SAMPADKIYA

उलटा चष्मा : ‘स्टॉक’ फस्त

‘तुम्हाला कळले कसे नाही की बँकॉक सेवेचा प्रारंभ आपण गुजरातमधून करतो आहोत म्हणून. देशातल्या बदललेल्या वातावरणाचा अभ्यास लोकांच्या संपर्कात येणाऱ्या तुमच्यासारख्यांनी करायलाच हवा. आता तेही तुम्हाला शिकवावे लागेल का?’ विमान कंपनीच्या परिचालन विभागाचे व्यवस्थापक कक्षात येरझारा घालत प्रश्नांची सरबत्ती करत होते व सुरत ते बँकॉक या शुभारंभाच्या विमानातील कर्मचारीवर्ग मान खाली घालून ऐकत होता. ‘या राज्याला, त्यातल्या लोकांना काहीही कमी पडू द्यायचे नाही, असा चंगच देशातील सर्वांनी बांधलाय, तोही २०१४ पासून. मग विमानात दारू कशी काय कमी पडली?’ यावर एक कर्मचारी म्हणाला. ‘सर, आपण आंतरराष्ट्रीय सेवेत ३०० आसनक्षमतेसाठी १५ लिटरच ठेवतो. तसे परिपत्रकच आहे कंपनीचे’ हे ऐकताच व्यवस्थापक पुन्हा भडकले. ‘या प्रकरणाचा गवगवा इतका झालाय की सरकार यात हस्तक्षेप करून ही लिटरची मर्यादासुद्धा वाढवू शकते. तेव्हा नाक कापले जाईल त्याचे काय? या विमानातील अनेकांनी दारू कशी काय संपली असे संदेश पोस्ट केलेत. काय उत्तर देणार त्यांना? जे पुढ्यात येईल ते फस्त करायचे. मग ते विरोधक असोत वा वस्तू, हाच या राज्यातील बहुसंख्यांचा स्वभाव. याची जाणीव साऱ्या देशाला गेल्या दहा वर्षांपासून होत असताना तुम्ही अनभिज्ञ कसे? जे काही भोगायचे ते मनसोक्त. मग ती सत्ता असो वा खाणेपिणे, हाच या सर्वांचा पिंड. जे हवे त्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नांची कसलीही कसर सोडायची नाही हाच या राज्याचा स्वभाव. त्यामुळेच त्यांनी प्रगती केली व आता देशाच्या प्रगतीला हातभार लावताहेत. हेही वाचा >>> चिप चरित्र: चिपपुरवठा साखळी आणि भारत देशाला विश्वगुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या लोकांनी साध्या दारूसाठी तक्रारी कराव्यात व त्याची कंपनीला दखल घ्यावी लागावी, हे अजिबात समर्थनीय नाही. याचा आणखी जास्त बभ्रा झाला तर काय परिणाम होईल हे ठाऊक आहे का तुम्हाला? भविष्यात आपली कंपनीच त्या पोर्टवाल्याच्या ताब्यात जाऊ शकते. मग काय कराल? सर्व काही करायचे पण बदनामीचा साधा डागही नको अंगावर या बाबतीत कमालीचे दक्ष असतात हे लोक. हे प्रकरण बाहेर आल्यापासून खालपासून वरपर्यंतचे लोक जाम चिडलेत. गुजरातमधून उड्डाण करतोय तेव्हा थोडा ‘स्टॉक’ जास्त ठेवला असता तर काही फरक पडला नसता. झाले असते विमान दोलायमान. अशावेळी परिपत्रके बाजूला ठेवावी लागतात हेही कळले नाही तुम्हाला? आणि खबरदार याचा संबंध त्या राज्यातील दारूबंदीशी जोडाल तर! जिथे बंदी असते तिथेच या गोष्टी मुबलक मिळतात. बंदीशी संबंध जोडून तुम्ही या राज्यालाच बदनाम करताहात. बदनामी हा अपमानाचाच एक भाग समजातात हे लोक. याचा बदला घ्यायचे त्यांनी ठरवले तर ही सेवाच काय कंपनीसुद्धा बंद पडू शकेल.’ असा इशारा देत व्यवस्थापक आतल्या कक्षात निघून गेले. मग सारे कर्मचारी बाहेर येऊन बँकॉकच्या दुसऱ्या फेरीच्या तयारीला लागले. सारा स्टॉक दुपटीने भरून झाल्यावर विमानाने आकाशात झेप घेतली. चार तासानंतर ते बँकॉकच्या सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा एकही प्रवासी जागचा हलेना इतके ते नशेत गुंग होते. अखेर व्हीलचेअरवर बसवून साऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यात प्रवासाएवढेच म्हणजे चार तास वाया गेले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.