WOMEN

स्त्री आरोग्य – ओटीपोटीदुखीने त्रस्त आहात ?

अनेक स्त्रिया ओटीपोटदुखीच्या समस्याने त्रस्त असतात. ओटीपोट कोणत्या कारणाने दुखत आहे याचं निदान कधी-कधी लगेच होत नाही. निदान नीट झालं नाही तर उपचार समाधानकारक होणार नाहीत. त्यामुळे ओटीपोटात दुखत असणाऱ्या स्त्रिया अनेक महिने वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाऊन, त्रास कमी न झाल्यामुळे कंटाळून जातात. याचा परिणाम त्यांच्या दैनंदिनीवर होऊन चीड-चीड वाढू शकते. प्रत्येक ओटीपोटदुखी मासिकपाळीशी किंवा गर्भाशय आजाराशी संबंधित असेलच असं नाही. काही वेळेस अन्य काही कारणांमुळे देखील ओटीपोटात दुखू शकतं. हा त्रास असलेल्या स्त्रियांना आपलं ओटीपोट सारखं का दुखतंय, याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. मासिकपाळी किंवा प्रजननसंस्थेशी संबंधित जी कारणं आहेत, त्यात प्रामुख्याने गर्भाशयात होणारं इन्फेक्शन महत्वाचं. जसं हवेतून रोगजंतू श्वासाद्वारे श्वसनसंस्थेत प्रवेश केल्यामुळे, ताप, सर्दी खोकला वगैरे त्रास होतो, तसं रोगजंतू योनिमार्गाद्वारे गर्भाशयात प्रवेश करतात. त्यामुळे गर्भाशयावर सूज येणं, दुखणं हा प्रकार सुरु होतो. नेमीच्या गोळ्या-औषधाने कमी झालं तर ठीक, नाहीतर ते रोगजंतू गर्भाशयात, गर्भनलिकेत,स्त्री-बीजांड कोषात वास्तव्य करून बसतात. या इन्फेक्शनचं रूपांतर दीर्घकालीन किंवा गुंतागुंतीच्या (chronic) इन्फेक्शनमध्ये होतं. मासिकपाळी येण्याच्या काही दिवस अगोदर गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा वाढत असल्यामुळे गर्भाशय, गर्भनलिका आणि स्त्री-बीजांडकोश हे सारे अवयव ताणले जातात. त्यामुळे ओटीपोटदुखी मासिकपाळीच्या काही दिवस अगोदर तीव्र होते. मासिकपाळीचा रक्तस्राव सुरु झाल्यानंतर हा ताण कमी होतो, म्हणून पाळी आल्यानंतर ओटीपोटात दुखण्याची तीव्रता कमी होते. आणखी वाचा- तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस… योग्य प्रतिजैविकाची (antibiotics) निवड करून योग्य कालावधीसाठी ते दिल्यानंतर इन्फेक्शन कमी होऊन ओटीपोटदुखी थांबते. गर्भपिशवीत असणाऱ्या फायब्रॉईडच्या गाठींमुळे देखील ओटीपोटात दुखू शकतं. एन्डोमेट्रिओसिस आणि अडोनोमायोसीस नावाचा गर्भाशयाशी संबंधित समस्येमुळे देखील ओटीपोटात सतत दुखत असतं. या आजारात मासिकपाळी अनियमित होऊन अधिकचा रक्तस्राव होऊ शकतो. स्त्रियांमध्ये सर्वसाधारण शस्त्रक्रिया उदा. सिझेरियन, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया किंवा गर्भाशय काढून टाकण्याचं शस्त्रक्रिया नंतर सर्वांना नाही, पण काही स्त्रियांना आतडी आणि पोटाच्या आतलं अस्तर चिकटल्यामुळे adhesions निर्माण होतात. त्यामुळे देखील ओटीपोट दुखू शकतं. त्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया करून निर्माण झालेली adhesions कापून काढावी लागतात. ओटीपोट दुखण्याचं कारण जर पचनसंस्थेशी असेल तर दर महिन्याला दुखण्याचं काही कारण नाही. पचनसंस्थेशी संबंधित अगदी नेहमीचं कारण म्हणजे दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे रोगजंतू आतड्यात प्रवेश करतात. योग्य उपचार न झाल्यास बरेच दिवस तिथे वास्तव्य करून राहातात आणि अधून मधून डोकं वर काढतात. पचनसंस्थेशी संबंधित असलेल्या पोटदुखी सोबत साधरणतः मळमळ, उलटी, भूक मंदावणं, आव किंवा रक्तमिश्रित शौचास होणं अशा तक्रारी असतात. ओटीपोट लघवीच्या किंवा मुत्राशयाशी संबंधित कारणांमुळे देखील दुखू शकतं. ओटीपोटदुखीसोबत लघवी करताना आग होणं किंवा लघवीसाठी वारंवार जावं लागणं अशी तक्रार असू शकते. आणखी वाचा- स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे? स्त्रियांमध्ये मुत्राशयाचं इन्फेक्शन होणं ही एक सामान्य बाब आहे. या इन्फेक्शन किंवा रोगजंतूंच्या प्रादुर्भावावर योग्य ती प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) योग्य त्या कालावधीसाठी दिल्यास लघवीचा त्रास कमी होतो आणि ओटीपोटदुखी देखील थांबते. कधी कधी लघवीसंबंधी थेट तक्रार नसतानादेखील मुत्राशयाचं इन्फेक्शन होऊन केवळ ओटीपोट दुखतंय अशी तक्रार घेऊन रुग्ण येतात. लघवीची तपासणी केल्यानंतरच मूत्राशयात इन्फेक्शन हे ओटीपोटदुखीचं कारण आहे हे लक्षात येतं. काही वेळेस पाठीचे, कंबरेचे संबंधित स्नायू आखडल्यामुळेदेखील ओटीपोटात दुखू शकतं. याला ‘रेफर्ड पेन’ असं म्हणतात. तासंतास खुर्चीत चुकीच्या पद्धतीने बसणाऱ्यांमध्ये ही तक्रार असू शकते. ओटीपोट दुखण्याचं नेमकं कारण शोधण्यासाठी लघवी, रक्त, विष्ठेची तपासणी केल्यानंतर काही दोष लक्षात येऊ शकतात. या तपासणीत फारसं काही आढळून न आल्यास, काही रुग्णांमध्ये, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी यासारख्या तपासण्या कराव्या लागतात. आणखी वाचा- स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास अशी एक अवस्था येऊ शकते, की अनेक डॉक्टरांना दाखवलं, सर्व तपासण्या नॉर्मल आहेत, कोणत्याच तपासणीत काहीही आढळून आलं नाही, विविध औषधोपचार झाले तरी ओटीपोट दुखणं थांबत नाही. आता, स्वतः रुग्ण आणि तिचे नातेवाईक, हिची पोटदुखी नेहमीचीच झालेली आहे, म्हणून कंटाळून गेलेले आहेत, त्यावेळेस, ओटीपोटदुखी मानसिक कारणांमुळे आहे की काय याचा विचार करावा लागतो. ओटीपोटदुखीचा आणि अस्थिर मनाचा संबंध असू शकतो. काही कौटुंबिक कारणांमुळे नैराश्य किंवा डिप्रेशनमध्ये असलेल्या स्त्रियांना ओटीपोटदुखीचा त्रास होऊ शकतो. काही वेळेस ओटीपोट दुखण्याचं कारण अगदी साधं देखील असू शकतं; पण वेळेवर योग्य निदान न झाल्यामुळे रुग्ण अनेक दिवस विनाकारण त्रस्त होताना दिसतात. ( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.) atnurkarkishore@gmail.com None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.