WOMEN

‘एअरप्लेन मोड’मधून वेगळं जग पाहणाऱ्या शहनाझ हबीब

सोनाली देशपांडे साहित्य वर्तृळात शहनाझ हबीब हे नाव सध्या चर्चेत आलं आहे. यामागे एक मोठं कारण घडलंय- भारतीयांना अभिमान वाटावं असं… शहनाझ यांच्या ‘एअरप्लेन मोड’ या पुस्तकासाठी त्यांना २०२४ चा न्यू अमेरिकन व्हॉइसेस पुरस्कार मिळाला आहे. पाच हजार डॉलर्स असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हे पुस्तक प्रवासावर आहे. प्रवासांच्या विविध पैलूंवर परिणाम करणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक आणि ऐतिहासिक घटकांकडे त्या वेगळ्या दृष्टीने पाहतात, त्यावरच हे पुस्तक आहे. शहनाझ यांचा जन्म केरळमधला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इंग्लिशमध्ये एम.ए. केलं. आता त्या ब्रुकलीन, न्यूयॉर्क इथे आपल्या कुटुंबाबरोबर राहतात. लेखक, अनुवादक, निबंधकार, प्रवास लेखक अशी त्यांची ओळख आहे. संयुक्त राष्ट्रसंघात सल्लागार म्हणून त्या काम करतात, पण एक लेखक, अनुवादक म्हणून शहनाझ यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. २०१८ मध्ये लेखक बेन्यामिन यांच्या मल्याळम् भाषेतल्या ‘जस्मिन डेज’ या कादंबरीच्या इंग्लिश अनुवादाला साहित्याचा जेसीबी पुरस्कार मिळाला होता. अनुवादक म्हणून पहिल्याच कादंबरीनं एवढं मोठं यश दिलं. त्यासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, ‘ भारतात आपण रोजच अनेक भाषांशी सामना करतो. एक भाषा घरी वापरतो, दुसरी काम करण्याच्या ठिकाणी आणि रस्त्यावर तर आणखी तिसरी.’ त्या पुढे म्हणतात, ‘वेगवेगळ्या पिढ्यांचे अनुभव, सामाजिक स्तर, लैंगिक प्रेरणा यावरूनही भाषा ठरते आणि अनुवाद हा जाता येता होत राहतो.’ जस्मिन डेज् ही कादंबरी वडील आणि मुलीच्या नात्यावर आहे. आणखी वाचा- गर्भधारणा लाभ कायदा हा नोकरीतील कंत्राटापेक्षा वरचढच! या पुस्तकाला पुरस्कार मिळाला, ती त्यांची अनुवादित केलेली पहिली कादंबरी होती. तसंच एअरप्लेन मोड हे त्यांचं पहिलं प्रवासावर आधारलेलं पुस्तक आणि याही पुस्तकानं मानाचा पुरस्कार पटकावला. या पुस्तकाबद्दल बोलताना त्या म्हणतात, ‘प्रवास हा आपल्याला विकला जातो. तो अनेकदा चांगला असतोच असं नाही. प्रवास करणं म्हणजे आपलं क्षितीज विस्तारणं, मन मोठं करणं आणि स्वत:चा विकास होण्याचा अनुभव.’ शहनाझ यांनी असंख्य देशांमध्ये प्रवास केला. काही ठिकाणी त्यांना प्रवास म्हणजे टाइमपास वाटला, तर अनेक विकसनशील देशातल्या लोकांसाठी प्रवास म्हणजे स्थलांतर करणं असंही त्या म्हणतात. एअरप्लेन मोड या पुस्तकात नेहमीची प्रवासवर्णनं नाहीत. शहनाझ एका मुलाखतीत म्हणतात, ‘ अनेक लोकांप्रमाणे माझ्याही प्रवासाबद्दलच्या कल्पना रोमँटिक होत्या. मी लेखक असल्यामुळे मलाही प्रवासाबद्दल लिहावसं वाटायचं. मी अनेक दिवस प्रवासावरची पुस्तकं वाचत होते. काही स्टोरीज मालिकांना पाठवत होते. पण का कोण जाणे मी प्रवासाबद्दल लिहिणाऱ्या लोकांना समजू शकत नव्हते. त्यांच्या दृष्टीने विचार करू शकत नव्हते.’ शहनाझ यांनी काही प्रवासावरचे लेख मासिकांकडे पाठवले होते, पण ते नाकारले गेले. कारण शहनाझ आपल्या लेखात प्रवास न करण्याबद्दल लिहीत होत्या. त्यांनी एक लेख पॅरिसला न जाण्याबद्दल लिहिला होता. तो छापूनही आला होता. त्याच वेळी त्यांच्या वडिलांना प्रवास करणं कठीण असल्याचं वाटत होतं. ते कुठेही जायला तयार नव्हते. नेमक्या याच वेळी लेखिकेला एक एजंट भेटला. एजंटने त्यांना संपादकांकडे नेलं. तिथे शहनाझ यांना एक नवी कल्पना मिळाली. मेघा मजुमदार यांनी शहनाझ यांना सुचवलं, तुम्ही प्रवास न करण्याबद्दल लिहिता, त्यापेक्षा प्रवासाच्या इतिहासाबद्दल का लिहीत नाही? आणि तिथेच एअरप्लेन मोड पुस्तकाची बिजं रोवली गेली. आणखी वाचा- बिनधास्त, निसर्गप्रेमी मलाइका वाझ शहनाझ सांगतात, माझ्या वडिलांमुळेही माझी प्रवासाची संकल्पना बदलली. मी जेव्हा नव्या ठिकाणी जाते, तेव्हा तिथल्या दुकानांमध्ये खरेदीला जाते. तिथे कशा वस्तू मिळतात, ते पाहते. गाईडबुकमध्ये ‘मस्ट सी’ असणारी ठिकाणं असतात. ती पाहण्यासाठी लांबच लांब रांग लावावी लागते. एवढं करून तुमचं आयुष्य खरोखर समृद्ध होतं का, असा प्रश्न शहनाझ यांना पडतो. म्हणूनच एअरप्लेन मोड या पुस्तकाचं हे वेगळेपण आहे. शहनाझ हबीब या पुस्तकाच्या लिखाणासाठी अनेक देशांत फिरल्या. एक मुस्लिम स्त्री इतकी प्रवास करते हेही खूप मोठं आहे. याबद्दल त्या म्हणतात, ‘या पुस्तकासाठी संशोधन करत असताना मला मुस्लिम पर्यटकांचा एक आनंददायी इतिहासही गवसला. मध्ययुगीन काळात प्रवासाची साधनं उपलब्ध नसल्यानं प्रवास कठीणच होता. पण लोक प्रवास करायचे ते पासपोर्टशिवाय. व्हिसा लागायचा नाही. अनेक मुस्लिम देशांत प्रचंड आदरातिथ्य केलं जायचं. मग तुम्ही मुस्लिम असा किंवा बिगर मुस्लिम. तिथले राजे प्रवासी व्यक्तींचा आदर करायचे. त्यांचं चांगलं आगतस्वागत करायचे.’ आणखी वाचा- दिव्यांगांना हक्काचं काम मिळवून देणारी अलीना… शहनाझ हबीब कविताही करतात. द पोएट्री सोसायटीद्वारे ब्रिटिश कॉन्सिलनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय काव्य स्पर्धेत त्यांच्या दोन कवितांना प्रथम पुरस्कार मिळाला होता. हायपोक्रिसी आणि चिकबोन्स अशा दोन कविता होत्या. शहनाझ वाचन आणि संशोधन यात रमतात. तीच त्यांची आवड आहे. यातूनच आता वाचकांना कदाचित अजून एक चांगलं पुस्तक वाचायला मिळेल. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.