KRIDA

भारताचे सामने पाकिस्तानबाहेरच! चॅम्पियन्स करंडकाचा तिढा सुटला; २०२७ पर्यंतच्या स्पर्धा संमिश्र प्रारूपानुसार, जय शहांची निर्णायक भूमिका?

वृत्तसंस्था, दुबई पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदाचा तिढा दूर झाला असून भारताचे सामने पाकिस्तानबाहेर होणार हे स्पष्ट झाले आहे. चॅम्पियन्स करंडकासह २०२७ पर्यंत पाकिस्तान आणि भारतात होणाऱ्या सर्वच जागतिक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार (हायब्रिड मॉडेल) होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केले. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तानात नियोजित आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिल्याने यजमानपदाचा तिढा निर्माण झाला होता. ‘पीसीबी’ने संपूर्ण यजमानपद आपल्याकडे राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ‘बीसीसीआय’च्या तीव्र विरोधानंतर अखेरीस पाकिस्तानने नमते घेत संमिश्र प्रारूप आराखड्याला मान्यता दिली. परंतु हा नियम केवळ एका स्पर्धेपुरता नसून २०२७ पर्यंतच्या सर्वच स्पर्धा या पद्धतीने होणार असल्याचे ‘आयसीसी’ने नमूद केले आहे. तसेच २०२८ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीही हा नियम लागू केला जाणे अपेक्षित आहे. हेही वाचा >>> R Ashwin Retirement: “जर विराट कर्णधार असता तर त्याने अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती…”, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य ‘‘२०२४ ते २०२७ या कालावधीत भारत आणि पाकिस्तानात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आयसीसी’च्या सर्व स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसार होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांच्या देशात जाऊन सामने खेळणार नाही. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या यजमानांनी ठेवलेल्या या प्रस्तावाला ‘आयसीसी’च्या मंडळाने मान्यता दिली आहे,’’ असे ‘आयसीसी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही ‘आयसीसी’ने नमूद केले आहे. अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी भारताचे सामने संयुक्त अरब अमिराती येथे होणे अपेक्षित आहे. पुढील तीन वर्षांच्या कालावधीत पाकिस्तानात चॅम्पियन्स करंडक (२०२५), तर भारतात महिला एकदिवसीय विश्वचषक (२०२५) आणि पुरुष ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०२६) या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. २०२६च्या स्पर्धेचे श्रीलंका सह-यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाऊ शकतील, मात्र ‘आयसीसी’ला पुढील वर्षीच्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचा प्रश्न सोडवावा लागेल. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार नसून त्यांचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. हेही वाचा >>> Rahul Gandhi : राहुल गांधी मागणीवर ठाम, “अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडक सुरक्षेची चिंता ? सुरक्षेच्या कारणास्तव ‘बीसीसीआय’ने आपला संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिल्याची माहिती आहे. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात सामने खेळलेले नाहीत, तसेच हे दोन संघ आता केवळ ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये अखेरची द्विदेशीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. भारतीय संघाला पाकिस्तानात खेळायचे झाल्यास केंद्र सरकारची परवानगीही आवश्यक आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत. ● चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही ही आपली भूमिका ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केली होती, मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळही (पीसीबी) संपूर्ण यजमानपदावर ठाम होते. ● ‘पीसीबी’चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी प्रत्येक वेळी आपण नमते घेणार नसल्याचे म्हटले होते. गतवर्षी पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात गेला होता. त्यामुळे आता भारतीय संघाने पाकिस्तानात आले पाहिजे, असे नक्वी यांचे म्हणणे होते. ● ‘आयसीसी’ने या प्रकरणावर मौन बाळगले होते, मात्र १ डिसेंबर रोजी ‘बीसीसीआय’चे माजी सचिव जय शहा यांनी ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर घडामोडींना वेग आला. ● शहा आणि ‘आयसीसी’ संचालक मंडळाच्या सदस्यांमध्ये ५ डिसेंबर रोजी बैठक झाली. यात पाकिस्तानचाही समावेश होता. याच बैठकीत ‘आयसीसी’ यजमानपदाचा तिढा सुटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी संमिश्र प्रारूप आराखड्यास अंतिम स्वरूप देण्यासाठीही बैठक आयोजित करण्यात आली होती. None

About Us

Get our latest news in multiple languages with just one click. We are using highly optimized algorithms to bring you hoax-free news from various sources in India.