WOMEN

मुंगी उडाली आकाशी… मुंग्यांच्या अभ्यासक नूतन कर्णिक!

लहानपणी एका रेषेत जाणाऱ्या मुंग्यांचा माग काढणारे, त्या कशा एका मागे एक जातात ते निरखत बसणारे अनेक उद्योग आपण केलेले असतात. अमुक ठिकाणी गोड सांडलं आहे, हे मुंग्यांच्या फौजेला कसं कळतं? असे कुतूहलपूर्ण प्रश्न आपल्याला अनेकदा पडलेले असतात. आपल्या घरातच राहणाऱ्या मुंग्या नेमक्या येतात कुठून, एरवी कुठे लपून बसलेल्या असतात हे कधी शोधतो का आपण? नाही ना! मग आपण काय करतो? …तर पेस्ट कंट्रोलकरून अशा सगळ्या जीवांचा बंदोबस्त करतो. परंतु नेहमी सहज दिसणारा हा इवलासा जीव कोणाच्या तरी थोडेथोडके नाही, तर वीस-पंचवीस वर्षे अभ्यासाचा विषय होऊ शकतो, ही गोष्टच फार मजेदार आहे. ही गोष्ट आहे नूतन कर्णिक यांची. सुरुवातीला त्या प्राणिशास्त्रात एम.एससी करून बंगळुरूच्या सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स इथे गांधीलमाश्यांचा अभ्यास आणि संशोधन करत होत्या. त्यात त्यांनी चार वर्षे काम केलं. गांधीलमाश्यांच्या दंशाची त्यांना ॲलर्जी झाल्यानं सुरुवातीला गांधीलमाश्या, नंतर मधमाश्या आणि मग मुंग्या अशी त्यांच्या अभ्यासाची आणि संशोधनाची रंजक सफर सुरू झाली आणि हा संशोधनाचा प्रवास मुंग्यांपर्यंत येऊन पाेहोचला. हेही वाचा – रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड! मुंग्या हा जीव दिसायला इवलासा दिसला, तरी पृथ्वीवर मुंग्यांचं अस्तित्व गेल्या चौदा कोटी वर्षांपासून आहे. उत्क्रांतीमध्ये टिकून राहिलेल्या मुंगी या इवल्या जीवामध्ये जवळपास पंधरा हजार जाती आहेत. मुंग्यांकडून माणसाने शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मुंग्यांची एकत्र कुटुंब पद्धती आणि त्यातली कामाची विभागणी, नेटकेपणा, एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती, मुंग्यांनी आपल्या कॉलनीमध्ये विकसित केलेली शेती करण्याची पद्धती… अशा अनेक गोष्टी आहेत. मुंग्यांचं निरीक्षण करता करता शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की, त्या आपल्या वजनाच्या कित्येक पट भार उचलू शकतात. त्यांच्यामध्ये विविध पद्धतीने एकमेकांना रासायनिक सिग्नल्स देण्याची यंत्रणा विकसित झालेली आहे. तिचाच वापर करून एका मुंगीने अन्न शोधलं की इतर मुंग्या त्या अन्नाच्या स्रोताभोवती येतात. मुंग्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही नेतेगिरी करत नसूनदेखील सगळी कामं व्यवस्थित पार पडतात. या कुटुंबात मादी मुंग्या, नर मुंग्या, कामकरी मुंग्या, वाढीच्या विविध टप्प्यातल्या मुंग्या, अंडी, कोष, पिल्लं वगैरे असतात. काही मुंग्यांच्या प्रजातीत मादी मुंगी आकाराने मोठी दिसते. परंतु नूतन यांनी ज्या मुंग्यांवर संशोधन केलं त्यात डायकामा प्रजातीच्या दक्षिण भारतात आढळणाऱ्या तीन जातींच्या मुंग्यांचा समावेश होतो. यात मादी मुंगी आकाराने वेगळी ओळखता येत नाही. या मुंग्या त्यांच्या वसाहतीच्या दारापाशी विविध पानं, फुलं, पिसं वगैरे यांची आरास तयार करतात. त्या सजावटीवर पहाटेचे दवबिंदू साचतात आणि पाण्याचा साठा काही काळ का होईना, अगदी वसाहतीच्या दारातच त्यांना मिळतो. यांच्या वसाहती कशा असतात, त्या कुठे असतात, जमिनीत किती खोल असतात, अभ्यास करण्यासाठी काय काय काळजी घेऊन त्यांचा अभ्यास आणि संशोधन करायचं, या सगळ्याचं भान नूतन यांना मुंग्यांच्या निरीक्षणाने शिकवलं. जणू मुंग्यांच्या विश्वाचा त्यांनी ध्यासच घेतला. मुंग्या जेव्हा अन्नाच्या शोधात फिरत असतात, तेव्हा त्या स्वतःची पावलं मोजतात. आपण आपल्या वसाहतीपासून किती दूर आलो आहोत, कुठे-कुठे वळलो आहोत, हे त्यांना समजतं. सूर्याचा आढावा घेत कमीत कमी ऊर्जा खर्च होईल अशा रस्त्याने परत त्या मुंग्या आपल्या वसाहतीकडे जाऊ शकतात. हे अद्भुत जग नूतन यांनी प्रत्यक्ष अनुभवलं. मुंग्यांची शेती बघितली, तिचा अभ्यास केला. त्या काय खातात, एकमेकांना कसे रासायनिक संकेत देतात, यावर काम करताना प्रयोगशाळेत मुंग्यांची वसाहत त्या वाढवत असत. त्यासाठी मुंग्यांना वाळवी आणि नाकतोडे आणून खायला देत असत. प्राध्यापक राघवेंद्र गदगकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डायकामा मुंग्यांच्या शारीरिक फरकांचा, गुणसूत्रांचा अभ्यास अनेक वर्षे सुरू ठेवला. हेही वाचा – Schwing Stetter : आता सिमेंट मिक्सरची पिवळी यंत्रे महिला दुरुस्त करणार; वाचा कोणत्या कंपनीने घेतला निर्णय, नेमका प्रयोग काय? अलीकडे नूतन या पुण्यात परत आल्या आहेत आणि पुण्यातील डॉ. राहुल मराठे यांच्या ‘मित्र कीडा’ या संस्थेसोबत काम करत आहेत. मुंग्यांमुळे आणि इतर सामाजिक कीटकांमुळे होणारं शेतीचं नुकसान कसं रोखता येईल, कीटकांवर रासायनिक फवारणी न करता जैविक उपाय कोणते करता येतील, या संदर्भातदेखील त्या भरपूर काम करत असतात. आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आंब्यावर येणाऱ्या किड्यांचा त्रास होत असतो. त्या विशिष्ट किडीवर हानिकारक पेस्टीसाईड न वापरता कोणते जैविक उपाय करता येतील- जेणेकरून किडीवर नियंत्रण मिळवता येईल, या संदर्भातले पर्याय त्या सुचवत असतात. ‘नॅशनल मॉथ वीक’मध्ये ‘पतंगायन’ सारखा कार्यक्रम करून फुलपाखरू आणि मॉथ यांविषयी जनजागृती करणे, वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी, नागरिकांसाठी ‘अँट वॉक’ ही निसर्गसहल आयोजित करणे, विविध व्याख्यानं… असे जनजागृती करणारे उपक्रम त्या करतात. भारतातल्या वेगवेगळ्या विमानतळाच्या परिसरात असणारे पक्षी ही गंभीर समस्या आहे. या पक्ष्यांचं नियंत्रण करण्यासाठी कीटकांच्या अभ्यासाचा कसा उपयोग होऊ शकेल, यावरदेखील त्यांचं काम सुरू आहे. कीड आणि विविध कीटक यासंदर्भातल्या विविध प्रकल्पांसाठी सल्ला, समुपदेशन स्वरूपाचं एक आगळंवेगळं करिअर त्यांनी घडवलं आहे. केवळ कुतूहल जागृत ठेवून नवीन पायवाट शोधत मानवी आयुष्य सुकर करण्यासाठी त्यावर पर्यायी उपाय उपलब्ध करून देणं, हे मोलाचं काम आहे. आपल्याला जे मनापासून आवडतं, त्यात काम करत रहावं की दिशा आपोआप सापडत जाते याचंदेखील उत्तम उदाहरण नूतन यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे. prachi333@hotmail.com None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.