WOMEN

‘ग्रे डिव्होर्स’चा विचार करताय?

आयुष्य एकमेकांबरोबर घालवलं असलं तडजोडी केल्या असल्या, तरी आयुष्याचा उत्तरार्ध आनंदात घालवावा असं प्रत्येकाला वाटत असतं. जेव्हा नात्यात तडजोड अजिबात शक्य नाही असं वाटलं की जोडपं ‘ग्रे डिव्होर्स’कडे वळू शकतं. “अनिका, मला आज क्रिकेट मॅच बघायची आहे. त्यामुळं नेहमीची मालिका बघता येणार नाही हे आधीच तुझ्या आईला सांगून ठेव.” साठीचा अनुराग आपल्या ५८ वर्षांच्या बायकोला अनिकाला सांगत होता. “तिला तिची मालिका चुकली की खूप अस्वस्थ वाटतं. अर्धा तासानं काय होणार आहे? आपल्या घरात जेष्ठ व्यक्ती आहे तर त्याचा विचार आधी करायला हवा.” “मी विचार करत नाही का त्यांचा? सकाळी उठल्यापासून तर तुझ्या आईच्या म्हणण्यानुसार घरात सगळ्या गोष्टी होतात. पहाटे पासून त्यांचं भक्तिसंगीत सुरू होतं. त्यांना लवकर जाग येते,पण त्या आवाजानं माझी झोप मोडते, त्याचं काय? त्यांना आवडतात तिच गाणी घरात ऐकावी लागतात. ब्रेकफास्ट त्यांना जो आवडतो, त्यांच्या डाएट नुसार जो चालतो तोच घरात होणार. जेवताघटनाही त्यांच्याच आवडीच्या त्याच त्याच भाज्या सध्या घरात होत आहेत. त्यांना नॉनव्हेज चालत नाही म्हणून माझंही नॉनव्हेज खाणं बंद. संध्याकाळी आपण दोघं फिरायला बाहेर पडायचो. गप्पा मारायचो ते सर्व तर आता बंदच झालं आहे. रात्री एखादा सिनेमा बघत छोटा पेग घेईन म्हटलं तर त्याचं नाव काढणं म्हणजे महापाप. मी रिटायर्ड झाल्यानंतर माझ्या इच्छेनुसार मस्त निवांत लाईफ एन्जॉय करू असं ठरवलं होतं, पण तुझ्या आईला तू इथं आणून ठेवलंस आणि एखाद्या बंदिशाळेत मी राहतोय असं मला वाटू लागलं आहे. प्रत्येक गोष्टीत माझ्यावर बंधनं. अरे यार, माझ्याच घरात मला माझ्या मनासारखं राहण्याची चोरी? आणि एवढं करूनही मी त्यांचा विचार करत नाही असं तुझं म्हणणं आहे?” हेही वाचा : महिलांचा वारसाहक्क… “अनुराग, मला माहिती आहे. माझ्या आईचं माझ्याजवळ राहणं तुम्हांला खुपतंय. तुम्ही नेहमीच तिचा राग राग करता. माझे बाबा गेल्यानंतरही इतके दिवस ती एकटीच रहात होती. जावयाच्या घरात रहायचं नाही. हे तिचे जुने विचार, पण आता तिचंही वय झालंय. तिला एकटं ठेवणं योग्य नाही. माझ्याशिवाय तिला कोण आहे? कशी तरी समजूत घालून तिला आपल्याकडं घेऊन आले आहे, तर तुमचं वागणं असं?” “ अनिका, तुझ्या आईमुळं माझ्याच घरात मी पाहुण्यासारखा वागतोय. मला माझं स्वातंत्र्य मिळतं नाहीये आणि वर तू मलाच दोष देतेस? तुझी आई प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते. माझ्या भावाचा फोन आला आणि मी त्याच्याशी बोलत असतो तेव्हा हातात जपमाळ असली तरी लक्ष माझ्याकडं असतं. परवा माझ्या जुन्या मैत्रिणीचा फोन आला आणि आम्ही एकमेकांशी हसून बोलत होतो, तर लगेच येऊन तुझे कान भरले. माझी भाची शिक्षणासाठी आपल्याकडं राहायला येणार होती, तर तरुण मुलींची जबाबदारी घेऊ नका, त्यापेक्षा तिला हॉस्टेलवर राहू दे, तिथं बंधनात राहील, असं कोण म्हणालं? तुझी आईच ना?अनिका, मला आता या गोष्टीचा वैताग आलाय, एक तर तुझी आई या घरात राहील नाहीतर मी.” “अनुराग, काहीतरी कारणांवरून तुम्हांला भांडण काढायचं असतं. मी आता माझ्या आईला एकटं सोडणार नाही. ती माझ्यासोबतच राहील.” “मग, आई सोबतच जाऊन राहा आणि मला एकदाचा घटस्फोट देऊन टाक. मी आताच माझ्या वकील मैत्रिणीला बोलावून घेतो आणि घटस्फोटाचे पेपर तयार करून घेतो, मग आयुष्यभर तुझ्या आईला सांभाळत बैस.” “आता या वयात तुम्ही घटस्फोटाची भाषा करता?” हेही वाचा : निसर्गलिपी : झाडे लावा, पण थोडा अभ्यासही करा‌! “आता ग्रे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे, नसलं पटत तर मन मारून जबरदस्तीने कशाला एकत्र रहायचं? त्यापेक्षा वैवाहिक बंधनातून मोकळं झालेलं बरं.” “ इतकं सहजपणे बोलता तुम्ही? आयुष्य तुमच्यासोबत काढलं आणि आता वयाची पन्नाशी ओलांडल्यावर तुम्हाला घटस्फोट देऊ? ‘ग्रे डिव्होर्स’ ही संकल्पना वाढत असेलही, पण ती आपल्या सर्वसामान्यांसाठी नाही. सेलिब्रेटी, उच्चभ्रू समाजात पाश्चात्य समाजाचे अनुकरण चालू आहे. ते ग्रे डिव्होर्सबाबत बोलत असतीलही, पण आपल्या संस्कृतीमध्ये हे एकमेकांना समजावून घेण्याचं परिपक्व वय आहे. मी लग्नानंतर आई वडिलांचं घर सोडून तुमच्या घरी आले. अनेक गोष्टीत मन मारून जगले, तुमच्यासाठी, सासु-सासऱ्यांसाठी ,मुलांसाठी सगळं केलं. तेव्हा मला माझं स्वातंत्र्य मिळावं, हा हट्ट मी केला नाही आणि आता मुलं मोठी झाली. खऱ्या अर्थानं एकमेकांसोबत राहण्याची वेळ आली आणि तुम्ही घटस्फोटाची भाषा करता? मला काय हवं आहे हे कधी विचारलंत?” अनिका डोळ्यात पाणी आणून आयुष्याचा पाढा वाचत राहिली. ती खूपच ‘सेंटी’ झालेली बघून अनुरागलाही वाईट वाटलं. तिचं बोलणं संपतच नव्हतं. त्याने तिचे हात हातात घेतले आणि तिला थांबवत तो म्हणाला, “अनिका, रागाच्या भरात बोललेलं सगळंच काही खरं नसतं. तू तुझं करिअर बाजूला ठेवून आत्तापर्यंत घर सांभाळलंस, मला साथ दिलीस, म्हणूनच तर मी माझी नोकरी पूर्ण करू शकलो. रडू आवर,आईची जेवणाची वेळ झाली, त्यांना औषधाच्या गोळ्या द्यायच्या आहेत. आपण पुन्हा वेळ मिळाल्यावर भांडू. अनुराग जे काही बोलत होता ते ऐकून त्याही परिस्थितीत रडता रडतातच अनिकाला हसू आवरलं नाही, पण आईची काळजी घेताना आपल्याला नवऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याच्या घरात त्याला परकं वाटू नये याची काळजी घ्यायला हवी आणि काही गोष्टी आईलाही समजावून सांगायला हव्यात याची जाणीव तिला झाली. (लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.) (smita joshi606@gmail.com) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.