MARATHI

100 वर्षांपासून सुरु आहे 'हा' प्रयोग! आणखी 100 वर्ष सुरु राहणार World's Longest Experiment

World Longest Experiment Running For 100 Years: जगात सर्वाधिक काळ सुरु असलेल्या प्रयोगाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. हा प्रयोग ऑस्ट्रेलियातील क्विन्सलॅण्ड विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केला आहे. ऑस्ट्रेलियामधील हा प्रयोग मागील 100 वर्षांपासून अधिक काळ सुरु आहे. या प्रयोगाचं नाव, 'पीच ड्रॉप एक्सपिरिमेंट' ('Pitch Drop Experiment') असं आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग अजून 100 वर्ष सुरु राहणार आहे. हा प्रयोग 1927 साली ऑस्ट्रेलियन भौतिक शास्त्रज्ञ थॉमस पारनील यांनी सुरु केला. या प्रयोगामध्ये पीच नावाच्या पदार्थाची फ्लुएडीटी आणि हाय व्हेलॉसिटी म्हणजेच तरलता आणि उच्च चिकटपणाची चाचणी घेतली जात आहे. पीच हा पदार्थ टार म्हणजेच डांबरापासून बनवलेला पदार्थ असून तो तरलतेच्या बाबतीत म्हणजेच वाहण्याच्या गुणधर्माबाबतीत जगातील सर्वात घट्ट पदार्थ आहे. हा पदार्थ पूर्वी जहाजांच्या वॉटरफ्रुफींगसाठी वापरला जायचा. पारनील यांनी पीचचा एक तुकडा गरम केला आणि तो एका नरसाळ्यामध्ये ओतला. हे नरसाळं त्यांनी हवा बंद केलं. त्यानंतर पुढील तीन वर्षात हे गरम पीच पूर्णपणे थंड झालं. 1930 साली त्यांनी नरसाळ्याचं काही भाग कापला आणि तो पदार्थ कधी वाहत येतो याची चाचणी सुरु केली. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, "या प्रयोगाचा सेटअप प्रदर्शनासारखा लावला आहे." तसेच या सेटअपसाठी काही विशेष वातावरण किंवा इतर गोष्टींची तरतूद करण्यात आलेली नाही. उलट या प्रयोगाचा सेटअप एका केबिनमध्येच असून तो उघड्यावरच ठेवण्यात आला आहे. या पीचवर तापमान आणि वातावरणाचा परिणाम व्हावा असं अपेक्षित असल्याने या सेटअपच्या आजूबाजूला विशेष कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. पारनील यांच्या मृत्यूनंतर प्राध्यापक जॉन मेडस्टोन यांनी या प्रयोगाचे अधिकार स्वत:कडे घेतले. त्यांनी हा प्रयोग 1961 रोजी स्वत:च्या देखरेखीखाली घेतला. तेव्हापासून पुढील 52 वर्ष त्यांनीच हा प्रयोग संभाळला. या नरसाळ्यामधून पीच हळूहळू बाहेर येत आहे. या पीचचा पहिला थेंब बाहेर पडण्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागला असून अन्य पाच थेंब पडण्यासाठी पुढचे 40 वर्ष लागले. सध्याच्या अपडेटनुसार आतापर्यंत या नरसाळ्यातून पीचचे 9 थेंब पडले असून या आगामी 10 वर्षांमध्ये अजून एक थेंब पडणं अपेक्षित आहे. या प्रकल्पाची गुंतागुंत पाहता कोणीही प्रत्यक्षात या पीचचा थेंब पडताना पाहिलेला नाही. खरं तर पीचकडे पाहिल्यावर तो स्थायू पदार्थ वाटेल. हातोडीने तो तोडता येईल. मात्र या प्रकल्पामुळे पीचची तरलता ही पाण्याच्या तुलनेत 100 बिलियन पट असल्याचं दिसून आलं आहे. तसेच या नरसाळ्यामध्ये एवढं पीच शिल्लक आहे की पुढील 100 वर्षांपर्यंत हा प्रयोग सुरु ठेवता येणार आहे. 2005 साली जॉन मेडस्टोन आणि थॉमस पारनील (मरणोत्तर) यांना या प्रकल्पासाठी आयजी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. खरं तर हा पुरस्कार अशा विचित्र प्रकल्पांसाठी दिला जातो जे ऐकून लोकांना हसू येतं मात्र हे प्रकल्प लोकांना विचार करायलाही भाग पाडतात. आयजी नोबेल पुरस्कार आणि नोबेल पुरस्कार हे दोन वेगळे पुरस्कार आहेत हे इथे नमूद करणे महत्त्वाचे ठरते. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.