WOMEN

दिवाळी: अर्थात नात्यांचा उत्सव

“भैरवी, मनीषा, कालिंदी, अश्विनी, सायली लवकर या गं, आपला ग्रुप फोटो काढायचा आहे.” सुप्रियानं सर्वांना आवाज दिला. दिवाळी पार्टीची बाकी तयारीही तिला बघायची होती. ऑफिसचा आज लास्ट वर्किंग डे होता. उद्यापासून ऑफिसला एक आठवड्याची दिवाळीची सुट्टी होती त्यामुळं ऑफिसमध्ये आजच दिवाळी सेलिब्रेशन करायचं सर्वांनी ठरवलं होतं. पाटील साहेबांनी तशा सूचना सर्वांना दिल्या होत्या. प्रवेश द्वाराजवळ आणि सर्वांच्या चेंबर समोर रांगोळ्या काढल्या होत्या. फुलांच्या हारांनी चौकटी सजवल्या होत्या. ऑफिसमधले सर्व पुरुष कुर्ता घालून आले होते तर स्त्रिया शानदार साड्या नेसून आल्या होत्या. सर्वजण ‘फेस्टिव्ह लूक’मध्ये होते. ऑफिसची कामं तर थांबत नाहीत, ती चालूच होती, पण नेहमीपेक्षा वेगळं वातावरण असल्यानं सर्वजण फ्रेश मूड मध्ये काम करत होते त्यामुळं लंच टाइम केव्हा झाला. ते कुणालाच कळलं नाही. एक “ग्रुप फोटो झाला की सर्वांनी तळमजल्यावरील हॉल मध्ये लंच साठी जमायचं आहे.” सुप्रियानं सर्वांना निरोप दिला. दररोज ऑफिसची वेळ गाठणं. आपाआपल्या डिपार्टमेंटमध्ये काम करणं आणि वेळ झाल्यानंतर बस किंवा लोकल पकडण्यासाठी धावपळ करीत बाहेर पडणं या रुटीनमध्ये सर्वांचं एकमेकांशी भेटणं, बोलणंच व्हायचं नाही. महिनोन्महिने एकमेकांची गाठ पडायची नाही. ऑफिसमध्ये असा काही कार्यक्रम असेल तरच सर्वांचे एकमेकांशी शेअरिंग व्हायचं. “काय, यावर्षी दिवाळी कुठं? गावाकडं जाणार का? सुट्टीत विशेष काय प्रोग्रॅम? खरेदी काय करणार? सोनं-चांदी किती महाग झालीय” अशा प्रकारचे विषय चर्चेत चालू होते. तेवढ्यात पाटील साहेब आले. बॉस आल्यानंतर सर्वांचा ग्रुप फोटो झाला. गप्पा करत जेवणही झालं. एरव्ही पाटील साहेब नेहमीच गडबडीत असायचे, पण आज त्यांनी सर्वांसाठी वेळ काढला होता.” आपलं ऑफिस आणि सहकारी हे सुद्धा आपलं एक कुटुंबच असतं, त्यामुळं या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायला हवी,” असं त्यांचं म्हणणं होतं. ऑफिसमध्ये ते सर्वांचे बॉस असले तरी अशा अनौपचारिक कार्यक्रमात ते मोकळेपणाने सर्वांशी गप्पा मारायचे. हे ही वाचा… स्तनपान करणार्‍या अपत्याचा ताबा आईकडेच! अशाच गप्पा चालू असताना साने मॅडम म्हणाल्या, “दिवाळीची आम्हा बायकांना एवढी कामं असतात ना की, सुट्टी केव्हा सुरू होते आणि केव्हा संपते तेच आम्हांला कळत नाही. नुसत्या कामातच आमची दिवाळी जाते. त्यावर शिंदे सर म्हणाले, “आमचं काही वेगळं नसतं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला खुष करता यायला हवं ही आम्हा पुरुषांची कसोटी असते. सर्वांची खरेदी आणि घरासाठी काहीतरी नवीन वस्तू, नातेवाईक, पाहुणे मंडळी यांच्यासाठी गिफ़्ट आणि कामवाल्या बायकांचे बोनस म्हणून डबल पगार यांत खर्चाचा आकडा वाढता असतो. बजेट कसं मॅनेज करायचं ही चिंता असतेच,” आता सौरभ म्हणाला, “ अहो आता दिवाळीला विशेष असं काही महत्व राहिलेलं नाही. फराळाचे पदार्थ बाराही महिने मिळतात. वजन नियंत्रित करण्यासाठी, जास्त तेलकट, तुपकट पदार्थ आणि गोड खायचं नसतंच त्यामुळं प्रथा म्हणून थोडंफार केलं जातं. बाकी दिवाळी म्हणजे कुठंतरी ट्रिप आणि एन्जॉयमेंट असंच असतं.” भैरवी स्वतःचा अनुभव शेअर करताना म्हणाली, “ दिवाळी म्हटली की आमच्याकडे पाहुणे रावळे, मित्रमंडळी यांची रेलचेल असते, पण मी घरात काहीही करत नाही. दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी तयार होऊन जायचं. येताना तयार दिवाळीचा फराळ विकत घेऊन यायचा. खाद्यपदार्थांची मस्त ऑनलाइन ऑर्डर द्यायची. आम्हीही खुष आणि पाहुणेही खुष.” कालिंदी म्हणाली, “हो बाई आता तर घरातील स्वच्छता करायलाही माणसं मिळतात. एक दिवसात घर कसं चकाचक. सजावटीच्या वस्तू प्रदर्शनातून मिळतात. रांगोळ्या रेडिमेड मिळतात. आमच्या जवळ एक हॉटेल आहे तेथे नरकचतुर्दशीच्या दिवशी आंघोळी झाल्यावर आम्ही पोटभर ब्रंच करतो. सर्व फराळाचे पदार्थ असतात आणि इतरही दाक्षिणात्य, महाराष्ट्रीय, चायनीज सर्वच पदार्थ असतात. घरी येऊन दिवाळी अंक वाचत किंवा नवीन एखादा पिक्चर बघत मस्त आराम करायचा.” हे ही वाचा… ‘एअरप्लेन मोड’मधून वेगळं जग पाहणाऱ्या शहनाझ हबीब सर्वजण आपापल्या पद्धतीने दिवाळी कशी साजरी करतात ते सांगत होते. मग सुप्रियानं पाटील सरांना विचारलं, “सर,तुम्ही कशी दिवाळी साजरी करता?” पाटील सरांनी सांगायला सुरुवात केली. “दिवाळीचं नियोजन मी वर्षभर अगोदरच केलेलं असतं. त्याचं बजेट वेगळं असतं. मी माझ्या बकेट लिस्टची प्रायोरिटी ठरवून घेतो आणि त्याप्रमाणे सुट्टीत सर्वांसाठी वेळ देतो. दिवाळीच्या महिनाभर आधीच्या शनिवारी रविवारी सर्व खरेदी पूर्ण करतो म्हणजे खरेदीला घाई होत नाही. कुंभारवाड्यातून पणत्या घेऊन येतो आणि आम्ही घरातील सर्वजण मिळून मुलांसह बसून पणत्या रंगवतो. आकाशकंदील तयार करतो. घरातील स्वच्छता आम्ही सर्वजण मिळून करतो. माझी आई आणि बायको फराळाचे पदार्थ करतात तेव्हा चकल्या, करंज्या, शंकरपाळी तयार करायला मी आणि मुलेही मदत करतो. माझी मुलगी युट्युबवर बघून खूप छान रांगोळी काढते. मुलगा त्यामध्ये रंग भरतो. तेलमालिश, अभ्यंगस्नान, औक्षण, फराळ अशी आमची साग्रसंगीत दिवाळी असते. दिवाळी अंक त्याचे वाचन आणि आवडत्या लेखाचे समीक्षण आणि चर्चाही आमच्यात होते. दिवाळीत आम्ही सगळे स्क्रीन बंद ठेवतो मोबाईल, टीव्ही सर्वच आणि एकमेकांना, घराला आणि या मोठ्या सणाला महत्व देतो. मित्रांनो, मला असं वाटतं की, दिवाळीतील प्रत्येक सण प्रत्येक नातं जपणारा आहे. कुटुंबाला एकत्र आणणारा आहे म्हणून हा नात्यांचाही उत्सव असतो. त्याला महत्व द्यायला हवं. एकमेकांच्याबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सणाचा उपयोग करायला हवा. दिवाळीचे पदार्थ विकत आणले तरी किमान एखादा तरी पदार्थ घरातील सर्वानी मिळून करायला हवा. घराची सजावट सर्वानी मिळून करायला हवी. ही माझी मतं आहेत. बघा तुम्हांला पटतात का? तुम्हा सर्वांना ही दिवाळी आरोग्याची आणि आनंदाची जावो या शुभेच्छा!” पाटील सर, त्यांचे विचार व्यक्त करून त्यांच्या पुढील मिटींगला निघून गेले, पण ऑफिसमधील सर्वचजण त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतावर विचार करू लागले. आपणही उत्साहाने दिवाळी नात्यांचा उत्सव म्हणून साजरी करायची. कुटुंबाला वेळ द्यायचा हे सर्वांनीच ठरवले. (लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.) (smita joshi606@gmail.com) None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.