WOMEN

कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी झटणाऱ्या श्वेता गडाख

आदिवासी बहुल परिसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसुल, कळवणसह काही भागात पारंपरिक रुढी, अंधश्रध्दा तसेच अन्य अडचणींमुळे कुपोषण हे तसे पाचवीलाच पुजलेले. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होत असले, तरी ही कोवळी पानगळ थांबवण्याचं आव्हान आजही कायम आहे. कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी त्र्यंबकेश्वरसारख्या दुर्गम भागात काम करणाऱ्या श्वेता गडाख यांनी पुढाकार घेत आदिवासी बांधवांकडे जे खाद्य उपलब्ध आहे त्यातूनच बालकांची वाढ, पोषक आहार यावर काम सुरू केलं. श्वेता यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे अति कुपोषित बालकांचं आरोग्य सुधारलं आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी आणि टाकेदगाव ही गावे नाशिक जिल्हा सीमारेषेवरील गावं. शहराच्या मुख्य वस्तीत यायचं- तेही आरोग्य किंवा अन्य प्रश्नांकरता- म्हणजे तेथील नागरीकांना जसं जिकरीचं तसं लालफितीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांनाही! अशा दुर्गम ठिकाणी श्वेता गडाख या मागील अनेक वर्षांपासून काम करत आहेत. या ठिकाणी ‘एकात्मिक बाल विकास विभाग’ आणि ‘अंगणवाडी’ यांमध्ये दुवा साधण्याचं काम श्वेता यांनी लीलया पेललं आहे. गावातील मुलभूत प्रश्नांवर काम करताना येथील २५ गांवामधील कुपोषणाची समस्या त्यांच्या लक्षात आली. परिसरातील आठ-दहा खेडी वगळता बाकी गावांना साध्या औषधोपचारासाठीही ६० कि.मीवर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा आसरा घ्यावा लागतो. ग्रामीण रुग्णालयात मुख्यत: प्रसुती सेवा मिळते. आणखी वाचा- मुंगी उडाली आकाशी… मुंग्यांच्या अभ्यासक नूतन कर्णिक! प्राथमिक उपचारांसाठी सामुंडी गावातील उपकेंद्र हे एकमेव ठिकाण. या अनेक गावांमध्ये मोबाइलला रेंज मिळत नाही. गावातील बहुसंख्य लोक महादेव कोळी व ठाकूर आदिवासी लोकवस्तीतले आहेत. त्यांची आर्थिक भिस्त बाहेरील कामांवर किंवा पावसाच्या पाण्यावरील शेतीवर. शिक्षणाविषयी तशी अनास्थाच. उदरनिर्वाहासाठी होणारे स्थलांतर पाहता गावातील बालकांची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर येते. अशा स्थितीत काम करणं आव्हानात्मक असतं. मात्र श्वेता यांनी कुपोषणाचे बालकांवर होणारे परिणाम पाहिल्यावर त्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासावरही काम सुरू केलं. यासाठी ‘पुरूष बने जिम्मेदार’, ‘पोषण अभियान’, ‘पोषण आहार गुढी’ अशा वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी केली. बालकांच्या पोषण आहारासाठी आदिवासी बांधवाकडे असणारे मूग, तांदूळ, नागली यांसह अन्य पदार्थांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करत बालकांना पोषणमूल्य मिळतील यासाठी काम सुरू केलं. गणेशोत्सवात पोषण उत्सव, नवरात्रात पोषण मात्र, पोषण दिवाळी सोबत एक पणती पोषणाचीमध्ये पौष्टिक रवा लाडू, नागलीचे लाडू, पालक शेव, मिक्स डाळीच्या चकल्या असे विविध खाद्यपदार्थ तयार केले. हे फराळ बालकांच्या मातांना तसेच गरोदर महिलांना देण्यात आले. यासोबत फराळ पाककृती पुस्तिका भेट दिली जाते. जेणेकरून त्यातील पदार्थ घरोघारी बनविले जातील. ‘आपलं ग्राम सुपोषित ग्राम’ उपक्रम राबवल्यामुळे सण उत्सवांमध्ये वेगळ्या पध्दतीने पोषण आहार तयार होऊ लागला. परिसरातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांनी हे काम सुरू केलं. यामुळे आज अनेक तीव्र कुपोषित बालकेही सुदृढ झाली आहेत. त्यांच्या आजवरच्या कामाची दखल घेत युनिसेफ, जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभागाच्या वतीने विविध पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला आहे. आणखी वाचा- रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड! मागील सात वर्षांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांचं काम सुरू आहे. अनेकदा नागरिकांचा अंगणवाडीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. हा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं. अंगणवाडी सेविकांसोबत त्यांच्या कामाविषयी प्रबोधन सुरू केलं. अंगणवाडीचं डिजिटलायझेशन करण्यावर भर दिला. या भागात अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात होती. यावर काम सुरू झाल्यानं आजारी पडल्यावर मुलांना भगताकडे नेण्याआधी आता डॉक्टरांकडे नेलं जातं. जन्मत: कमी वजनाची बाळे वजन वाढवत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्या करत आहेत. या कामी त्यांना आलेलं यश हीच आपल्या कामाची पावती असल्याचं श्वेता आर्वजून सांगतात. आजवर राष्ट्रीय स्तरावरील तसेच प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ अधिकारी यांनी अंगणवाडी तसेच वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी दिल्या आहेत. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.