WOMEN

वनस्पती संवाद

आपल्या या सदरात आपण झाडं, फुलं, माती सगळ्यांची माहिती घेत असतो. बागेची निगा, हंगामी रोपांची लागवड, रानभाज्या, फळभाज्या असे अनेक विषय आपण बघितले आहेत, पण आज मी एका वेगळ्याच गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. झाडं ही आपल्यासारखी भाव भावना असलेले सजीव आहेत हे तर शास्त्रीय सत्य आहे. क्रेस्कोग्राफ सारखं यंत्र तयार करून जगदीश चंद्र बोस यांनी हे सिद्ध ही केलंय, पण तरीही हे हिरवे मुके जीव आपल्याशी संपर्क साधू शकतात. आपल्याशी बोलू शकतात यावर सहजासहजी आपला विश्वास बसत नाही. माझाही नव्हता. दुर्गाबाईंच्या एका पुस्तकात दगड संवाद साधतात असा एक उल्लेख वाचला होता त्यावेळी थोडं आश्चर्य वाटलं होतं. अर्थात फार माहिती नव्हती मिळाली त्याविषयी. पण मनात कुठेतरी एक संवेदना जागृत मात्र झाली होती. शहरी शेतीचे प्रयोग करताना सुरुवातीला सगळं काम चुकत माकतच होत होतं. त्यात कुशलता अशी मुळीच नव्हती. होती ती फक्त धडपड, पण निसर्ग आपलं गुरूपण निभावत होता. मला शिकू देत होता. प्रत्येक चूक एक नवीन सूत्र उलगडत होती. मला प्रगल्भ करत होती. हे ही वाचा… उमा मणी… गृहिणी ते कोरल वुमनचा कलात्मक प्रवास मी जेवढं वनस्पतीशास्त्र शिकताना शिकले नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मला माझ्या प्रयोगांनी शिकवलं होतं. वनस्पती संवादाचा सूक्ष्म धागा बहुदा त्याचवेळी जोडला गेला होता. झाडांवर माझं प्रेम आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त त्यांचं माझ्यावर प्रेम आहे हे खरं सत्य आहे आणि ते मला नेहमी जाणवतं. झाडं आपल्याशी संवाद साधतात. ॲनिमल कम्युनिकेशन आणि प्लांट कम्युनिकेशन याला शास्त्रीय आधार आहेच. मलाही या कम्युनिकेशनचा, संवादाचा अनुभव आला, पण अर्थात हे ते आहे, हे मला त्यावेळी माहित नव्हतं. आज नेमकं त्याबद्दलच सांगणार आहे. झालं असं की, आमच्या जुन्या घराला मोठी गच्ची होती. तिथे मी शहरी शेतीचे पहिले प्रयोग केले.हळूहळू इतरही प्रयोग होऊ लागले. पाणवनस्पती लावल्या, कमळं फुलू लागली एवढंच नाही तर शेवगा, पपई, गुंज, पेरू, बेल, जांभूळ असे वृक्ष होतील अशी प्रजा ही नांदू लागली. या सगळ्यांना पाणी देणं म्हणजे एक मोठं काम होतं. त्यासाठी खूप वेळ लागत असे. पावसाळ्यानंतरचे आठ महिने बागेला निगुतीने जपावं लागे. हे सगळं आवडीचं होतं, त्यामुळे मी करतही होते. पण एकदा असं झालं की, सलग काही दिवस मला कामामुळे जराही वेळ मिळाला नाही. मदतनीसबाईंना पाणी घालण्याची सूचना देऊन ठेवली होती, त्यामुळे निश्चिंत होते. या दरम्यान एक दिवस दुपारी उशिरा घरी परतले. खूप थकले होते, भूकही लागली होती. जेवून घेऊ आणि मग वर गच्चीवर जाऊन बागेची पाहणी करू असं ठरवून ताट वाढून घेतलं. पहिला घास घेणार एवढ्यात कसं कोण जाणे डोळ्यासमोर मलूल झालेली, माना टाकलेली, कोमेजलेली वाळून गेलेली अशी बागेतली रोपं दिसली. हे सगळं क्षणभरच होतं, पण अगदी प्रत्यक्ष समोर बघावं इतकं खरं वाटत होतं. ‘छे, बाग सुकेल कशी? बाई पाणी घालतच असणार. माझ्या मनाचे खेळ आहेत,’हे असं म्हणतं मी ते विचार झटकून टाकले आणि जेवायला सुरुवात केली, पण मन अस्वस्थ होतं. काही सूचत नव्हतं.शेवटी हात धुतले आणि गच्चीवर गेले तर समोर जे पाहत होते ते नेमकं तेच होतं- जे मी घरात बसून काही क्षणापूर्वी अनुभवलं होतं. माझी वानसप्रजा, माझे सोबती अगदी सुकून गेले होते. काही रोपं तर पूर्ण वाळली होती. माझ्या कडून थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्याचे परिणाम माझ्या या मुक्या मित्रांना सोसावे लागले. पुढे पाणी का मिळालं नाही वैगरे कारणं मला कळली, पण एक नवा धडा मी शिकले-तो हा की माझे हे दोस्त माझ्याशी संवाद साधू शकतात. त्यासाठी त्यांना भाषेची गरज नाही. या दृश्य संवादाच्या अनुभवानंतर मला एक गंध संवादाचा अनुभवही आला. त्याचं असं झालं की, एक पुदिन्याचं रोपं लावलं होतं. पाऊस ओसरल्यावर पुदिना छान वाढला होता. थंडीत तर तो अगदी सुरेख बहरला. जितक्या झपाट्याने तो बहरला होता तितक्याच वेगाने उन्हाळ्याच्या सुरुवातीला तो सुकूनही गेला. बरीच काळजी घेण्याचा प्रयत्न केला, पण नाहीच जमलं. सगळी रोपं वाळून गेली. आता परत नवीन रोप लावावं लागणार होतं. या गोष्टीला पंधरा दिवस झाले. एकदा सकाळी सहा वाजता गच्चीवर झाडांना पाणी देत होते. उन्हाळ्यात दोन वेळा बागेला पाणी देणं गरजेचं असतं. मग एक वेळ सकाळी आणि एक वेळ संध्याकाळी अशी निवडली होती. त्याप्रमाणे काम सुरू होतं. हे ही वाचा… प्रवासी महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या लता अरगडे अचानक मला पुदिन्याचा वास येऊ लागला- तोही इतका तीव्र. एवढ्या सकाळी तो आजूबाजूच्या स्वयंपाकघरातून नक्कीच येत नव्हता आणि कुंडीतील रोपं तर सगळी सुकून गेलेली. मग वास कुठून येत असावा? शोधू लागले तर एका लहानश्या कुंडीत एक इवलं पुदिन्याचं हिरवीगार रोप मंद डोलत होतं. त्याचा हलका गंध माझ्यापर्यंत येत होता. हे खरंच आश्चर्य वाटण्यासारखचं होतं, कारण ती कुंडी इतकी आत होती, सहजासहजी दिसणारीही नव्हती आणि एका इवल्या रोपाला इतका तीव्र गंध येणं शक्यच नव्हतं. म्हणजे नक्कीच माझ्या पुदिन्याने आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी गंध संवादाचा मार्ग स्वीकारला होता. हे दोन अनुभव मला बऱ्याच गोष्टी शिकवून गेले. एक गोष्ट अगदी अधोरेखित झाली की वनस्पती आपल्यालाशी संवाद साधू शकतात. फक्त तो संवाद हा शब्दांविना होणारा संवाद असतो. आपण त्यांच्याशी तादात्म्य पावलो की तो सहज घडून येतो. यावर अलीकडे खूप संशोधन झालयं. अनेक रहस्य उलगडली गेली आहेत. त्याला शास्त्रीय आधारही आहेत. टेलिपथिक संवादाचे काही अनुभव मी घेतले आहेत. काही वेगळी आश्चर्यकारक तथ्येही या प्रवासात शिकता आली आहेत. त्याविषयी पुढच्या लिहीनच. सध्या इथेच थांबते. तोवर तुम्ही ‘हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ हे पुस्तक मिळवून जरूर वाचा. mythreye.kjkelkar@gmail.com None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.