बेशिस्त नागरी वर्तनामुळे होणारे अपघात भारतीयांस नवे नाहीत; मात्र हा गुण नौदलादी संरक्षण सेवांस लागू नये हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा असेल. गेल्या आठवड्यात मुंबईत एका ‘बेस्ट’ बसने नऊ-दहा जणांना चिरडले आणि बुधवारी एक फेरीबोट बुडून १३ जणांचे प्राण गेले. ‘बेस्ट’ बसच्या चालकास वाहनाचा वेग आवरता आला नाही आणि स्पीड बोटीच्या चालकासही बोटीचा वेग झेपला नाही. एक अपघात रस्त्यावरचा आणि दुसरा समुद्रातला. दोन्हींमागचे कारण तेच. वेग. बेस्ट बसचा चालक शिकाऊ होता तर स्पीड बोटचे इंजिन तसे होते. अलीकडे ‘बेस्ट’ बस ड्रायव्हरची भरती कंत्राटी होते. त्यामुळे त्या बस गाड्यांचे अपघात वाढत असल्याचे सांगितले जाते. पण हा असला शिकाऊपणाचा, कंत्राटी नियुक्त्यांचा आरोप नौदलास लागू होत नाही. तरीही प्रवासी बोटीवर नौदलाची स्पीड बोट आदळली. त्याआधी गेल्याच महिन्यात गोव्यानजीक मासेमारी बोटीवर एक पाणबुडी आपटली. यंदाच्याच जुलै महिन्यात नौदलाच्या ‘ब्रह्मपुत्रा’ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवर आग लागली आणि एक खलाशी गेला. काही वर्षांपूर्वी ‘सिंधुदुर्ग’ नामक युद्धनौकेवरील आगीत दोन नौदल अधिकाऱ्यांचे प्राण गेले. ‘सिंधुरक्षक’ नावाच्या पाणबुडीवर स्फोट होऊन तब्बल १८ नौसैनिक प्राणास मुकले. याखेरीज व्यापारी बोटी, तटरक्षक दलाच्या नौका इत्यादींत मुंबईच्या समुद्रात झालेले अपघात वेगळे. भारताचे नागरी जीवन अत्यंत बेशिस्त असते आणि त्यात अपघात नवे नसतात. पण नौदलाचे असे नाही. अत्यंत शिस्तबद्धपणे, सर्व नियमकानून यांचे पालन करत चोख प्रशिक्षणानंतर त्यांची भरती होते. तरीही हे इतके अपघात. हा तपशील येथे दिला त्यामागे नौदलाच्या अपघातांचे पाढे वाचणे हा उद्देश नाही. तर भारतीय नागरजीवनाचा गुण नौदलादी संरक्षण सेवांस लागतो की काय, ही भीती. तसे होऊ नये हीच इच्छा प्रत्येक भारतीयाची असेल. असे का म्हणायचे याचे उत्तर गेल्या पाच वर्षांत या महासत्ता वगैरे होणाऱ्या देशाने केवळ अपघातांत किती प्राण गमावले ही संख्या लक्षात घेतल्यास मिळेल. गेल्या पाच वर्षांत या देशात रस्ते अपघातांत तब्बल ७ लाख ७७ हजार ठार झाले. कोणत्याही महायुद्धात नाही, महासाथीत नाही; पण फक्त अपघातांत आपल्याकडे इतके जण गेले. हा तपशील संसदेत नुकताच दिला गेला. त्यामुळे त्याच्या सत्यासत्यतेबाबत शंका घेण्याचे कारण नाही. आणि दुसरे असे की भारतीय रस्त्यांवरील अपघातांची ही संख्या पाहून परदेशात मला लाज वाटते असे म्हणण्याची वेळ आपले महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यावरच आली. म्हणजे आपली याबाबतची कर्तबगारी किती ‘अतुलनीय’ आहे हे कळावे. देशातल्या सर्वात मोठ्या उद्याोग समूहाचा प्रमुख असो वा परदेश विद्याविभूषित शल्यक वा एखादा सामान्य नागरिक. रस्त्यावरच्या अपघातांबाबत आपल्याकडे ‘सर्व-वर्ग समभाव’ दिसून येतो आणि सगळ्याच वर्गातल्यांना त्याची झळ पोहोचते. ही समानता तशी वाखाणण्याजोगी म्हणायची. हे झाले जिवांचे. पण या जाणाऱ्या जिवांच्या बरोबरीने आर्थिक नुकसानही होत असते. एका आकडेवारीनुसार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील एक ते दीड टक्का आपण केवळ या अपघातांत गमावतो. यात जाणारे वा जायबंदी होणारे हे प्राधान्याने १५ ते ६० या वयोगटांतील असतात. म्हणजे हे तसे कमावते वय. त्याच वयात प्राण जाणे वा कायमचे अपंगत्व येणे हे संबंधित कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यास भगदाड पाडणारे असते. म्हणजे तेही आर्थिक नुकसान. शिवाय याच्या जोडीने विमा कंपन्यांस पडणारा भुर्दंड. अलीकडे अशा प्रत्येक अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांस पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे जण लाखा-लाखांच्या आर्थिक मदतीच्या घोषणा करत असतात. भले अपघात नागरिकांच्याच बेशिस्तीमुळे झालेला असो, तरीही अशा मदतींची घोषणा होते. ती करताना ही मंडळी दानशूरतेचा आव आणत असली तरी प्रत्यक्षात नुकसान होत असते ते कर भरणाऱ्या नागरिकांचे. त्यांनी प्रामाणिकपणे भरलेल्या करांस हे असे फाटे फुटतात. कर्जबुडव्यांनी केलेले नुकसान याच करदात्यांच्या जिवावर भरून काढले जाणार आणि अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना देणग्याही यातूनच दिल्या जाणार. अपघातांतील मृ्तांस अलीकडे किमान पाच लाख रुपयांची तरी मदत दिली जाते. गेल्या पाच वर्षांत यावर किती रक्कम खर्च झाली असेल याचा गुणाकार एकंदर अपघात बळींची संख्या माहीत असल्याने करता येणे अवघड नाही. बेशिस्त, बेदिली आणि बेमुर्वतखोरी ही या अपघातांमागील प्रमुख कारणे. आपण इतके बेशिस्त की प्राणिसंग्रहालयात गेलो की इतके माकडचाळे करणार की पिंजऱ्यातील माकडे शहाणी वाटावीत. माशांना/ पक्ष्यांना फरसाण खायला घालणार आणि स्वत:च्या खादाडीच्या खरकट्या खुणा तशाच मागे सोडणार. रस्त्यांवरून सर्रास ‘राँग साइड’ने वाहने चालवणार आणि अमुक-तमुक नेत्यामुळे परदेशात आपली प्रतिमा किती उंचावली त्याच्या बाता मारणार. काही गू-घाण घटकांपासून बनवलेल्या पानमसाल्यांचे तोबरे भरून पावलोपावली पिंका टाकणार आणि देश किती प्रगती करतो आहे त्याच्या बतावण्या करणार. सामाजिक शिस्त नाही. इतरांची मते, त्यांचा पैस, त्यांचा शांततेचा अधिकार याबद्दल काडीचीही अक्कल नाही आणि ती पुढील किमान शतकभर तरी येईल अशी लक्षणे नाहीत. ‘आधीच मर्कट त्यात मद्या प्याला’ या धर्तीवर आधीच हे आपण असे. आणि त्यात हातोहातीच्या मोबाइलचे कॅमेरे. त्यामुळे रील्स आणि सेल्फीची वाढती महासाथ. या तुलनेत करोना-काळ बरा म्हणायचा. त्या विषाणूस रोखण्याची लस तरी होती आणि प्रसंगी माणसांना डांबण्याची सोयही होती. तथापि अक्कलशून्यतेच्या आनुवंशिक व्याधीस रोखणारी लस अद्याप तरी विकसित झालेली नाही, हे आपले दुर्दैव. त्यामुळे घात असो वा अपघात, बारसे असो वा बारावे सेल्फी काढणाऱ्यांची वा रील बनवणाऱ्यांची कमतरता अजिबात नाही. खरे तर आपणास बघावयास, आपण कोणत्या वेळी काय करतो, काय खातो, काय पितो, कोणते कपडे घालतो, इत्यादी जाणून घेण्यात इतरांना रस आहे असे मानण्यास आणि त्यानुसार समाजमाध्यमांवर स्वत:चे सतत अपडेट देण्यास उच्च दर्जाची निर्बुद्धता हवी. ती किती मुबलक आहे हे आसपास सहज नजर टाकली तरी कळावे. प्रसंग कोणताही असो हे सेल्फीत्सुक वा रीलकर्ते तेथे हजर. अशा विसविशीत वातावरणात नागर शिस्त येणार कशी? अशी शिस्त समाजात निर्माण व्हावी यासाठी घराबाहेर पडताना आत्मकेंद्रितता सोडण्याची सवय लहानपणापासूनच अंगात बिंबवावी लागते आणि नियमांचा आदर करणे अंगी बाणवावे लागते. हे कसे होणार? आपल्या सुपुत्र/ सुपुत्रीस शाळेत सोडायला जाणारे त्या पाल्याचे तीर्थरूप वा मातोश्री सर्रास दुचाकी ‘राँगसाइड’ने रेटत असतील तर या कुलदीपक/ दीपिकांवर वाहतूक नियमांचे कोणते संस्कार झालेले असतील? सामाजिक प्रामाणिकपणा अंगी असेल तर ही अशी अनेक उदाहरणे प्रत्येकांस देता येतील. कारण ती सर्रास आढळतात आणि ती अन्य कोणाची नाही. तर ती आपलीच आहेत. अशा उदाहरणांनी खच्चून भरलेला आपला समाज! तो सुधारावा याची गरजच कोणास नाही. राजकीय सुधारणांआधी सामाजिक सुधारणा हव्यात असे म्हणणारे गोपाळ गणेश एखादेच. बाकी सर्व आमचे आम्ही आणि आपले कर्तृत्व काहीही नाही अशा मुद्द्यांवर गर्व से कहो आरोळ्यांत मशगूल! अशा वातावरणात सामाजिक सुरक्षा वाऱ्यावर सोडली जाऊन अपघातांची संख्या वाढतीच असेल तर त्यात नवल ते काय? तेव्हा; मुंबईलगतच्या समुद्रात बुडणारी बोट पाहून संत तुकारामांचे ‘बुडती हे जन / देखवेना डोळा’ ही ओळ आठवणेही नवल नाही. None
Popular Tags:
Share This Post:
भारत सर्पदंशाची राजधानी म्हणून का ओळखला जातो? ही ओळख बदलण्यासाठी काय करता येईल?
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 24, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
Featured News
अन्वयार्थ: कट्टरपंथाला आवरण्यासाठी…
- By Sarkai Info
- December 23, 2024
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
- By Sarkai Info
- December 23, 2024
संविधान पायदळी तुडवून निवडणुकीचा खर्च आणि वेळ वाचवायचा आहे?
- By Sarkai Info
- December 20, 2024
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.
Popular News
Top Picks
भारतीय संविधानातील भारतीयतेचा प्रश्न!
- December 19, 2024
प्रश्न लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासाचा!
- December 19, 2024