समीर जावळे Shyam Benegal : श्याम बेनेगल गेले.. म्हणजे काय झालं? म्हणजे सिनेसृष्टीला फुटलेला समांतर सिनेमाचा ‘अंकुर’ ज्याचा वृक्ष झाला तो उन्मळून पडला. श्याम बेनेगल गेले म्हणजे ‘कलयुग’चं स्वप्न ज्या डोळ्यांनी पाहिलं, सत्यात उतरवलं ते डोळे मिटले. श्याम बेनेगल गेले म्हणजे त्यांची ‘झुबेदा’ कायमची पोरकी झाली. समांतर सिनेमा आणि त्यासाठीचं जगणं काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं होतं. एकीकडे तिकिटबारीवर व्यावसायिक यश मिळवणारे अनेक चित्रपट तयार होत असताना एक विचार देणारा, समाजातल्या समस्यांवर, समाजातल्या घडामोडींवर भाष्य करणारा सिनेमा श्याम बेनेगल यांनी कायमच दिला. श्याम बेनेगल यांचं हे असं जाणं आपल्यापैकी कुणालाच मान्य नाही. किमान आत्ता जे चाळिशी-पन्नाशीत आहेत त्यांना तर मुळीच नाही. कारण सिनेमा पाहण्याचा कलात्मक दृष्टीकोन काय असतो तो श्याम बेनेगल यांनी शिकवला. इतकंच नाही तर त्यांचा चित्रपट आहे म्हणजे तो उत्तमच असणार, याची खात्री असते. कलाकारांपेक्षा दिग्दर्शकाच्या नावाने सिनेमा ओळखला जाणं हे त्या सिनेमाचं भाग्य असतं. श्याम बेनेगल यांनी असे अनेक चित्रपट दिले. त्यांचं योगदान प्रचंड हाशब्द थिटा वाटावा इतकं मोठं आहे. साधारणपणे प्रेक्षकांना जो कळत नाही तो सिनेमा म्हणजे समांतर सिनेमा असा एक समज श्याम बेनेगल या सगळ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात उतरले तेव्हा होता. आजही अनेकांना असंच वाटत असेल की जे कळत नाही ते तयार केलं की ते कलात्मक किंवा वास्तवदर्शी असतं. श्याम बेनेगल यांचे चित्रपट या कल्पनेला, व्याख्येला छेद देणारे ठरले. ‘अंकुर’ हा श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट. यात भूमिका करणाऱ्या शबाना आझमी यांचाही हा पहिलाच चित्रपट. शबाना आझमींना ‘अंकुर’मधल्या ‘लक्ष्मी’च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा सिनेमा जमीनदार आणि त्याच्याकडे काम करणारा मजूर वर्ग यांच्यातल्या परस्पर संबंधांवर आणि संघर्षावर बेतलेला होता. मूक-बधिर नवऱ्याचा सांभाळ करणारी लक्ष्मी (शबाना आझमी), जमीनदार सूर्याचं (अनंत नाग) तिच्यावर जडलेलं प्रेम आणि नंतर होणारा विदारक शेवट हे सगळं यात पाहण्यास मिळालं आहे. श्याम बेनेगल यांचा हा सिनेमा आजही एक यशस्वी समांतर सिनेमा म्हणून ओळखला जातो. तसंच या सिनेमापासून एक समीकरण तयार झालं ते होतं श्याम बेनेगल यांचा चित्रपट आणि राष्ट्रीय पुरस्काराचं. त्यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘अंकुर’ आणि ‘निशांत’ या दोन चित्रपटांना घवघवीत यश मिळालं. समांतर सिनेमा असूनही त्यांची चर्चा झाली. पुढच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाआधी तुमच्या डोक्यात हवा गेली होती का? किंवा तुमच्यात एक प्रकारचा अहंकार आला होता का? असं विचारलं गेलं तेव्हा श्याम बेनेगल म्हणाले, “सर्वसाधारण वयाच्या तिशीपर्यंत अनेक माणसांना अहंकार हा असतोच. कदाचित माझ्यातही तो असेल. पण तो दाखवण्यापेक्षा मी तो लपवणं पसंत केलं. मी स्वतःचा शोध घेत होतो. पण मी आत्मकेंद्री नव्हतो. सध्याच्या घडीला लोक आत्मकेंद्री झाले आहेत. स्मार्टफोन आणि कॅमेरे असलेले फोन आल्याने माणूस आत्मकेंद्री झाला आहे आणि बराचसा स्वार्थी झाला आहे. मात्र ही काही चांगली बाब नाही.” असं उत्तर श्याम बेनेगल यांनी दिलं. ऑक्टोबर महिन्यात श्याम बेनेगल यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांना हेदेखील विचारण्यात आलं की तुम्ही आत्तापर्यंत जे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत त्यापैकी तुमचा नावडता असा कुठला चित्रपट आहे का? त्यावर ते म्हणाले, “होय मी दिग्दर्शित केलेले सगळे चित्रपट. मी त्या चित्रपटांवर नाखुश नाही पण कलाकाराने समाधानी असता कामा नये या उर्जेतून आणि प्रेरणेतूनच मी काम करत राहिलो. मी माझ्या चित्रपटांसह स्वतःला शोधत होतो. चित्रपट तयार करणं हे माझ्यासाठी सोपं होतं. मात्र त्यासाठी माझा अंतर्गत संघर्ष सुरु होता.” असं श्याम बेनेगल यांनी म्हटलं होतं. ओम पुरी की नसीरुद्दीन शाह यांच्यापैकी बेस्ट कोण? असं विचारलं तेव्हा श्याम बेनेगल म्हणाले होते, “दोघंही उत्तम अभिनेते आहेत. त्यांच्या पातळ्यांवर ते उत्तमच काम करत. नसीरला तुम्ही एखादी भूमिका दिलीत को तो त्याचा खूप अभ्यास करायचा. त्या भूमिकेचे सगळे पैलू कसे उलगडता येतील त्यावर लक्ष केंद्रीत करायचा. स्वतः कधी कधी एकटाही रहायचा. ओमचं तसं मुळीच नव्हतं. ओम भूमिका अगदी सहजपणे करायचा आणि ती देखील तितकीच सुंदर, बघत रहावी अशी. जेव्हा ओम इतक्या सहजपणे अभिनय करायचा तेव्हा नसीर तयारी करत असायचा. मात्र दोन्ही माझे सारखेच आवडते अभिनेते आहेत” श्याम बेनेगल हे एक मनस्वी कलावंत म्हणूनच जगले. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्हाला समांतर सिनेमाचे जनक असं म्हटलं जातं. त्यावर त्यांनी चटकन उत्तर दिलं, “कुणीतरी समांतर सिनेमा हा शब्द शोधून काढला आहे. समांतर म्हणजे काय तर व्यावसायिक सिनेमापेक्षा वेगळा सिनेमा असं लोक सांगतात किंवा यातून मनोरंजन होत नाही असंही त्यांना वाटतं. त्यामुळे मला कधीही मी समांतर सिनेमा करतोय असं वाटलंच नाही. मी जे काही चाकोरीबद्ध चित्रपट त्या काळात येत होते त्यापेक्षा वेगळं काहीतरी दिलं असंच मला वाटतं. “ श्याम बेनेगल यांनी चित्रपट दिग्दर्शनापूर्वी जाहिरात विश्वात भरपूर काम केलं होतं. त्यांना जवळपास १ हजार जाहिराती तयार करण्याचा अनुभव होता. तो गाठिशी घेऊन ते चित्रपट दिग्दर्शनात उतरले. त्यांनी समांतर सिनेमाही यशस्वी होऊ शकतो, त्यातूनही मनोरंजन होऊ शकतं हे दाखवून दिलं. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’, ‘कलयुग’, ‘मंडी’, ‘सूरज का सातवा घोडा’, ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ अशी नावं घेता येतील. ‘कलयुग’ हा चित्रपट त्यांच्या सगळ्या चित्रपटांपैकी आणखी खास ठरतो. याचं कारण या चित्रपटाला महाभारताची पार्श्वभूमी होती. महाभारतातील प्रमुख पात्र डोळ्यांसमोर ठेवून या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली. शशी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. शशी कपूर, अनंत नाग, कुलभूषण खरबंदा, राज बब्बर, रेखा, व्हिक्टर बॅनर्जी, विजया मेहता, सुप्रिया पाठक, ए. के. हंगल, अमरिश पुरी, आकाश खुराणा आणि ओम पुरी अशा कलाकारांची फौज होती. हा चित्रपट १५२ मिनिटांचा आहे मात्र तो विचार करायला भाग पाडतो आणि आपलं रंजनही घडवतो. या सगळ्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा म्हणजे खरंच पर्वणी आहे. ‘मंडी’ या श्याम बेनेगलांच्या चित्रपटात देहविक्री करणाऱ्या महिलांवर भाष्य आहे. स्मिता पाटील, शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह या चित्रपटांत प्रमुख भूमिकेत आहेत. देहविक्रीला नावं ठेवणारेच कसा त्याचा आधार घेतात आणि स्वार्थ साधतात याचं नग्न सत्य दाखवणारा हा चित्रपट आहे. तर स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भूमिका’ हा चित्रपट एका मराठी अभिनेत्रीची कहाणी दाखवणारा आहे. व्यावसायिक चित्रपटांपेक्षा वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न हा श्याम बेनेगल यांनी कायमच केला आहे. त्यांचे चित्रपट त्याची साक्ष पटवत कायमच आपल्याला प्रेरणा देत राहतील. या चित्रपटांसह आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेली ‘भारत एक खोज’ ही मालिका. The Discovery Of India या पंडीत नेहरुंनी लिहिलेल्या पुस्तकाचं हिंदी रुपांतरण म्हणजे ‘भारत एक खोज.’ अगदी पुराण काळापासून म्हणजेच रामायण, महाभारतापासून ते स्वातंत्र्यापर्यंतचा काळ, घडलेल्या घटना या काही भागांमध्ये बसवून त्याची गोष्ट सांगणं हे आव्हानही श्याम बेनेगल यांनी लीलया पेललं. या मालिकेत दोन ते तीन भाग हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी नसीरुद्दीन शाह आणि औरंगजेबाच्या भूमिकेसाठी ओम पुरी असे कलाकार तुम्ही घेतले होते तुमच्या डोक्यात तेव्हा धर्म आला नाही का? असं विचारलं असता श्याम बेनेगल म्हणाले होते, “माणसाने आपला धर्म आपल्या घरी, आपल्या हृदयात ठेवावा. कलाकाराला धर्म नसतो. नसीरुद्दीनने छत्रपती शिवरायांची भूमिका उत्तमपणे साकारली आणि औरंगजेब ही भूमिका ओमने उत्तम केली आहे. त्यात धर्म येतो कुठे? माझ्या डोक्यात या अशा गोष्टी कधीही आल्या नाहीत.” चित्रपट आणि मालिका दिग्दर्शन करणं आणि त्यातही वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात राहतील ज्यांचे संदर्भ अभ्यासले जातील असे चित्रपट दिग्दर्शित करण्याचं शिवधनुष्य श्याम बेनेगल यांनी लीलया पेलून दाखवलं. अजरामर कलाकृती देणाऱ्या श्याम बेनेगल यांचा श्वास थांबला आहे. मात्र त्यांच्या या चित्रपटांच्या रुपाने कायमच ते आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहतील. परवाच झाकीर हुसैन यांचं निधन झालं संगीतविश्व हळहळलं. आता श्याम बेनेगल गेले आणि समांतर सिनेमा पोरका झाल्याची जाणीव श्याम बेनेगल यांच्या कलाकृती आवडणाऱ्या त्यांच्याविषयी प्रेम, आदर असणाऱ्याला झाली. अशा घटना घडल्या की पु. ल. देशपांडे यांच्या रावसाहेब कथेतलं वाक्य आठवत राहतं, “आमची छोटीशी आयुष्य समृद्ध करायला देवाने दिलेल्या या देणग्या! न मागता दिल्या होत्या, न सांगता परत नेल्या.” None
Popular Tags:
Share This Post:
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
December 24, 2024Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
December 24, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 24, 2024
-
- December 24, 2024
-
- December 23, 2024
Featured News
Latest From This Week
४ वर्षांनी हाथीराम चौधरी पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘पाताल लोक २’ कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
MANORANJAN
- by Sarkai Info
- December 23, 2024
Subscribe To Our Newsletter
No spam, notifications only about new products, updates.