WOMEN

स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?

‘पाणी वा गर्भजल कमी झालंय का?’ मग उगाच रिस्क घेऊन एखाद्या बाईची प्रसूती नॉर्मल होण्याची वाट पाहण्यापेक्षा ‘सिझेरियन’ करून टाका डॉक्टर,’असा प्रस्ताव नातेवाईकांकडूनच येऊ शकतो. परंतु वास्तव काय आहे? बाळ जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटातील गर्भजलाचं वा पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे ‘सिझेरियन’चं प्रमाण वाढू शकतं. पण फक्त ‘पाणी कमी झालंय’ या एकमेव निकषावर ‘सिझेरियन’ करण्याचा सल्ला दिला जात नाही. ‘गर्भजल कमी झालंय,’ असा सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे, हे आताच्या काळात गर्भवती आणि तिच्या नातेवाईकांना सहज लक्षात येतं. अर्थातच, त्यांची चिंता वाढते. ‘बाळ सुरक्षित आहे ना? काही काळजीचं कारण नाही ना?’ असे प्रश्न विचारले जातात. पाणी कमी झाल्यामुळे बाळाला ‘धोका’आहे, प्रसूती ‘नॉर्मल’ होण्याची वाट बघण्यापेक्षा ‘सिझेरियन’ केलेलं जास्त बरं राहील,’ असं डॉक्टरकडून सुचवलं जाऊ शकतं किंवा ‘पाणी कमी झालंय का? मग उगाच रिस्क घेऊन नॉर्मल होण्याची वाट पाहण्यापेक्षा ‘सिझेरियन’ करून टाका डॉक्टर,’असा प्रस्ताव नातेवाईकांकडूनच येऊ शकतो. वास्तविक पहाता, फक्त पाणी कमी झालंय या फक्त एका निकषावर ‘सिझेरियन’ करण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जात नाही. आईच्या पोटात बाळ, निसर्गनिर्मित एका पाण्याच्या पिशवीत वाढत असतं. गर्भाभोवताली असणाऱ्या पाण्याला गर्भजल किंवा amniotic fluid असं म्हणतात. गर्भ हा ९ महिने पाण्यातच असतो. गर्भजलाचं प्रमाण मोजण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी सोनोग्राफी करताना गर्भजल निर्देशांक (Amniotic Fluid Index-AFI) मोजला जातो. गर्भावस्थेच्या २८ ते ४० आठवड्यापर्यंतच्या कालावधीत गर्भजलाचं प्रमाण ५ से.मी.पेक्षा कमी असल्यास ‘पाणी कमी झालंय,’असं म्हणतात. ‘पाणी कमी’ होण्याच्या या परिस्थितीला oligohydramnios असं म्हणतात. हे प्रमाण ५ ते ८ से.मी. असल्यास, ‘पाणी’ कमी होण्याच्या बेतात आहे असं म्हणायला हरकत नाही. हेही वाचा : ‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये एकदा का ‘पाणी कमी आहे किंवा कमी होण्याच्या बेतात आहे,’ असं लक्षात आलं, की सहाजिकच गर्भवती किंवा तिच्या नातेवाईकांकडून ‘काही काळजीचंच तर कारण नाही ना डॉक्टर?’ असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस गर्भ किती आठवड्याचा आहे यावर अवलंबून असतं. समजा ३७ आठवडे पूर्ण झालेल्या कालावधीत पाणी कमी झालंय असं लक्षात आल्यास कळा येण्याचं इंजेक्शन देऊन प्रसूती (induction of labour) नैसर्गिक मार्गाने व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. या प्रक्रियेत बाळाच्या हृदयाचे ठोक्यांची गती अनियमित होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून देखील ‘सिझेरियन’ करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. ‘सिझेरियन’चा निर्णय घेण्यासाठी आणखी काही गोष्टी विचारात घेतल्या जातात. गर्भधारणेच्या कालावधीत बीपी वा रक्तदाब वाढल्यामुळे देखील गर्भजलाचं प्रमाण कमी होऊ शकतं. गर्भवतीचं बीपी वाढलं आहे आणि गर्भजलाचं प्रमाण कमी झालेलं असताना ‘सिझेरियन’ची शक्यता जास्त असते. गर्भजल कमी असल्यामुळे बाळाचं ‘फिरणं’ कमी होत असतं. अशा परिस्थितीत बाळ समजा ‘पायाळू’ आहे तर ते फिरून परत डोक्याकडून होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे देखील ‘सिझेरियन’ करावं लागतं. गर्भधारणेच्या ३० व्या आठवड्यात जर गर्भजल कमी प्रमाणात आहे असं आढळल्यास, काही स्त्रियांमध्ये औषोधोपचाराने आणि आहारात योग्य ते बदल केल्याने ‘पाणी’ वाढू शकतं. गर्भाच्या वाढीवर या परिस्थितीचा विपरीत परिणाम होऊ शकतो. बाळाच्या वाढण्याची गती कमी होते, कमी वजनाचं, अशक्त बाळ जन्माला येऊ शकतं. असं बाळ नॉर्मल डिलिव्हरीचा ताण सहन करू शकणार नाही, या कारणासाठी ‘सिझेरियन’ करावं लागतं. जसजसे नऊ महिने नऊ दिवस भरतात आणि प्रसूतीचा दिवस जवळ येतो, तसं गर्भजलाचं प्रमाण कमी-कमी होत जातं हा निसर्ग नियम आहे. काही गर्भवतींना, बाळंतपणाची अपेक्षित तारीख उलटून जाऊन एक दोन आठवडे देखील बाळंतपणाच्या कळा सुरु होत नाहीत. या केसेसमध्ये गर्भजलाचं प्रमाण खूप कमी होऊ शकतं, बाळाला होणारा रक्तपुरवठा पुरेसा होत नसल्यामुळे, बाळाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते म्हणून देखील ‘सिझेरियन’चा निर्णय घ्यावा लागतो. हेही वाचा : काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना… ‘गर्भजल कमी झालंय’ या एकमेव कारणासाठी ‘सिझेरियन’ केलं जाण्याचं प्रमाण वाढत आहे, असं एका अभ्यासात लक्षात आलं आहे. गर्भजलाचं प्रमाण नॉर्मल असणाऱ्या गर्भवतींच्या तुलनेत, प्रमाण कमी असणाऱ्या स्त्रीची ‘सिझेरियन’ची शक्यता ४० टक्क्यांनी वाढते. गर्भजल कमी असणाऱ्या गर्भवतीचं बाळंतपण नॉर्मल होऊन बाळ सुखरूप जन्माला येऊ शकतं, असं अभ्यासाअंती आढळून आलं आहे. पण रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर यांपैकी ‘रिस्क’ कुणालाच घ्यायची नसल्यामुळे गर्भजल कमी असताना ‘सिझेरियन’ करण्याचा ‘सहज’ निर्णय घेतला जात आहे. ( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.) atnurkarkishore@gmail.com None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.