WOMEN

विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?

आपल्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध जोडिदार आपल्याला मिळाला तर काय करावं? अगदी विरुद्ध विचारांनेच जोडिदार वागत असेल तर काय करावं? “ताई, मला नंदिनीबरोबर राहणं आता अगदी अशक्य झालं आहे. माझी व्यथा मी कोणालाही सांगू शकत नाही. मित्रांना सांगावं तर माझं हसं होतंय, ‘याला बायकोही सांभाळता येत नाही’ असं मित्र बोलल्याचं कानी येतं. नातेवाईकांमध्ये काही सांगायला जावं तर आपल्याच घराची लक्तरे बाहेर टांगल्यासारखी होतात. माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांचा मी एकुलता असूनही मी साधं त्यांना माझ्या घरीही आणू शकत नाही. या वयात त्यांना एकटं राहावं लागतंय. पुत्र असूनही ते निपुत्रिक झाले आहेत. माझं दुःख मी त्यांच्याजवळ कसं सांगणार? मी रडूही शकत नाही. माझी मुलगी मला प्रिय आहे, अन्यथा मी घर सोडून कुठंही निघून गेलो असतो. घटस्फोट घ्यायचा म्हटलं तर तिचे हाल होतील. ती तिला माझ्याकडे देणार नाही. तिच्या अवाजवी पोटगीची मागणी मी पूर्ण करू शकणार नाही. ती मला घटस्फोटही देणार नाही आणि सुखानं जगूही देणार नाही.’’ सूरज अगदी अगतिकतेने सगळं सांगत होता. मनात साठलेलं सगळं त्याला व्यक्त करायचं होतं. कधीच कुणाकडं काहीही न बोललेलं, मनाच्या कोपऱ्यात साठलेलं तो माधुरीताईंकडं व्यक्त करीत होता. नंदिनीशी लग्न झाल्यानंतर त्याचे सुरुवातीचे काही दिवस छान गेले, पण काही दिवसांतच नंदिनीच्या स्वभावाची त्याला प्रचिती येत गेली. ती आपल्यापेक्षा अगदीच विरुद्ध स्वभावाची आहे हे काही काळातच त्याच्या लक्षात आलं. सूरज सकाळी लवकर उठायचा, जिमला जाऊन आल्यानंतर मगच त्याचा दिवस सुरू व्हायचा. घरचं खाणं, साधं राहाणं त्याला आवडायचं. सतत काहीतरी नवीन करत राहण्याचा त्याचा स्वभाव होता,परंतु नंदिनी सकाळी कधीही लवकर उठायची नाही. तिला झोप आवडायची. व्यायाम करण्याचा तर तिला अतिशय कंटाळा होता. फास्ट फूड तिच्या अत्यंत आवडीचा विषय होता. सतत मोबाईल स्क्रोल करत राहणं, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणं हा तर तिचा छंद होता. तिच्या या वागण्याचा त्याला खूप त्रास होत होता. सुरुवातीला त्यानं तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिच्याकडून त्याची कोणतीही अपेक्षा पूर्ण होत नव्हती. मग त्याची खूपच चिडचिड व्हायची. तो चिडला की बडबड करायचा आणि मग त्याचे व्हिडीओ काढून ती त्याच्या नातेवाईकांना पाठवायची. पोलिसांची, कायद्याची त्याला सतत धमकी द्यायची. त्यामुळं तिच्यासोबत राहायला आणि काही बोलायलाही त्याला सतत भीती वाटायची. एका दहशतीखाली तो जगत होता. हेही वाचा : ‘मॉर्निग सिकनेस’चा सामना कसा कराल ? माधुरीताईंनी त्याचं सर्व ऐकून घेतलं. पत्नीसोबत एकत्र राहणंही अवघड आणि विभक्त होणं त्याहूनही अवघड अशी त्याची परिस्थिती झाली होती. या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे त्या सुरजला समजावून सांगत होत्या. “सूरज, नंदिनी अशी का वागते?तिच्यात कधी सुधारणा होणार? या प्रश्नांची उत्तरं शोधत बसण्यापेक्षा आणि स्वतःच्या नशिबाला दोष न देता अशा व्यक्तिमत्वासोबत माझं मनस्वास्थ्य बिघडू न देता मी कसा चांगला राहीन, या दृष्टीनं प्रयत्न करणं जास्त महत्वाचं आहे. कोणत्याही दोन व्यक्तीची व्यक्तिमत्त्व वेगळ्या प्रकारची असतात. जसं आंबा गोड, संत्र आंबट, आवळा तुरट हे त्याचे अंगभूत गुण आहेत. त्याच्यावर कितीही प्रक्रिया केली तरी त्याचा मूळचा गुण बदलत नाही तसंच आपलं व्यक्तिमत्वामध्ये काही अंगभूत गुण असतात. तुझ्या व्यक्तिमत्वाचा प्रकार आणि नंदिनीच्या व्यक्तिमत्वाचा प्रकार वेगळा आहे. तुला शिस्तीत, नीटनेटकं राहणं आवडतं. प्रत्येक वस्तू जागच्या जागी असावी असा तुझा कटाक्ष असतो आणि नंदिनीला सगळ्या गोष्टी निवांत करायच्या असतात. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, नियमितपणा याचा तिच्याकडे अभाव आहे. हा तिच्या व्यक्तिमत्वातील दोष आहे. तू कितीही चिडचिड केलीस, रागावलास तरी तेवढ्यापुरते बदल दिसतात, पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होतं, होना? तिच्यात पूर्ण बदल होणार नाही याचा स्वीकार कर.” “ताई, म्हणजे मी सगळं सोसत, सहन करीत राहायचं का?” सूरजनं निराश होऊन विचारलं. “तसं नाही रे, एकदा का तिच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास तू केलास. तिला जाणून घेतलंस की, तर तुझा त्रास कमी होईल. जसं आवळा तुरटच असतो, कारलं कडूच असतं याचा आपण स्वीकार करतो, ते खाण्यायोग्य बनवतो परंतु त्याचा मूळचा गुणधर्म बदलणार नाही याची जाणीव ठेवतो. तसंच तिच्या व्यक्तिमत्वातील दोष समजून घेतलेस तर तुझ्या वागण्यातील कडवटपणा, द्वेष,राग,चिडचिड कमी होईल. स्वतःची मानसिक ताकद वाढेल आणि त्रास झाला तरी मनस्ताप होणार नाही. राग आला तरी क्रोधाग्नी भडकणार नाही. वाईट वाटलं,तरी नैराश्य येणार नाही.” हेही वाचा : निसर्गलिप : कोकोडेमा तंत्राने घरात फुलवा बाग… सूरज ऐकत होता आणि घटस्फोट घेता येत नसेल तर निदान स्वतःमध्ये काही बदल करता येतील का ज्यामुळे स्वत:चा त्रास कमी होईल याचा विचार करीत होता. आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, पण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो याची जाणीव त्याला होत होती. सध्या ‘हे ही नसे थोडके ’ असं त्याला वाटलं. त्यादृष्टीने प्रयत्न करायचं त्यानं नक्की केलं. (लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.) (smitajoshi606@gmail.com) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.