NAGPUR

अमरावती : वाहनाच्या धडकेत पुन्‍हा एका बिबट्याचा बळी

अमरावती : राष्ट्रीय महामार्गाच्‍या रहाटगाव ते बडनेरा या नवीन बायपास मार्गावर अज्ञात वाहनाच्‍या धडकेत एका बिबट्याचा मृत्‍यू झाल्‍याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वाहनाच्‍या धडकेत बिबट्याचा बळी जाण्‍याची ही गेल्‍या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. शहराला लागून जाणाऱ्या रहाटगाव-बडनेरा नव्या बायपासवर वडाळी ते महादेव खोरी दरम्‍यान गुणवंत बाबा मंदिरानजीक रस्‍त्‍याच्‍या कडेला बिबट्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नागरिकांना आढळून आला. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे पथक घटनास्‍थळी पोहचले. या बिबट्याचे वय अंदाजे २ वर्षे असल्‍याचे सांगण्‍यात आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्‍थळी गर्दी केली होती. नवीन बायपास मार्गाच्‍या लगत वडाळीचे जंगल आहे. या परिसरात बिबट्याचे वास्‍तव्‍य आहे. यापुर्वी या भागात बिबट्यांची पिल्‍ले आढळून आली होती. रात्री अज्ञात वाहनाच्‍या धडकेत या बिबट्याचा मृत्‍यू झाला असावा, अशी माहिती मानद वन्‍यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली. हेही वाचा – हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर होणार का ? गेल्‍या ७ डिसेंबर रोजी पोहरा मालखेड राखीव जंगलाच्या चांदूर रेल्वे वनपरीक्षेत्राअंतर्गत चिरोडी गावाजवळ रस्ते अपघातात बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जंगलालगतच्या रस्त्यावरील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राष्‍ट्रीय महामार्गावर यापुर्वीही वाहनांच्‍या धडकेने वन्‍यप्राण्‍यांचे बळी गेले आहेत. वडाळी, पोहरा जंगलांमध्ये बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट सोबतच रानगवे, चितळ, हरीण, ससे या प्राण्यांसह मोरांचे वास्तव्य या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या जंगलातील बिबट राज्य राखीव पोलीस दल वसाहतीसह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात अनेकदा आढळून आले आहेत. अमरावती- चांदूर रेल्वे मार्गावरही अनेकांना बिबट दिसून आले आहेत. बिबट्यांचे अस्तित्व जाणवणाऱ्या अनेक घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. हेही वाचा – नरेंद्र मोदी आम्हाला वेळ देणार नाही, असे का म्हणाले रोहित पवार ? रस्त्यावर वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येऊ शकतात. उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे किंवा इतर मानवनिर्मित संरचनांच्या माध्यमातून प्राण्यांना रस्त्यांवरून न जाऊन मार्ग दाखवता येतो. यामुळे प्राणी-वाहन अपघात टाळता येतात आणि प्रजातींना त्यांच्या निवासस्थानातून सुरक्षित मार्ग मिळतो. वन्यजीव अपघात रोखण्यासाठी गती निरीक्षण प्रणालींचा वापर केला जातो. महामार्गांवर वन्यजीवांसाठी स्वतंत्र मार्ग असणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांसाठी अनुकूल उपशमन रचनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या वापरावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.