WOMEN

‘मॉर्निग सिकनेस’चा सामना कसा कराल ?

गर्भधारणेची ‘गुड न्यूज’ बऱ्याच स्त्रियांसाठी सकाळी उठल्याबरोबर मळमळ, उलटीचा त्रास घेऊनच येते. एका बाजूला गर्भधारणा राहिल्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला मळमळ, उलटीचा त्रास सहन करणं, अशा दुहेरी परिस्थितीतून त्या स्त्रीला जावं लागतं. हा त्रास तसा कमी अधिक प्रमाणात दिवसभर होत असला तरी सकाळच्या वेळी जास्त असतो म्हणून या त्रासाला ‘मॉर्निग सिकनेस’ असं म्हणतात. साधारणतः ७० टक्के गर्भवतींना हा त्रास होतो. पहिल्या गर्भधारणेच्या वेळेसच ‘मॉर्निग सिकनेस’ होण्याचं प्रमाण अधिक असतं. गर्भवतींच्या बाबतीत या जवळपास अपरिहार्य असलेल्या समस्येचा सामना कसा करावयाचा, याबद्दलची माहिती, पहिलटकरीण असलेल्या महिलेस आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांना, विशेषतः नवऱ्याला, आईला आणि सासूबाईंना असणं गरजेचं आहे. हे ही वाचा… निसर्गलिप : कोकोडेमा तंत्राने घरात फुलवा बाग… ‘मॉर्निग सिकनेस’चा त्रास मासिकपाळी चुकल्यानंतर लगेचच चार-दोन दिवसात सुरु होऊ शकतो आणि गर्भ जवळपास चार महिन्याचा (१६ आठवडे) होईपर्यंत राहू शकतो. त्यानंतरही काही गर्भवतींना हा त्रास होऊ शकतो, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी असतं. मळमळ, उलटीच्या या त्रासाची तीव्रता प्रत्येक गर्भवतीच्या बाबतीत वेगवेगळी असू शकते. काही जणींना सकाळी थोडंफार मळमळल्या सारखं होतं आणि नंतर दिवसभर काही त्रास होत नाही. काही जणींना अगदी थोडं खाल्लं, (उदा अर्धी पोळी) तरी लगेच काहीही खायला नकोसं वाटतं. काहीजणींना फोडणीचा वास देखील सहन होत नाही, त्या स्वयंपाक करत असताना अगदी किचनमध्ये उभं देखील राहू शकत नाही. काही जणींना त्यांची आई किंवा सासू ‘हिला सारख्या उलट्या होत आहेत, पाणी देखील पचत नाही’ अशी तक्रार घेऊन डॉक्टरांकडे जातात, अशीही काही जणींची अवस्था असते. मासिकपाळी चुकलीय आणि सोबत मळमळ उलटी होत आहे हे सोनोग्राफीचं तंत्रज्ञान उपलब्ध होण्याच्या अगोदरच्या काळात गर्भधारणा असल्याचं लक्षण समजलं जात असे. हिंदी चित्रपटात तर त्याचा हमखास वापर होतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात होणारा हा त्रास आपोआप कमी झाला नाही तर एखादी ठराविक गोळी सुरु करावी लागते. गोळी घेतल्याने हा त्रास आटोक्यात राहू शकतो, मात्र पूर्णपणे कमी होत नाही. काहींना गोळी घेण्यासोबत आहारात काही बदल करण्यासाठी डॉक्टर सुचवतात. या त्रासासाठी सहसा Doxylamine आणि जीवनसत्व बी ६, या औषधांचं मिश्रण असलेली गोळी सकाळी उठल्यानंतर, दात घासल्यावर, उपाशीपोटी घोटभर पाण्यासोबत घ्यावी. त्यानंतर दिवसाची सुरुवात काहीतरी कोरड्या गोष्टीने करावी, उदा. चार-पाच गोड बिस्किटे खावीत किंवा चार-सहा काजू-बदाम वगैरे सुकामेवा खाल्ला तरी चालतो. शक्यतो, सकाळची सुरुवात मळमळ-उलटीचा त्रास कमी होईपर्यंत दूध,चहा, कॉफीने करू नये. शिळं काही खाऊ नये. पोहे, उपमा, इडली-वडा सारखे सर्वसामान्यपणे नाश्त्यात खाण्यात येणारे पदार्थ देखील टाळावेत. सकाळी ९ ते १० च्या दरम्यान भाजी-पोळी, वरण-भात किंवा खिचडी या ताज्या अन्नपदार्थाने सुरुवात करावी. काही स्त्रियांना असे बदल करून देखील त्रास होतो, त्यांनी कोरडे पदार्थ खाण्यावर भर द्यावा, उदा. भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, खोबरं गुळाच्या खड्यासोबत संथगतीने खावेत. नारळ पाणी, सरबत, ताक वगैरे सारखी पेयं देखील जरूर प्यावीत, पण ते देखील घोट-घोट करून प्यावं. गटागटा प्यायल्याने लगेच उलटी होण्याची शक्यता असते. इतकं करून देखील उलटी झाल्यास घाबरू नये. डॉक्टरांनी उलटी होऊ नये यासाठी दिलेली गोळी घ्यावी, किमान तासभर काही खाऊ-पिऊ नये, नंतर पुन्हा काही खाण्याचा प्रयत्न करावा. एखादीचा ‘मॉर्निंग सिकनेस’ अजिबातच थांबला नाही तर मात्र तिच्यावर रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागतात. या उलटीचा अती होणाऱ्या त्रासाला वैद्यकीय परिभाषेत Hyperemesis Gravidarum असं म्हणतात. जुळे किंवा द्राक्ष गर्भ (Molar Pregnancy) असल्यास मळमळ उलटीचा त्रास जास्त होतो. हे ही वाचा… अमृततुल्य आईच्या दुधाचे दान करणारी ॲलिसे ‘मॉर्निंग सिकनेस’चा त्रास का होतो याचं नक्की शास्त्रीय कारण सांगता येत नाही. शरीरात व्हिटॅमिन बी ६ ची कमतरता असल्यास हा त्रास होतो असं आढळून आलं आहे. ‘मॉर्निंग सिकनेस’चा आणि मानसिक ताणाचा संबंध असतो असं देखील आढळून आलं आहे. अनेक वर्षाच्या वंध्यत्वाच्या कालावधीनंतर गर्भधारणा राहिल्यास एक वेगळी उत्तेजना (excitement) असते, त्यावेळेस किंवा मनाविरुद्ध गर्भ वाढवावा लागत असेल तर एक प्रकारचं नैराश्य (depression) आल्यामुळे मळमळ, उलटीचं प्रमाण जास्त असू शकतं किंवा अपेक्षित १६ आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत हा त्रास राहू शकतो. त्यामुळे गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करून घेणे गरजेचे आहे. ( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.) atnurkarkishore@gmail.com None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.