‘कोणते आंबेडकर?’ हा अग्रलेख (२३ डिसेंबर) वाचला. गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त विधानात योग्यच म्हटले की, आज राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव ‘फॅशन’ म्हणून वापरू लागले आहेत. बहुसंख्य पक्ष आंबेडकरांच्या नावाचा उपयोग केवळ मतांसाठी करतात, त्यांच्या विचारांशी तादात्म्य साधत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा बचाव करताना या वादाचे खापर काँग्रेसवर फोडले. त्यांनी डॉ. आंबेडकरांना कमी लेखल्याचा आरोप पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसवर ठेवला. सत्ताधाऱ्यांवर कोणी टीका केली, तर ती मान्य करून सुधारण्याऐवजी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या चुका उकरून काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जेव्हा इतिहासातील घटनांचे दाखले दिले जातात, तेव्हा स्वत:च्या चुकाही अपरिहार्यपणे समोर येतात. उदाहरणार्थ, आंबेडकरांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलाचा हिंदू महासभा, आरएसएस आणि जनसंघ या संघटनांनी प्रखर विरोध केला होता, याचा भाजपला विसर पडला आहे. आंबेडकरांना हिंदू कोड बिल संमत होण्यासाठी थांबायचे नव्हते आणि जवाहरलाल नेहरूंना कट्टर हिंदुत्ववाद्यांचा विरोध शांत करण्यासाठी थोडा वेळ हवा होता. परिणामी डॉ. आंबेडकरांनी निराश होऊन मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. महान व्यक्तिमत्त्वांचे जीवन अनेकविध पैलूंनी भरलेले असते. त्यात सकारात्मक आणि नकारात्मक बाजू असतात. त्यांना एका विशिष्ट चौकटीत बसवणे योग्य नाही. त्यांच्या गुणांप्रमाणेच त्यांच्या त्रुटींचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. इतिहासाचा अभ्यास करताना व्यक्तीला देवदूत किंवा निर्दोष प्रतिमेत सादर करण्याऐवजी त्यांच्या संपूर्ण योगदानाचा आणि वास्तवाचा आदर करावा. यातून एक महत्त्वाचा धडा घेतला पाहिजे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारधारा आपल्या महान व्यक्तिमत्त्वांना विसरते, तेव्हा इतर पक्ष त्यांचे ‘अपहरण’ करून त्यांचा वापर करतात. सरदार वल्लभभाई पटेल यांचे उदाहरण हे दाखवते. गांधीवादी आणि कट्टर काँग्रेसी असलेल्या पटेल यांनी नेहरूंना मोठे नेते मानले आणि आरएसएसवर बंदी घातली होती. तरीही, आज भाजपने त्यांना आपले प्रतीक मानले आहे आणि त्यांच्या प्रतिमेला राजकीय स्वरूप दिले आहे. काँग्रेस जर इंदिरा-राजीव यांच्या प्रेमात एवढी गुरफटून गेली नसती, आणि सरदार पटेल यांना पूर्णपणे विसरली नसती, तर पटेल किंवा इतर नेत्यांचे राजकीय अपहरण होऊ शकले नसते. लोकशाहीत आदर्श, प्रतीके आणि महान व्यक्तिमत्त्वांकडे दुर्लक्ष करणे हा मोठा धोका ठरतो. त्यामुळे राजकीय विचारधारांनी आपल्या नेत्यांच्या वारसाचा आदर राखत त्यांचे योग्य मूल्यमापन करावे. असे न केल्यास, ते वारस ज्या हेतूने निर्माण झाले तो हेतू बाजूला पडतो आणि त्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेतला जातो. ● तुषार रहाटगावकर, डोंबिवली हेही वाचा >>> लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार? ‘ कोणते आंबेडकर ?’ हा संपादकीय लेख (२३ डिसेंबर) वाचला. संसदेतील राज्यघटनेवरील चर्चेच्या उथळ खेळात गृहमंत्री अमित शाह यांनी स्वर्ग मिळवण्यासाठी आंबेडकर यांच्याऐवजी ईश्वर नामाचा जप करण्याचा सल्ला देणे ही सहज केलेली टिप्पणी म्हणता येणार नाही. भाजपला जगातील मोठा पक्ष बनवणारे ते चाणक्य म्हटले जातात. त्यामुळे त्यांच्या टिप्पणीमागे निश्चित योजना असावी. हिंदूराष्ट्रासाठी धार्मिक अल्पसंख्याकांचा द्वेष तंत्राने बंदोबस्त केल्यानंतर आरक्षणावर हल्ला करून दलितांकडे तर मोर्चा वळवला नाही ना? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ या उद्गारात सारे स्पष्ट होते. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या निवडणुकीतील पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडल्याने ना बाबासाहेब आपलेसे होतील ना त्यांचे वैचारिक वारसदार. इतिहास असो की शास्त्र असो त्यामधील सत्य चिरकाल टिकणारे असते. तसेच खरे आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग जगाला माहीत आहेत. त्यांना भाजप आपलेसे करून शकणार नाही. ● अॅड. वसंत नलावडे , सातारा ‘ कोणते आंबेडकर ?’ हा अग्रलेख (२३ डिसेंबर) वाचला. आपणच आपल्या स्वार्थी राजकीय अस्तित्वासाठी व बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक पोकळी भरून काढण्यासाठी एक चौकट तयार करावी आणि इतिहासातील महापुरुषांना त्या चौकटीत बसवावे, असे काहीसे सध्या सुरू आहे. यातून ना गांधी वाचलेत, ना नेहरू, ना सावरकर, ना डॉ. बाबासाहेब आंबेडकर. एकदा हे महापुरुष ‘आपलेसे’ करून घेतले की आपोआप त्यांना मानणारा समाज आपलासा होतो व निवडणुकांच्या बेरीज-वजाबाकीत त्यांना कसेही फिरवता येते, असा हा साधा ठोकताळा. राजकीय डावपेचांत महापुरुषांनी तहहयात मांडलेल्या विचारांची मोडतोड करून समाजमन आपल्या पद्धतीने वळवणे, हाच या साऱ्यामागचा उद्देश. याला कोणतेच राजकीय पक्ष अपवाद नाहीत. त्यांनी ‘कोणते आंबेडकर?’ या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, तरी ‘कशासाठी आंबेडकर?’ हे जनतेपासून लपून राहू शकत नाही. ● अविनाश सोनटक्के ‘ लाल किल्ला ’ सदरातील ‘शहांची कोंडी आणि भाजपा सैरावरा’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (२३ डिसेंबर) वाचला, मात्र पंतप्रधानांच्या भाषणाने नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी यांना आरोपीच्या पिंजऱ्यांत उभे केले आणि काँग्रेसला दणके दिले, हा निष्कर्ष पटला नाही. मोदींमध्ये सत्याचा अपलाप जादूगाराप्रमाणे करण्याचे कौशल्य थोड्याफार प्रमाणात आहेच, मात्र महुआ मोइत्रा, प्रियंका गांधी, अमोल कोल्हे, इकरा हसन, ओवेसी, मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडलेली मते मोदींनी केलेल्या भाषणाच्या तुलनेत अधिक अर्थपूर्ण होती. संसदेतील चर्चांचा दर्जा उंचावणारी होती. हेच भाजप खासदार आणि सभापती व अध्यक्षांना सहन होत नव्हते. माध्यमांनी अमित शहा यांच्या डॉ. आंबेडकरांवरील टिप्पणीला अधिक प्रसिद्धी दिली आणि मुद्देसूद चर्चा लपवून ठेवली. ● जयप्रकाश नारकर , वसई ‘ शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!’ हा महेश सरलष्कर यांचा ‘लालकिल्ला’ सदरातील लेख (२३ डिसेंबर) वाचला. पट्टीचा पोहणारासुद्धा बुडू शकतो; असे म्हणतात, तद्वतच भाजपची बाजू सदैव खंबीरपणे मांडून विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे भाजपचे हुकमी एक्का अमित शहा हे स्वत:च विरोधकांच्या तावडीत अलगद सापडले. लोकसभेत नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडत समस्त नेहरू-गांधी परिवाराला लक्ष्य केले. अमित शहांनी मात्र विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत दिले. भाजपला याची सवय व अपेक्षा नसल्याने असेल, पण या घटनेने भाजप सैरभैर झाला आहे. रेटून व सातत्याने बाजू मांडत राहिल्याने भाजपची यातून सहीसलामत सुटका होईलही, पण शहांना वाचवण्याच्या नादात पक्षाने स्वत:ची पुरती नाचक्की करून घेतली. ● बेन्जामिन केदारकर , नंदाखाल (विरार) ‘ कट्टरपंथाला आवरण्यासाठी… ’ हा ‘अन्वयार्थ’ (२३ डिसेंबर) वाचला. गेले काही दिवस संघप्रमुख जी वक्तव्ये करत आहेत त्यावरून संघाच्या विविध उपशाखा हाताबाहेर जात असल्याची जाणीव त्यांना झाल्याचे दिसते. एकदा लेकरे मोठी होऊन कमवू लागली की पालकांचे ऐकेनाशी होतात. आपल्याला आता पालकाची गरज नाही असा त्यांचा समज होतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता भाजपला संघाची गरज नाही, अशा अर्थाचे जे वक्तव्य केले ते याचेच निदर्शक होते, पण तिथे ठेच लागल्यावर संघाची मनधरणी करावी लागली. संघाचे अपत्यप्रेम उफाळून आले आणि संघाने लेकराच्या चुका पदरात घालून हरियाणा व महाराष्ट्रात सत्ता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. संघालाही आपली विचारधारा रुजवण्यासाठी सत्ता ताब्यात असणे आवश्यक आहे. म्हणून संघाने अधूनमधून कानपिचक्या देणे व तिकडे कानाडोळा करत संघाच्या अन्य शाखांनी आपली धोरणे पुढे चालवणे सुरूच राहील असे दिसते. ● डॉ. किरण गायतोंडे , चेंबूर (मुंबई) None
Popular Tags:
Share This Post:
भारत सर्पदंशाची राजधानी म्हणून का ओळखला जातो? ही ओळख बदलण्यासाठी काय करता येईल?
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 24, 2024
-
- December 23, 2024
-
- December 23, 2024
Featured News
अन्वयार्थ: कट्टरपंथाला आवरण्यासाठी…
- By Sarkai Info
- December 23, 2024
लोकमानस: राज्यात आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्षच होणार?
- By Sarkai Info
- December 23, 2024
संविधान पायदळी तुडवून निवडणुकीचा खर्च आणि वेळ वाचवायचा आहे?
- By Sarkai Info
- December 20, 2024
Latest From This Week
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.
Popular News
Top Picks
भारतीय संविधानातील भारतीयतेचा प्रश्न!
- December 19, 2024
प्रश्न लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासाचा!
- December 19, 2024