KOLHAPUR

जीवदान मिळालेली ‘दुवा’च ठरली योजनेची सदिच्छा दूत; मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीचा संस्मरणीय प्रवास

कोल्हापूर : वर्षभरापूर्वी जन्म झाल्यावरच तिची एका दुर्धर आजाराबरोबर लढाई सुरू झाली. घरची हलाखीची स्थिती आणि उपचारासाठी आवश्यक डोंगराएवढा खर्च यामुळे त्या कुटुंबावर मुलीच्या जन्माच्या आनंदापेक्षा संकटाचे आभाळच कोसळले. मात्र, या दरम्यानच तिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळीच मदत मिळाली, डॉक्टरांनीही प्रयत्नांची शर्थ केली. ही मुलगी दुर्धर आजारातून पूर्ण बरी झाली. पुढे मुख्यमंत्र्यांनीच तिचे ‘दुवा’ असे नामकरणही केले. ज्या योजनेमुळे तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे हसू पुन्हा उमटले त्याच योजनेची सदिच्छा दूत म्हणून ‘दुवा’ची आज निवड जाहीर झाली आहे. कागल येथे राहणारे सादिक आणि फरहीन मकूबाई या दाम्पत्याला गेल्या वर्षी ८ मार्चला महिला दिनी मुलगी झाली. दुर्दैव असे, की जन्मत:च तिला फुफ्फुसाच्या गंभीर आजाराचे निदान झाले. स्थानिक आमदार हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून उपचार व्हावेत यासाठी पत्र दिले. कागदपत्रांमध्ये गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. ही समस्या कुटुंबीयांनी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे यांना कळवली. त्यांनी ही अडचण दूर केली. बालिकेवर तीन आठवडे उपचार सुरू होते. चार लाखांचा खर्च झाला. तो मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आला. या सर्व उपचारांमध्ये कोल्हापुरातील साईस्पर्श रुग्णालयातील डॉक्टरांनीदेखील शर्थीची लढाई केली. त्यातून ही मुलगी मृत्यूच्या दाढेतून परतली. हेही वाचा >>> शिरोळमध्ये ट्रॅक्टर नदीत उलटून एकाचा मृत्यू , दोघे बेपत्ता दरम्यान, गेल्या जूनमध्ये कोल्हापुरात ‘मुख्यमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमासाठी एकनाथ शिंदे आले होते. तेव्हा या वेळी या मदतीची जाणीव ठेवून मकूबाई दाम्पत्याने आभार व्यक्त करणारे पत्र त्यांना दिले. या वेळी तिचे नामकरण अद्याप केले नसल्याचे या दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांना सांगितले. तेव्हा शिंदे यांनीच तिचे ‘दुवा’ असे नामकरण केले. या वर्षी ८ मार्च रोजी मुख्यमंत्री शिंदे कोरोची गावी आले, तेव्हा ‘दुवा’चा पहिला वाढदिवसदेखील त्यांनी केक कापून जाहीरपणे साजरा केला. ज्या योजनेमुळे दुवाचे आणि तिच्या कुटुंबीयांचे हसू पुन्हा उमटले, त्याच योजनेची सदिच्छा दूत म्हणून आज तिची निवड जाहीर झाली आहे. हेही वाचा >>> ख्यातनाम चित्रकार सुधा मदन यांचे निधन या उपचारामुळे फरहीन या इतक्या प्रभावित झाल्या, की त्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या कागल तालुक्यासाठीच्या प्रसारप्रमुख म्हणून प्रभावीपणे काम करत आहेत. आता त्यांची मुलगी ‘दुवा’ ही या योजनेची सदिच्छा दूत बनल्याने मकुबाई दाम्पत्य भारावले आहे. ज्या योजनेमुळे आमच्या मुलीला जीवदान मिळाले त्याच्या प्रसाराचे काम आम्ही मनापासून करू, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यापासून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या कामाला गती आली आहे. वैद्यकीय सेवा कक्षाचे काम यापूर्वी आम्ही गतीने केले होते. माझ्याच मतदारसंघातील दुवा या कन्येला या योजनेची सदिच्छा दूत नियुक्त करून कागलचा गौरव करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. – पालकमंत्री हसन मुश्रीफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गेल्या वर्षभराच्या भाषणात दुवाचे आजारपण, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून केलेली मदत, त्यातून तिला मिळालेली संजीवनी याचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्यामुळे तिलाच सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्याचा विचार पुढे आला. आज ते प्रत्यक्षात उतरले आहे. अलीकडेच ‘दुवा’ला डेंग्यू झाला होता, तेव्हा तिची भेट घेऊन खेळणी दिली होती, असे मंगेश चिवटे यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.