MANORANJAN

नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका

एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या पडछायेत आयुष्य कंठणाऱ्यांना आपणही वटवृक्षाचा अविभाज्य भाग आहोत असं वाटणं आणि प्रत्यक्षात ते तसं असणं यांत जमीन-अस्मानाचं अंतर असतं. अशा दिवास्वप्नात वावरणाऱ्यांकडे समाजही उपेक्षेनं पाहतो. त्यांची हुर्रे उडवतो.पण आपल्या आभासी जगात वावरणाऱ्यांना त्याची कधी जाणीवही होत नाही. आधीच्या पिढीतील कर्तृत्ववानाच्या पुण्याईवर जगू पाहणारे असे अनेक जण असतात. विशेषत: राजकारणात हे जास्तीकरून दिसून येतं. अशांचं पितळ उघडं पाडणारं नाटक वसंत कानेटकर यांनी लिहून ठेवलंय… ‘सूर्याची पिल्ले.’ १९७८ साली ते प्रथम रंगमंचावर आलं. दामू केंकरे यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. त्यात अनेक दिग्गज कलाकार होते. त्यानंतर सुनील बर्वे यांनी आपल्या ‘हर्बेरियम’ उपक्रमात ते रंगभूमीवर पुन्हा आणलं. आणि आता दीड दशकानंतर त्यांनीच ते पुन्हा प्रतिमा कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनात मंचित केलं आहे. तीन अंकी नाटकांचा जमाना इतिहासजमा झालेला असताना त्यांनी हे धाडस केलं आहे. (तसं तर ‘चारचौघी’ हे अलीकडेच पुनरुज्जीवित झालेलं आणि यशस्वी झालेलं आणखीन एक तीन अंकी नाटक.) पण नाटक उत्तम असेल तर प्रेक्षक त्याच्या लांबी-रुंदीकडे बघत नाहीत, हेच खरं. ‘सूर्याची पिल्ले’च्या बाबतीतही ते लागू पडतं. पंजाबराव कोटीभास्कर हे एक थोर स्वातंत्र्यसेनानी. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याबरोबरच विधायक कामही उभं केलेलं. त्यांनी शाळा काढली. ‘रणगर्जना’ नावाचं वर्तमानपत्र काढलं. अनाथ विधवांसाठी आश्रम काढला. आरोग्यधामही सुरू केलं. त्यांच्या पश्चात त्यांच्या चार मुलांकडे हा वारसा आलेला. बजरंगकडे शाळेची धुरा आली. पांडूअण्णांकडे ‘रणगर्जना’ आणि विधवाश्रमाची जबाबदारी आली. रघुरायाकडे तो डॉक्टर असल्याने साहजिकपणेच आरोग्यधाम सोपवलं गेलं. चौथा श्रीरंग… तो मात्र या कशातच लक्ष न घालता बापकमाईवर ऐश करणारा निघालेला. मात्र, सगळ्यांना वडलांचा जाज्ज्वल्ल अभिमान. त्यांनी बांधलेल्या वाड्यातील २७ भाडेकरू आणि अनेक दुकानं यांच्या भाड्यातून कुटुंबाचा चरितार्थ उत्तम चाललेला. पंजाबरावांनी आपले जीवश्चकंठश्च मित्र जांबुवंतराव यांना या सगळ्या कार्यांचे विश्वस्त म्हणून नेमलंय. हेही वाचा >>> पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…” मुलं दरवर्षी वडलांची पुण्यतिथी दणक्यात साजरी करतात. पण आताशा या कार्यक्रमाकडे लोक फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे बजरंग आणि मंडळी संत्रस्त आहेत. पण करणार काय? लोकांना जबरदस्तीनं तर पुण्यतिथीला आणता येत नाही. पुण्यतिथीला प्रमुख पाहुणे जांबुवंतरावच. यंदा ते पुण्यतिथीला आलेत ते मनाशी काहीएक ठरवूनच. कारण पंजाबरावांनी सुरू केलेल्या विधायक कामांचा त्यांच्या मुलांनी बट्ट्याबोळ केलाय हे त्यांच्या ध्यानी आलंय. तेव्हा त्याची निरगत लावायचा पक्का निर्धार त्यांनी केलेला. पंजाबराव आपल्या स्वप्नात येऊन त्यांनीच आपल्याला हे करायला सांगितलंय अशी एक लोणकढी थाप ते त्यांच्या मुलांच्या तोंडावर फेकतात आणि सगळ्या संस्था बंद करण्याचा निर्णय ते जाहीर करतात. त्यामुळे पंजाबरावांच्या मुलांमध्ये एकच हलकल्लोळ माजतो. हे कोण आम्हाला संस्था बंद करा म्हणून सांगणारे,असा त्यांचा सवाल असतो. पण वडलांनीच जांबुवंतरावांना स्वप्नात येऊन हे सांगितल्याने त्यांचा नाइलाज होतो… पण यावर मार्ग काढतो तो निकम्मा ठरवला गेलेला श्रीरंग. कसा, ते प्रत्यक्षात नाटकात पाहणंच योग्य. दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी या नाटकाची प्रकृती ओळखून ते मंचित केलं आहे. यातला उपरोध, अतिशयोक्ती आणि उपहास त्यांनी हरप्रकारे बाहेर काढला आहे. त्यासाठी पात्रांच्या लकबी, वागणं-बोलणं, अभिव्यक्ती यांचा सर्वांगसुंदर वापर त्यांनी केला आहे. प्रसंगबांधणीतही हे प्रकर्षानं जाणवतं. पात्रांच्या पिंडप्रकृतीप्रमाणे त्यांचं व्यक्त होणं- यातून अर्धाअधिक परिणाम त्यांनी साधला आहे. संहितेपल्याडच्या जागा त्यांनी कलाकारांच्या अभिव्यक्तीतून भरून काढल्या आहेत. पात्रनिवडीतच त्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे. व्यक्तिरेखाटन, प्रवेशांची रचना, अपेक्षित परिणाम याबद्दलचे त्यांचे ठोकताळे बिनतोड ठरले आहेत. एकूण नाटक परिणामकारक कसं होईल हे त्यांनी अचूक हेरलं आहे. प्रदीप मुळ्ये यांनी भव्य, प्रशस्त जुन्या वाड्याचं नेपथ्य वास्तवदर्शी उभं केलं आहे. त्यातले तपशील बारकाईनं भरले आहेत. प्रकाशयोजनेतही त्यांनी प्रसंगोपात मुड्स अधोरेखित केले आहेत. अशोक पत्कींचं संगीत नाट्यपूर्ण क्षण ठळक करतं. मंगल केंकरे यांनी पात्रांच्या व्यक्तिमत्त्वानुसार त्यांना वेशभूषा दिली आहे. त्यात काळाचा संदर्भही त्यांनी लक्षात घेतला आहे. किरण शिंदे (रंगभूषा) आणि संध्या खरात (केशभूषा) यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. हेही वाचा >>> “लैंगिक शिक्षणावर चित्रपट करण्याची कुणाची हिंमत आहे का?” सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांवर बोलताना अक्षय कुमारचा प्रश्न सगळ्याच कलाकारांची उत्तम कामं ही या प्रयोगाची खासियत म्हणता ये?ईल. त्यातही आनंद इंगळे यांचा बजरंग देहबोली आणि मुद्राभिनयात भाव खाऊन जातो. त्यांचा अतिशयोक्त त्रागा, त्यांचा सात्त्विक संताप आणि त्यातलं वैय्यर्थ्य त्यांनी नेमकेपणानं दाखवलं आहे. सुनील बर्वेंचा पांडूअण्णा संयमित, परंतु आपण करतो आहोत त्यात राम नाही याची मनाशी कुठंतरी जाणीव असलेला आहे. त्यामुळे अतिरिक्त आक्रस्ताळेपणा न करताही ते आपली ‘भूमिका’ पोहचवतात. सतत दडपला गेलेला, नको ते ब्रह्मचर्य लादला गेलेला रघुराया त्याच्या घुसमटीसह पुष्कर श्रोत्री यांनी विश्वासार्ह केला आहे. श्रीरंगचं छछोरपण व्यक्त करतानाच वास्तवाचं भान असलेला घरातला एकमेव पुरुष अनिकेत विश्वासराव यांनी ठामपणे साकारला आहे. त्याची जांबुवंतरावांबरोबरची जुगलबंदी खासच. आतिशा नाईक यांची विनोदाची उत्तम जाण याआधीच सिद्ध झालेली आहे. यातली फटकळ युगंधरा त्यांनी नेत्राभिनय आणि संवादफेकीतील हुकूमतीवर लाजवाब वठवली आहे. बनूताईंच्या भूमिकेत आवश्यक ते पडतेपण घेत आपल्याला हवे ते मिळवणारी पांडूअण्णांची साहाय्यिका सुहास परांजपे यांनी ठसक्यात सादर केली आहे. जांबुवंतराव झालेले उमेश जगताप आपला भारदस्त आवाज आणि त्यातील करारीपणासह भूमिकेत शोभले आहेत. मदालसेबाबतचा त्यांचा मिथ्याभिमानही त्यांनी यथायोग्य व्यक्त केला आहे. पुस्तकी किडा असलेली आणि वास्तवापासून दुरावलेली मदालसा शर्वरी पाटणकरांनी अर्कचित्रात्मक शैलीत साकारली आहे. एकुणात एक हवाहवासा वाटणारा नाट्यानुभव देणारं हे नाटक आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.