम्ही महायुतीचे निष्ठेने काम केले. मात्र, भाजप-शिवसेनेने आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या पाहिजे. आम्ही ज्यांच्याबरोबर असतो त्यांची सत्ता येतेच, हा आमचा इतिहास आहे. आम्हाला महायुतीमध्ये योग्य ती वागणूक मिळाली नाही, हे पूर्णपणे खरे आहे. आता कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत, यात काही शंका नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांचा विचार करून राज्यात बारा जागांची मागणी मिळण्याची आहे. देशात एनडीएला तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. त्यात मलाही मंत्रीपद मिळाल्याने समाजात आनंदाची भावना आहे. मोदींना हरवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले. आरक्षण आणि संविधानाचा कायम अनादर केलेलेच संविधान वाचवण्याचा प्रचार करत होते. केंद्र सरकारने पेन्शनसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आमचे सरकार पाच वर्षे टिकेल. तसेच चौथ्यांदाही एनडीएचेच सरकार येईल, असेही आठवले यांनी सांगितले. हेही वाचा : Sharad Pawar: “माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो”, शरद पवार म्हणाले… बदलापूरची घटना गंभीर आहे. मानवतेला कलंक ठरणारी घटना आहे. महिलांबाबतचे कायदे कठोर झाले आहेत. आताच्या काळात कायद्यात तरतूद असलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे. जलदगती न्यायालयात खटला चालवला पाहिजे. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याची गरज आहे. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. समाजाने जागृत व्हायला हवे. कायद्याने कायद्याचे, समाजाने समाजाचे काम केले पाहिजे, असेही आठवले म्हणाले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.