KRIDA

खेळपट्ट्यांबाबत नाराजी; सरावासाठी योग्य सुविधा पुरविल्या जात नसल्याची भारताची तक्रार

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) येथे सरावासाठी देण्यात आलेल्या खेळपट्ट्यांबाबत भारतीय संघाने नाराजी व्यक्त केली आहे. आधीच वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांवर सराव करावा लागत असून चेंडूला कधी अधिक उसळी मिळत आहे, तर चेंडू खाली राहत आहे. त्यामुळे दुखापतींचा धोका उद्भवत असून कर्णधार रोहित शर्मा जायबंदी झाल्याची तक्रार भारतीय संघाकडून करण्यात आली आहे. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी असून चौथा सामना २६ डिसेंबरपासून ‘एमसीजी’वर खेळविण्यात येणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघाचे रविवारी सराव सत्र झाले. यात नेट्समध्ये साहाय्यकांमधील दयानंद गरानी याच्या ‘थ्रो-डाऊन’ना सामोरे जाताना रोहितच्या गुडघ्याला चेंडू आदळला. त्यामुळे त्याला सराव मध्येच सोडावा लागला. भारतीय संघाने सोमवारी सराव केला नाही. रोहितला रात्रभर गुडघ्याला बर्फ लावावा लागला अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्याची दुखापत गंभीर नसली, तरी भारतीय संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. रोहितच्या दुखापतीला सरावासाठी देण्यात आलेली खेळपट्टी कारणीभूत असल्याची संघ व्यवस्थापनाची धारणा आहे. भारतीय संघाने आपल्या सरावाचे वेळापत्रक दोन महिन्यांपूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पाठवले होते. असे असले तरी भारतीय संघाला सरावासाठी याआधी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्याच देण्यात आल्या. मात्र, ‘एमसीजी’चे खेळपट्टी देखरेखकार (क्यूरेटर) मॅट पेज यांनी स्वत:चा बचाव करताना आपण नियमानुसारच खेळपट्ट्या दिल्याचे स्पष्ट केले. ‘‘नियमानुसार आम्ही सामन्याच्या तीन दिवस आधी सरावासाठी नव्या खेळपट्ट्या उपलब्ध करून देतो. त्याआधी एखाद्या संघाला सराव करायचा असल्यास त्यांना जुन्या खेळपट्ट्याच वापराव्या लागतात,’’ असे पेज म्हणाले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या (एमसीजी) खेळपट्टीवर पर्थसारखी उसळी नसेल किंवा गॅबाप्रमाणे चेंडू स्विंग आणि सीम होणार नाही. मात्र, चौथ्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात खेळपट्टीवर सहा मिलीमीटर गवत ठेवण्यात येणार असून वेगवान गोलंदाजांना साहाय्य मिळेल, असे ‘एमसीजी’चे खेळपट्टी देखरेखकार मॅट पेज यांनी सांगितले. या खेळपट्टीला भेगा पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे फिरकीपटूंची भूमिका फारशी महत्त्वाची नसेल, असेही पेज यांना वाटते. ‘‘आम्हाला चेंडू आणि बॅटमधील द्वंद्व पाहायचे आहे. यासाठीच आम्ही खेळपट्टीवर बरेच गवत ठेवणार आहोत. त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळेल. नवा चेंडू खेळून काढल्यास फलंदाजी करणे थोडे सोपे होईल,’’ असे पेज म्हणाले. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.