WOMEN

आरती नेमाणे… सेवाकार्याला समर्पित!

प्राची प्रशांत दुर्गेची आरती करताना पंचज्योती उजळून कापूर जाळून ओवाळणी केली जाते. या पंचज्योतीच्या वाती स्वतः जळतात आणि आसमंत प्रकाशमान करतात, कापूर जळल्यानंतर काहीच उरत नाही. देवीची आरती करताना प्रत्येकानं असंच दुसऱ्यासाठी निस्वार्थीपणे काम करण्याचा संकल्प करणं अपेक्षित असतं. समाजात अशी असंख्य माणसं दिव्यासारखी जळतात, झिजतात. त्यांच्या जगण्याला कापराचा गंध येतो. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेणार आहोत- जिचं नावच ‘आरती’ आहे. समाजातील कष्टकरी, श्रमिक, वंचित आणि उपेक्षितांच्या आयुष्यातील अंधकार दूर व्हावा यासाठी धडपड करणारी ही आरती… ठाण्यात वास्तव्यास असलेल्या आरती नेमाणे या गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक सेवेत सक्रिय आहेत. त्यांच्या समाजकार्याला सुरुवात झाली ती ठाण्यातील ‘सिग्नल शाळा’या उपक्रमातून. सिग्लनवर भीक मागणाऱ्या मुलांशी बोलून, प्रसंगी त्यांच्या पालकांशी संवाद साधून या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरती यांचा मोलाचा वाटा आहे. हे काम तसं सोपं नव्हतं. कारण या मुलांनी भीक न मागता शिक्षणाच्या प्रवाहात यावं यासाठी त्यांच्या पालकांना राजी करणं हे खूप जिकरीचं काम, पण आरती यांनी हे शिवधनुष्य उत्तमपणे पेललं आणि या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. आज ठाण्यातील सिग्नलवरील अनेक मुलं शिक्षणप्रवाहात आली असून, काही मुलांनी तर दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. या संस्थेच्या माध्यमातूनच निर्माल्य व्यवस्थापन, हरित कचरा व्यवस्थापन तसंच महिलांसाठी साजरा केला जाणारा ‘ती महोत्सव’हादेखील त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमधील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आज या महिला स्वत:च्या हिमतीवर व्यवसाय करीत असल्याचं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नाही. ‘समतोल फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी रेल्वेस्थानकावरील मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं. हे ही वाचा… घरोघरी जाऊन क्लासेस घेऊन सुरू केला स्वतःचा स्टार्टअप; जाणून घ्या एका खेडेगावातल्या पहिल्या-वहिल्या उच्चशिक्षित तरुणीविषयी त्या सध्या ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’या संस्थेत व्यवस्थापक पदावर काम करीत आहेत. शाळाबाह्य मुलांचं, त्यांच्या पालकांचं समुपदेशन करून या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं पुनर्वसन, मनपरिवर्तन करण्याचं काम त्या करतात. बाल न्याय अधिनियम २०१५ व लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्याविषयीबालहक्क आयोगासोबत कार्यशाळा घेऊन शाळा आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून ठाणे, मुंबई, नवीमुंबई, रायगड, पालघर, वाडा, विक्रमगड या ठिकाणी किशोरी वर्ग चालविले जातात. क्रीडा विभागाची जबाबदारी त्या सांभाळत असून, एकूण १३०० मुली या क्रीडा वर्गाचा लाभ घेत आहेत. वयात येणाऱ्या मुलींचं आरोग्य कसं असावं, आहार कसा असावा, व्यक्तिमत्त्व विकास, लैंगिक शिक्षण आदी विषयांवर त्या स्वत: मार्गदर्शन करतात. तसंच किशोर-किशोरी पालक पाल्य शाळेच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. कोविड काळात ठाण्यातील ५०० गरजू कुटुंबियाना सेवा सहयोगच्या माध्यामतून धान्य वाटप, वस्त्यांमधून किशोरी मुलींसाठी सॅनिटरी पॅडचं वाटप, शिलाई काम करणाऱ्या महिलांना मास्क शिवणाचे काम देऊन स्वयं रोजगार मिळवून देण्यासाठी आरती यांनी विशेष प्रयत्न केले. हे ही वाचा… एकेकाळी जेवणासाठी पैसे नव्हते; स्टार झाल्यावर शाहरुखचा ब्लॉकबस्टर सिनेमा नाकारला, आज ‘ही’ अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण वयात येणाऱ्या मुलींना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी २८ मे या जागतिक ‘मासिक पाळी दिना’निमित्त त्यांनी ठाणे, कर्जत, पालघर, मुंबई, नवी मुंबई, विक्रमगड, महाड, श्रीवर्धन, शहरी व ग्रामीण मुलींसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेस सर्वच ठिकाणांहून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मासिक पाळीबाबत मुलींमध्ये जनजागृती व्हावी हाच या स्पर्धेचा हेतू असल्याचे आरती सांगतात.आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबातील मुलांना विविध क्रिडाप्रकारात सहभागी होता यावं यासाठी त्यांना (ज्याचे बाहेर प्रशिक्षण खूप महागडे आहे असे) बॅडमिंटन, टेबल टेनिस, अर्चरी, मल्लखांब, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, वेट लिफ्टिंग, कुस्ती अशा विविध खेळांचे विनामूल्य प्रशिक्षण ‘संजय हेगडे स्पोर्ट्स अकॅडमी’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे कामदेखील आरती नेमाणे करतात. याचा फायदा गरीब, गरजू विद्यार्थी घेत असून, यातून अनेक खेळाडू तयार होत आहेत. आरती यांचे निर्माल्य व्यवस्थापनातील काम पाहून ठाणे महापालिकेच्या निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पास दिल्ली येथे स्कॉच गव्हर्नस ॲवॉर्ड प्राप्त झाल्यावर, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासमवेत आरती नेमाणे यादेखील सहभागी झाल्या होत्या. निर्माल्य व्यवस्थापन या विषयावर विविध ठिकाणी मार्गदर्शनासाठी त्यांना बोलावलं जातं. आरती नेमाणे यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना रोटरी क्लब, न्यायिक लढा पत्रकार संस्था, तेली समाज संघटना, नवयुग मित्र मंडळानं पुरस्कार देऊन गौरविलं आहे. ठाणे महापालिकेचा ठाणे गुणीजन २०१६ हा पुरस्कार देखील आरती नेमाणे यांना प्रदान करण्यात आला आहे. हे ही वाचा… डॉक्टरकी एक व्रत मानणाऱ्या डॉ. मधुबेन पटेल… सामाजिक काम अनेकजणी करीत असतात, पण त्या कामात सातत्य ठेवणं, मनापासून त्यात झोकून देणं हे प्रत्येकीलाच जमतं असं नाही. ग्रामीण भागात काम करताना अनेकदा त्यांना कुटुंबापासून दूर राहावं लागतं. आरती यांच्या टाईमटेबलमध्ये सुट्टी नाहीच. समर्पण भावनेनं गेली १५ वर्षे विविध संस्थांच्या माध्यमातून काम करणाऱ्या आरती नेमाणे यांचं कार्य हे निश्चितच प्रेरणादायी आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.