लोकसभा निवडणुकीत ‘संविधाना’चा फटका बसल्यापासून भाजपने राज्यघटना आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपलेसे करण्याचा चंगच बांधलेला दिसतो. हे राजकीयदृष्ट्या स्तुत्यच. त्यामुळे संसदेच्या या वर्षीच्या शेवटच्या अधिवेशनात संविधान, घटना आदी मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. अलीकडे सांसदीय चर्चेत विद्वान, अभ्यासकांस आकर्षक वाटेल असे फारच काही क्वचित असते. सगळा आरोप-प्रत्यारोपांचा उथळ खेळ. त्यातूनच ‘आंबेडकर, आंबेडकर’ करण्याची हल्ली कशी ‘फॅशन’ आहे असे काही बोलले गेले. ते सध्याच्या काळास साजेसेच म्हणायचे. आरोप-प्रत्यारोपाचा खेळ शून्य बौद्धिक संपदेवरही मोठ्या जोमाने खेळता येतो आणि फुप्फुसांच्या ताकदीवर जिंकताही येतो. जितकी जास्त फुप्फुसे तितकी विजयाची शक्यता अधिक. त्यामुळे संसदेत जे काही झाले ते तेथेच सोडून त्या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि अर्थातच राजकीय मतांची किंचित उजळणी आवश्यक ठरते. सध्याचे राजकारण हे अशी उजळणी आवश्यक ठरण्याचे दुसरे कारण. या राजकारणात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र…’ या तत्त्वाप्रमाणे ‘आपल्या टीकाकारावर टीका करणारा तो आपला समर्थक’ असे मानण्याचा प्रयत्न मोठ्या जोमाने होताना दिसतो. त्यातून सरदार पटेल यांस नेहरू- टीकाकार ठरवून ‘आपले’ म्हणण्याचा प्रयत्न जसा दिसतो तसा सुभाषचंद्र बोस हे तर ‘आमचेच’ अशी द्वाही फिरवण्याचा उत्साहही दिसतो. तो दर्शवणाऱ्यांस सरदार पटेल यांची रा.स्व. संघाविषयीची मते माहीत असतात आणि नेताजी बोस यांच्यासाठी पं नेहरू, गांधी हे किती आदरस्थानी होते हेही पूर्ण माहीत असते. या मालिकेत आता डॉ. आंबेडकर यांच्यावर ‘आपलेकरण’ प्रयत्न अनुभवण्याची वेळ आलेली दिसते. ते ठीक. बाबासाहेबांनी काँग्रेसवर प्रसंगी टीका केली हे खरे. काँग्रेसकडून त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, हेही खरे. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यात मतभेद होते हे खरे आणि गांधींचा ‘हरिजन’ हा शब्द तर त्यांना बिलकूल अमान्य होता हे तर खरेच खरे. पण याचा अर्थ डॉ. आंबेडकर हे सांस्कृतिक अर्थाने हिंदू धर्म आणि परंपरा यांचे समर्थक होते काय? त्यांचा बौद्धिक पाठिंबा हिंदुत्ववादी विचारांस होता काय? सावरकर यांच्यासारख्या ‘सुधारणावादी’ हिंदुत्ववादी नेत्यांचा पुरस्कार बाबासाहेबांनी कधी केला होता काय? अशा काही प्रश्नांची उत्तरे या निमित्ताने शोधता येतील. प्रचाराचा भाग, निकड आणि आदर्श नायकांची एका बाजूस असलेली वानवा म्हणून कर्तृत्ववान बुद्धिवंताच्या ‘आपलेकरणाचे’ प्रयत्न जोमाने होतात. बौद्धिकदृष्ट्या कुपोषितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने ते गोड मानून घेतले जातात आणि त्यामुळे इतिहासाचे विद्रूपीकरण होते. ते टाळण्यासाठी सदरहू व्यक्तीचे मूळ लिखाण वाचणे आणि ते उद्धृत करणे उत्तम. पहिला मुद्दा डॉ. आंबेडकर आणि हिंदू धर्म. त्याचे उत्तर डॉ. बाबासाहेबांनीच नि:संदिग्धपणे दिलेले आहे. संदर्भ नाशिकजवळील येवला येथे १३ ऑक्टोबर १९३५ या दिवशी बाबासाहेबांनी केलेले भाषण. त्याचे महत्त्व त्या वेळी माध्यमांस लगेच कळले नाही. कारण त्या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर मुसोलिनीच्या फौजा इथियोपियाचा घास घेऊ पाहात होत्या आणि भारतात अ. भा. काँग्रेस समितीच्या आगामी अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्या’ची मागणी केली जाणार किंवा काय याबाबत उत्सुकता होती. त्यामुळे बाबासाहेबांच्या भाषणाकडे प्रारंभी दुर्लक्ष झाले. ‘‘हिंदू धर्म ज्यांस अस्पृश्य मानतो त्या समाजात माझा जन्म झाला, हे माझे दुर्दैव. पण ते माझ्या हाती नव्हते. तथापि मी हिंदू म्हणून जन्मास आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे निश्चित’’ असा दृढनिश्चय बाबासाहेबांनी या भाषणात व्यक्त केला. सुरुवातीला रामभाऊ तटणीस यांच्या ‘विविधवृत्त’ साप्ताहिकाने तेवढे हे भाषण छापले आणि नंतर ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ने ‘आंबेडकर थ्रोज बॉम्बशेल’ अशा मथळ्याने ते छापल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. तथापि बाबासाहेब ठाम होते आणि हिंदू धर्माविषयीचे त्यांचे मत कधीही बदलले नाही. त्याआधी १५ मार्च १९२९ या दिवशी ‘बहिष्कृत भारत’च्या अंकात बाबासाहेबांनी ‘हिंदू धर्मास नोटीस’ या शीर्षकाच्या स्वलिखित संपादकीयाद्वारे आपली दिशा स्पष्ट केली होती. त्या वेळी हिंदू धर्मातील स्वत:स सुधारणावादी म्हणवून घेणारे आपण किती सहिष्णु आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागले होते आणि अस्पृश्यता पाळू नये इत्यादी दावे करू लागले होते. सदर संपादकीयातून बाबासाहेबांनी या सर्वांचा समाचार घेताना ‘‘बहिष्कृत वर्गास हिंदू धर्माविषयी आपलेपणा का वाटावा’’ असे विचारत ‘शेळ्यांना लांडग्यांविषयी आपलेपणा वाटणे कधी संभवनीय आहे काय’ असा जळजळीत प्रश्न उपस्थित केला. ‘‘हिंदू समाजात धार्मिक सुधारणेखेरीज सामाजिक सुधारणा होणे शक्य नाही’’ हे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते. ते मांडताना बाबासाहेबांनी चोख संस्कृत दाखले दिले आणि ‘‘तत्त्वज्ञान काय चाटावयाचे आहे’’ असे विचारण्यास कमी केले नाही. हा इतिहास ज्यांस माहीत नाही, ते बाबासाहेबांचे आणि सावरकरांचे संबंध किती सौहार्दाचे होते, सावरकरांविषयी बाबासाहेबांस किती आदर होता इत्यादी दावे करतात. तो करणारे बाबासाहेबांनी सावरकरांस लिहिलेल्या एका पत्राचा आधार घेतात. रत्नागिरी येथील मंदिर अस्पृश्यांस खुले करण्याच्या समारंभासाठी सावरकरांनी डॉ. बाबासाहेबांस निमंत्रित केले होते. त्याबद्दल बाबासाहेबांनी या पत्रात सावरकरांचे आभार मानले, ते करीत असलेल्या सामाजिक सुधारणांच्या प्रयत्नांचे कौतुक केले परंतु सावरकरांच्या याबाबतच्या दृष्टिकोनावर आपले आक्षेपही नोंदवले. बाबासाहेब या पत्रात लिहितात: ‘‘केवळ अस्पृश्यता दूर करणे पुरेसे नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्थाच निकाली काढायला हवी… तुमच्या सामाजिक सुधारणांच्या प्रयत्नांविषयी आदर आहे; पण त्या प्रयत्नांबाबतची तुमची परिभाषा चातुर्वर्ण्य निदर्शक (चातुर्वण्य जार्गन) आहे’’ असे नमूद करून बाबासाहेबांनी हे निमंत्रण नाकारले, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणजे अस्पृश्यांस केवळ मंदिरात प्रवेश करू देणे केवळ प्रतीकात्मक ठरेल, ते पुरेसे नसून चातुर्वर्ण्य व्यवस्था समूळ नष्ट करायला हवी हे बाबासाहेब स्पष्टपणे नमूद करतात. याच मुद्द्यावर हिंदू महासभा आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे विचारही बाबासाहेबांस अमान्य होते. ‘सामाजिक समरसता’ वगैरे शब्दच्छल वरवरचा; त्या खालील जातव्यवस्था आणि जातीची मानसिकता तशीच, अशी त्यांची धारणा होती. याबाबत बाबासाहेबांची मते किती तीव्र असावीत? ‘‘अस्पृश्यांनी राष्ट्रद्रोह केला याची जबाबदारी मानवद्रोह करणाऱ्या धर्मपरंपेवर आहे’’ असे म्हणण्यास बाबासाहेब अजिबात कचरत नाहीत. ही बाब अत्यंत महत्त्वाची. याचे कारण हिंदू महासभेचे मदन मोहन मालवीय वा अन्य हे सुधारणावादी होते असे अलीकडे दाखवण्याची ‘फॅशन’ असली तरी प्रत्यक्षात ते तसे खरोखरच होते काय? काँग्रेसच्या अस्पृश्यताविषयक उपसमितीचे तत्कालीन प्रमुख असलेले मालवीय अस्पृश्यतेविषयीचा ठराव मांडताना म्हणाले : ‘‘तुम्ही अस्पृश्यांच्या मुली करा वा त्यांना आपल्या मुली द्या असे आमचे मुळीच म्हणणे नाही… तुमच्या घरात अस्पृश्यांना घेऊन जा, असे आम्ही म्हणत नाही… प्रत्येकाने आपल्या जातीचा अभिमान सोडावा असेही आम्ही म्हणत नाही. आमचे म्हणणे इतकेच की अस्पृश्यांना समान हक्क द्या’’. म्हणजे हिंदुत्ववाद्यांतील कथित सुधारणावादी जात व्यवस्थेची चौकट शाबूत ठेवून अस्पृश्यांना बरोबरीचे अधिकार ‘‘देऊ’’ इच्छित होते. त्यात आम्ही कोणास काही देत असल्याची मोठेपणाची अंगभूत, जातीभूत भावना होती. तर बाबासाहेबांचे मत ही चौकट पूर्णच मोडून टाकणे आवश्यक असे होते. बाबासाहेबांस ‘आपले’ ठरवण्याच्या अलीकडच्या प्रयत्नांत हे वास्तव दडवले जाते. ते करणाऱ्यांची राजकीय असाहाय्यता लक्षात घेतली तरी वास्तवाकडे लक्ष वेधणे आवश्यक. याआधी सावरकरांचा निवडक उदोउदो करणाऱ्यांचा कावा उघडकीस आणताना ‘लोकसत्ता’ने ‘नक्की कोणते सावरकर?’ असा प्रश्न १७ ऑक्टोबर २०१९ या दिवशीच्या संपादकीयातून विचारला होता. त्याच धर्तीवर डॉ. आंबेडकर यांस सरदार पटेल, नेताजी बोस यांच्याप्रमाणे ‘आपले’ ठरवण्याचे प्रयत्न होत असताना संबंधितांस नक्की ‘कोणते आंबेडकर’ असे विचारणे उचित ठरते. फक्त घटनाकार म्हणून डोक्यावर घ्यायचे आणि त्यांचे अन्य विचार चातुर्याने पायदळी तुडवायचे ही खरी आजची ‘फॅशन’. ती त्यागणे गरजेचे. None
Popular Tags:
Share This Post:
भारत सर्पदंशाची राजधानी म्हणून का ओळखला जातो? ही ओळख बदलण्यासाठी काय करता येईल?
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 24, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
Featured News
अन्वयार्थ: कट्टरपंथाला आवरण्यासाठी…
- By Sarkai Info
- December 23, 2024
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
- By Sarkai Info
- December 23, 2024
संविधान पायदळी तुडवून निवडणुकीचा खर्च आणि वेळ वाचवायचा आहे?
- By Sarkai Info
- December 20, 2024
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.
Popular News
Top Picks
भारतीय संविधानातील भारतीयतेचा प्रश्न!
- December 19, 2024
प्रश्न लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासाचा!
- December 19, 2024