MANORANJAN

“दिवसभर मद्यप्राषन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ

‘देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’ अशा चित्रपटांतून तसेच ‘इमली’सारख्या अनेक हिंदी मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani) होय. अभिनेता नुकताच प्राजक्ता माळीबरोबर ‘फुलवंती’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. याबरोबरच ‘फुलवंतीला’देखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र गश्मीर महाजनी हा एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. गश्मीर महाजनीने नुकतीच ‘व्हायफळ’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने बालपण कसे गेले, कोणतेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते, जेव्हा घराची जबाबदारी पडली त्यावेळी १५ व्या वर्षापासून कमवायला सुरुवात केली. १५ व्या वर्षापासून केलेला आर्थिक संघर्ष आता उपयोगी पडत असल्याचेदेखील त्याने म्हटले. याच मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, अशा सगळ्या परिस्थितीत एखादी व्यक्ती नकारात्मकदेखील होऊ शकते. तर तू मागे वळून पाहिलंस तर अशा कोणत्या गोष्टींना श्रेय देशील, ज्यामुळे तू सकारात्मकतेच्या मार्गावर चालत राहिलास? यावर उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “माझं कुटुंब, आई यांनी खूप पाठिंबा दिला. मी एकही चित्रपट केला नव्हता, तेव्हा मी लग्न केलं. त्यावेळी मी सर्वात कठीण काळातून जात होतो, म्हणून मी लग्न केलं. मला गौरी आवडली होती आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचचं होतं. आपण असा विचार करतो, चार पैसे येऊ देत मग लग्न करतो; पण मला असं वाटलं की लग्न केल्याने स्थैर्यता येईल, त्यामुळे सिनेमावर जास्त लक्ष केंद्रित करता येईल. कारण तुमचं कुटुंब तुम्हाला भावनिक स्थैर्यता देते. त्यामुळे त्या व्यक्तीला चार वर्षे दूर ठेवणं आणि आपण आपला संघर्ष करत बसणं आणि परत नैराश्यात जाणं. कारण जे सगळं सकारात्मक वाटतंय तसा सतत प्रवास सकारात्मक नाही झाला. मी १५ ते १७ या काळात काम केलं असेल, पण १७ ते १८, १९ चा काळ होता जेव्हा मी प्रचंड नैराश्यात होतो. मग परत मी सात-आठ वर्ष खूप चांगलं काम केलं. मग २४ ते २८ या चार वर्षांत मी प्रचंड नैराश्यात होतो.” “मी खूप दारू प्यायचो. दिवसभर दारू प्यायचो. मी स्वत:ला सहा महिने एका रूममध्ये कोंडून घेतलं होतं. मी बाहेर जायचो नाही. मी कोणाचे फोन उचलायचो नाही. कारण मी एका चित्रपटाची निर्मिती केली होती व त्याचे दिग्दर्शनही केले होते. नील डिसूजा परत आलाय असं त्या चित्रपटाचं नाव होतं. सुहास शिरवळकरांच्या प्राक्तन नावाच्या पुस्तकातून ती कथा घेतली होती. त्यामध्ये अशोक मेहता साहेब हे माझे सह-निर्माते होते. त्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. ती फिल्म चालली नाही. मी घरावर कर्ज काढून ती फिल्म केली होती. त्यातून मी पदार्पण करणार होतो. त्याच्यानंतरचे दोन-तीन वर्षे डिप्रेशनमध्ये गेले. मग मी लग्न केलं. अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली. तर चढ-उतार कायम चालू असतात, पण यामधून मला बाहेर आणण्यासाठी माझ्या कुटुंबानं खूप मदत केली आणि आता मुलगा झाल्यानंतर तर कधी कधी मनात असे वेगळे विचार येतात की काही गोष्टी ठरवल्या तशा घडत नाहीत. पण कायम आई, पत्नी, मूल, बहीण हे सगळे असतात. असं काही नाही की त्यांनी काही समजवण्याची गरज आहे. फक्त त्यांचं जवळ असणं कधी कधी खूप महत्त्वाचं असतं. कोणी काही करायची गरज नसते, ते असतात हे फार महत्त्वाचं असतं”, असे म्हणत गश्मीर महाजनीने सकारात्मक राहण्याचे श्रेय त्याच्या कुटुंबाला दिले आहे. हेही वाचा: “केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस दरम्यान, गश्मीर महाजनी मराठी चित्रपटांसह हिंदी मालिकेत काम करतानादेखील दिसतो. खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. आता फुलवंतीच्या यशानंतर तो कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.