टोक्यो : जागतिक विस्तार असलेल्या जपानच्या महाकाय कंपन्या होंडा आणि निस्सान यांचे विलीनीकरण २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची चर्चा सुरू असून, जागतिक वाहन उद्योगातील या ऐतिहासिक घडामोडीमागे चीनमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांच्या आव्हानाचा सामना करण्याची सक्षमता हे प्रमुख कारण आहे. होंडा आणि निस्सानच्या विलीनीकरणानंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी वाहन निर्मिती कंपनी उदयाला येणार आहे. सध्याच्या घडीला जगात टोयोटा पहिल्या स्थानी तर फोक्सवॅगन दुसऱ्या स्थानी आहे. विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांची संसाधने वापरण्याची संधी मिळेल आणि अमेरिकेच्या टेस्ला व चीनमधील बीवायडी यासारख्या प्रतिस्पर्ध्यांपुढे समर्थपणे उभे राहता येऊ शकेल. प्रस्तावित विलीनीकृत नवीन कंपनीचे समभाग ऑगस्ट २०२६ मध्ये सूचिबद्ध करण्याची उभयतांची योजना आहे. हेही वाचा >>> घरगुती बचतीचे वळण म्युच्युअल फंडांकडे, तरी ‘एफडीं’चा वरचष्मा कायम : स्टेट बँकेचा अहवाल होंडा ही जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची तर निस्सान ही तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. त्यांच्या विलीनीकरणातून निर्माण होणाऱ्या नवीन कंपनीची विक्री ३० ट्रिलियन येन असेल आणि तिचा कार्यचालन नफा ३ ट्रिलियन येन असेल. या आधी फियाट क्रायस्लर ऑटोमोबाईल्स आणि पीएसए यांचे २०२१ मध्ये विलीनीकरण होऊन स्टेलान्टीस कंपनीची निर्मिती झाली होती. हा व्यवहार ५२ अब्ज डॉलरचा होता. त्यानंतरचा हा सर्वांत मोठा विलीनीकरण व्यवहार ठरणार आहे. निस्सान सर्वांत मोठा भागधारक असलेली स्मॉलर मित्सुबिशी मोटर्स ही कंपनीही या विलीनीकरणात सहभागी होण्याचा विचार करीत आहे. याबाबत पुढील वर्षी जानेवारी अखेरपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. हेही वाचा >>> वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी गेल्या महिन्यांत निस्सानने ९,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यासह, जागतिक उत्पादन क्षमतेत आपणहून २० टक्क्यांच्या कपातीची योजना जाहीर केली. चीन आणि अमेरिका या प्रमुख बाजारपेठांमध्ये घसरत्या विक्रीला पाहता हा कटू निर्णय कंपनीने घेतला. होंडाने देखील याच कारणाने आजवरची सर्वात सुमार तिमाही आर्थिक कामगिरी नोंदवली. तथापि दुचाकी आणि हायब्रीड मोटारींच्या चांगल्या कामगिरीने या कंपनीला तूर्त तारण्याचे काम केले. येत्या काळात विक्रीत वाढीचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे राखणे अवघड जाईल, असा कंपनीच्या व्यवस्थापनाचा इशारा आहे. चीनमधील वाहननिर्मिती कंपन्यांचा उदय आणि नवीन कंपन्यांचा प्रवेश यामुळे मोटार निर्मिती उद्योगात मोठी उलथापालथ सुरू आहे. या स्पर्धेचा सामना २०३० पर्यंत करण्यासाठी आम्हाला क्षमता वाढवावी लागेल अन्यथा स्पर्धेत टिकाव धरणे अवघड जाईल. – तोशिहिरो मिबे, मुख्याधिकारी, होंडा None
Popular Tags:
Share This Post:
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
December 23, 2024
घरगुती बचतीचे वळण म्युच्युअल फंडांकडे, तरी ‘एफडीं’चा वरचष्मा कायम : स्टेट बँकेचा अहवाल
December 23, 2024What’s New
Spotlight
Today’s Hot
-
- December 22, 2024
-
- December 22, 2024
-
- January 1, 1970