WOMEN

निसर्गलिपी : झुलत्या रचना…

कमीत कमी जागेत अधिक आणि सोयीची सजावट करायची असेल तर हँगिंगना पर्याय नाही. यात आपण आपल्या आवडीची इनडोअर किंवा आऊटडोअर दोन्ही पद्धतीने वाढणारी झाडे लावू शकतो. त्यासाठी विविध हँगिंग बास्केट, मातीच्या आकर्षक कुंड्या, नारळाच्या काथ्यांचे अस्तर असलेल्या कुंड्या… असे पर्याय उपलब्ध असतात. एवढंच नाही तर अडकविण्यासाठी साखळी, विणलेल्या जाळ्या, तारांचे आकर्षक होल्डर असं बरंच काही मिळू शकतं. आपली आवड, सवड, जागा आणि बजेटप्रमाणे निवडीला भरपूर वाव असतो. झुलत्या रचनेसाठी झाडं निवडताना थोडी काळजी घ्यावी लागते. कारण या कुंड्यामधील झाडे ही कायम आकर्षक दिसणं गरजेचं असतं. बाग कामाचा फारसा अनुभव नसेल किंवा मग हाताशी फारसा वेळ नसेल तर मनी प्लांट हे हँगिंगमधे लावण्यासाठी उत्तम असं झाडं आहे. ते विविध रंग आणि प्रकारात सहज उपलब्ध होतं आणि विशेष देखभाल न करताही उत्तम वाढतं. मनी प्लांटची तजेलदार पानं नुसती पाहिली तरी मनाला आनंद होतो. वेलवर्गीय वनस्पतींचा या रचनांमध्ये उत्तम उपयोग होतो. मग लाल नाजूक फुलांची गणेश वेल असो की वेलवर्गीय मोगरा असो. या शिवाय सदाहरित अशा पुष्कळ वनस्पती आहेत- ज्या आपण या रचनांमध्ये वापरू शकतो. यात खायच्या पानांचा वेल लावता येईल. हृदयाकार अशी याची गर्द हिरवी पानं दिसायला फार सुंदर दिसतात, शिवाय औषधी वनस्पती म्हणून याचा उपयोग होतो तो वेगळाच. आणखी वाचा- बिनधास्त, निसर्गप्रेमी मलाइका वाझ सगळ्या प्रकारची सक्युलंटस् म्हणजेच रसाळ वनस्पती आपण यात लावू शकतो. यामधे पोरच्युलाका म्हणजे ऑफिस प्लांटचा विशेष उल्लेख करावा लागेल. पोरच्युलाकाला फार सुंदर नाजूक फुले येतात. यात रंगाची विविधताही खूप असते. नुसत्या छोट्या कटींग ने ही सहज वाढवता येते. थोडी कल्पकता दाखवली तर आजकाल ज्याला ब्रम्हकमळ म्हणतात ते मुळात सक्यूलंट या प्रकारात मोडणारं झाडं आहे. ते आपण हँगिंगमध्ये सहज लावू शकतो. जेड किंवा फॉर्च्यून प्लांट हाही यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हँगिंग सेक्युलंटस् मधे स्प्रिंग ऑफ पर्ल्स चा उत्तम उपयोग होतो. फक्त थोडी अधिक काळजी घेण्याची तयारी मात्र हवी. जरा महाग विकली जाणारी अशी ही नाजूक वेल वाढवताना तिच्या छोट्या तुकड्या पासून आपण अनेक रोपे तयार करू शकतो. नेचेवर्गीय वनस्पतीं म्हणजेच फर्नस्चा हँगिंगमध्ये उत्तम वापर करता येतो. यात स्टॅगहॉर्न फर्न फारच सुंदर दिसतं. या शिवाय सिलाजीनिलिया आणि नेप्रोलेपिसचे प्रकारही लावता येतात. फुलांच्या ताटव्यासारखी रचना करता येणारी झाडं लावायची असतील तर पेटूनियाच्या सगळ्या व्हरायटी लावता येतील. बेगोनिया, पेनसी हाही उत्तम पर्याय ठरेल. आणखी वाचा- दिव्यांगांना हक्काचं काम मिळवून देणारी अलीना… सदाहरित व नस्पतींमध्ये वॅक्स प्लांट, पोथाज् फिलोडेनड्रोन यातही ब्राझिल फिलोडेनड्रोन फारच उत्तम दिसतं. वरील सगळ्या वनस्पती या नर्सरीमध्ये सहज मिळू शकणाऱ्या आहेत. एकतर या आपण छोट्या रोपांच्या रूपात आणून आपल्याला हव्या त्या आकाराच्या कुंडीत लावू शकतो किंवा मग हँगिंग साठीच्या तयार कुंड्याही नर्सरीत मिळतात. फक्त होतं काय की, आपण हौसेने ही तयार रोपं आणतो, त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पाणीसुद्धा देतो. सूर्यप्रकाश किती हवा याची गणितही जुळवतो. काही दिवस ही झाडं सुरेख वाढतात आणि मग अचानकच ती सुकून जातात. मग त्या रिकाम्या हँगिंग बास्केट आपल्या मनाला त्रास देत रहातात. हा प्रकार मुळीच जमणारा नाही म्हणून आपण एक तर तो सोडून देतो किंवा मग अशा प्रकारच्या रचना करण्याच्या फंदातच पडत नाही . असं का होतं तर नर्सरीमध्ये या रोपांसाठी मोठ्या प्रमाणावर कोकोपीट वापरलं जातं. कोकोपीट म्हणजे नारळाच्या शेंड्यांचा चुरा. कोकोपीट पाणी धरून ठेवतं शिवाय कुंडीचं वजनही यामुळे कमी होतं. वहातूक आणि देखभाल सोयीची व्हावी म्हणून खरं तर नर्सरीमध्ये कोकोपीट वापरतात. तात्पुरत्या वाढीसाठी ते उपयोगी ही ठरतं. पण आपल्याला ते झाड कायमस्वरूपी वाढवायचं असतं, अशावेळी ते कोणत्या वर्गात मोडणार आहे, त्याला किती पाणी आणि सूर्यप्रकाश हवा हे नीट समजून घ्यायला हवं. त्या रोपांच्या प्रकाराप्रमाणे मातीही तयार करायला हवी. मग ही झाडं उत्तम वाढतील. पुढच्या लेखात झुलत्या कुंड्यांमधील झाडांची माती कशी तयार करायची आणि कोणती विशेष काळजी घ्यायची ते आपण पाहू. mythreye.kjkelkar@gmail.com None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.